विधानसभेच्या निवडणुकीसाठीचे मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे तेलंगणा राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येथे भाजपा, काँग्रेस आणि सत्ताधारी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हे पक्ष धडाडीने प्रचार करत आहेत. आम्ही पुन्हा सत्तेत आल्यास पुढील पाच वर्षांत राज्याचा चेहरामोहरा बदलू, असे आश्वासन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्याकडून दिले जात आहे. दरम्यान, अल्पसंख्याक मतदारांना आकर्षित करण्यासाठी केसीआर यांनी मोठी घोषणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुवारी (२३ नोव्हेंबर) केसीआर हैदराबादजवळ माहेश्वरम येथील एका सभेला संबोधित करत होते. या मतदारसंघातून विद्यमान शिक्षणमंत्री सबिता इंद्रा रेड्डी या निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारसभेत बोलताना केसीआर यांनी मुस्लीम तरुणांसाठी मोठी घोषणा केली आहे. आम्ही सत्तेत आल्यास हैदराबादजवळ अल्पसंख्याकांसाठी विशेष आयटी पार्क उभारू, असे केसीआर जाहीर सभेत म्हणाले आहेत.

अल्पसंख्याकांसाठी आयटी पार्क उभारणार- केसीआर

“आम्ही आज जे पेन्शन देत आहोत, ते मुस्लीम समाजातीला व्यक्तींनाही भेटत आहे. आम्ही काही निवासी शाळांची उभारणी केलेली आहे. या शाळांत मुस्लीम विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला जातो. आम्ही सर्वांनाच सोबत घेऊन चालतो. आज मी मुस्लीम तरुणांबद्दल विचार करत आहे. या तरुणांसाठी हैदराबदजवळ आयटी पार्क उभा करण्याचा मी विचार करत आहे,” असे केसीआर म्हणाले.

अल्पसंख्याकांच्या विकासासाठी १२ हजार कोटींचा खर्च- केसीआर

तेलंगणा हे राज्य एक शांतताप्रिय राज्य आहे. आमच्या सरकारने अल्पसंख्याकांच्या विकासासाठी गेल्या १० वर्षांत १२ हजार कोटी रुपये खर्च केलेले आहेत. काँग्रेसने सत्तेत असताना दहा वर्षांत फक्त २ हजार कोटी रुपये खर्च केले होते. मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत तेलंगणा हे एक धर्मनिरपेक्ष राज्य राहील, असेही केसीआर म्हणाले.

तेलंगणात २४ तास मोफत वीज – केसीआर

तेलंगणा राज्य वेगळे झाल्यानंतरच या प्रदेशाचा विकास झाला, असा दावा केसीआर यांनी केला. “तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी कोणी प्रयत्न केले. २४ तास वीज पुरवठा कोणी दिला? घरोघरी पाण्याची व्यवस्था कोणी केली?” असे प्रश्नही यावेळी केसीआर यांनी सभास्थळी जमलेल्या श्रोत्यांना केले. तेलंगणा राज्याची निर्मिती झाली, तेव्हा स्थिती फार वेगळी होती. लोकांना पिण्यासाठी पाणी नव्हते. सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था नव्हती. सरकार आज प्रयत्न करत आहे, त्यामुळे तेलंगणा राज्याच्या स्थितीत सुधारणा होत आहे, असेही केसीआर म्हणाले. तेलंगणा राज्यात पाण्यासाठी कर भरावा लागत नाही. तेलंगणात २४ तास मोफत वीज आहे. तेलंगणा राज्य शेतीतही प्रगती करत आहे. आगामी १० ते १५ वर्षे आमच्याकडे सत्ता असल्यास राज्यातील शेतकरी सुखी होतील, असा दावाही त्यांनी केला.

शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीत वाढ करण्याचे आश्वासन

“काँग्रेसकडून रायथू बंधू या योजनेवर टीका केली जात आहे. केसीआर या योजनेच्या माध्यमातून करदात्यांचा पैसा वाया घावलत आहेत, असा आरोप काँग्रेस करतो. मात्र आम्ही सत्तेत आल्यास या योजनेला चालूच ठेवू. एवढेच नव्हे तर आम्ही शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत १६ हजार रुपयांपर्यंत वाढवू, असेही केसीआर म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telangana assembly election 2023 k chandrasekhar rao announced special it park for minority youth prd
Show comments