तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी शुक्रवारी (२७ ऑक्टोबर) जाहीर केली. या यादीत एकूण ४५ उमेदवारांची नावे असून यामध्ये अनेक महत्त्वाच्या नेत्यांना तिकीट देण्यात आले आहे. विशेष म्हणजे भारत राष्ट समिती (बीआरएस) पक्षासह अन्य पक्षातील असंतुष्ट तसेच तिकीट न मिळालेल्या नेत्यांना काँग्रेसने दुसऱ्या यादीत संधी दिली आहे.
दुसऱ्या यादीत ४५ उमेदवार, अझरुद्दीन यांना तिकीट
काँग्रेसने आपल्या दुसऱ्या यादीच्या माध्यमातून एकूण ४५ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. या यादीत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचादेखील समावेश आहे. ते हैदराबादमधील जुबली हील्स या मतदारसंघातून निवडणूक लढवतील. अझरुद्दीन हे उत्तर प्रदेशमधून एकदा खासदार राहिलेले आहेत. २०१४ सालच्या निवडणुकीत त्यांचा भाजपाच्या उमेदवाराने पराभव केला होता. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी तिकिटासाठी प्रयत्न केला होता. मात्र काँग्रेसने तेव्हा त्यांना तिकीट दिले नव्हते. तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत मात्र अझरुद्दीन यांना काँग्रेसने संधी दिली आहे.
आयारामांना काँग्रेसकडून तिकीट
काँग्रेसने आपल्या दुसऱ्या यादीत बीआरएस, बीजेपी, टीडीपी या पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्या अनेक नेत्यांना तिकीट दिले आहे. माजी खासदार पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांनी बीआरएस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना काँग्रेसने तिकीट दिले असून ते पालैर मतदारसंघातून निवडणूक लढवतील. माजी मंत्री तुम्माला नागेश्वर राव यांनी सप्टेंबर महिन्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना खम्मम या मतदारसंघासाठी तिकीट देण्यात आले आहे. बीआरएस पक्षाचे माजी नेते जगदीश्वर गौड यांनादेखील काँग्रेसने सेरिलिंगमपल्ली या जागेसाठी तिकीट दिले आहे. बीआरएस पक्षाच्या माजी आमदार कोंडा सुरेखा यांनी २०१८ साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनादेखील काँग्रेसने तिकीट दिले असून, त्या वरंगल पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवतील.
…तर शब्बीर यांना निझामाबाद जागेसाठी तिकीट
काँग्रेसचे वरिष्ठ नेते मोहम्मद अली शब्बीर यांना कामारेड्डी या मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) याच मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मात्र दुसऱ्या यादीत शब्बीर यांचे नाव नाही. तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी यांना कोडंगल या मतदारसंघातून उमेदवारी मिळालेली आहे. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार रेड्डी यांना केसीआर यांच्याविरोधात कामारेड्डी या जागेसाठी तिकीट देण्याचा विचार काँग्रेसकडून केला जात आहे. असे झाले तर शब्बीर यांना निझामाबाद जागेसाठी तिकीट मिळू शकते.
गद्दार यांच्या मुलीला तिकीट
गायक बल्लदीर गद्दार यांचे या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात निधन झाले होते. त्यांची मुलगी जी वेन्नेला यांनादेखील काँग्रेसने तिकीट दिले आहे. वेन्नेला या सिकंदराबाद कन्टोंन्मेंट या मतदारसंघातून निवडणूक लढवतील. पाच वेळा खासदार राहिलेल्या पी जनार्धन रेड्डी यांचे पुत्र तसेच जुबली हील्सचे माजी आमदार राहिलेले पी विष्णूवर्धन रेड्डी हे या जागेसाठी इच्छुक होते.
सूत्रांच्या माहितीनुसार ज्या जागांवर बीआरएस पक्षाचा प्रभाव कमी आहे किंवा ज्या जागांवर काँग्रेसच्या विजयाची शक्यता आहे, त्या जागा पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी लढवाव्यात, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे. काँग्रेसचे माजी खासदार मधू यक्षी गौड यांना एलबी नगर तर खासदार पूनम प्रभाकर यांना हुस्नाबाद या जागेसाठी तिकीट देण्यात आले आहे. याआधी प्रभाकर यांना करिमनगर या मतदारसंघासाठी तिकीट दिले जाणार, असे म्हटले जात होते. या जागेवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार आणि बीआरएसचे आमदार गंगुला कमलाकर यांच्यात लढत होत आहे.
सीपीआय, सीपीएमला प्रत्येकी दोन जागा देणार
दरम्यान, काँग्रेसने अद्याप १९ जागांसाठी उमेदवार जाहीर केलेले नाहीत. यातील प्रत्येकी दोन जागा सीपीआय आणि सीपीएम या पक्षांना दिल्या जाण्याची शक्यता आहे.