विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विजयाला गवसणी घालण्यासाठी येथील राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने रणनीती आखत आहेत. येथे येत्या ३० नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून सत्ताधारी भारत राष्ट्र समिती (बीआरएस), काँग्रेस आणि भाजपा अशी तिरंगी लढत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे बळ आता वाढले आहे. एकूण दोन पक्षांनी आपली ताकद काँग्रेसच्या मागे उभी केली आहे.
डीएमके पक्षाचा काँग्रेसला पाठिंबा
तामिळनाडू राज्यातील सत्ताधारी डीएमके या पक्षाने तेलंगणा राज्याच्या निवडणुकीसाठी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. तामिळनाडू पक्षाचे सर्वेसर्वा तथा मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी तशी घोषणा केली आहे. काँग्रेसला पाठिंबा देताना डीएमके पक्षाने एक निवेदन सादर केले आहे. तेलंगणा राज्यातील डीएमके पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराच्या विजयासाठी काम करावे, असे या निवदेनाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. तामिळनाडू राज्यात डीएमके आणि काँग्रेस यांच्यात युती आहे. हे दोन्ही पक्ष केंद्रीय स्तरावर झालेल्या विरोधकांच्या इंडिया या आघाडीचा भाग आहेत.
“तेलंगणात सत्ताबदल होण्याची शक्यता”
वायएसआर तेलंगणा काँग्रेस या पक्षानेही याआधी डीएमके पक्षाप्रमाणेच भूमिका घेतली आहे. आम्ही ३० नोव्हेंबर रोजीची तेलंगणा विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असे या पक्षाने जाहीर केले आहे. याबाबतची घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी तथा वायएसआर तेलंगणा पार्टीच्या अध्यक्षा वाय. एस. शर्मिला यांनी केली. काँग्रेस पक्षाला मिळणाऱ्या मतांचे विभाजन होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे शर्मिला म्हणाल्या.
सत्ताविरोधी मतांचे विभाजन व्हावे अशी आमची इच्छा नाही. तेलंगणात सत्ताबदल होण्याची शक्यता आहे. असे असताना काँग्रेसला मिळणाऱ्या मतांचे विभाजन योग्य नाही, असे शर्मिला म्हणाल्या.
“आम्ही निवडणूक लढवल्यास काँग्रेसला फटका बसणार”
“आमच्या वायएसआर तेलंगणा पार्टीने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बीआरएस पक्षाला पराभूत करण्याची काँग्रेसकडे संधी आहे. त्यामुळे मतांचे विभाजन होऊ नये, तसेच सत्ताविरोधी लाटेचा फायदा व्हावा, यासाठी आम्ही ही विधानसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक सर्वेक्षणातून समोर आलं की, आम्ही विधानसभा निवडणूक लढल्यानं काँग्रेसच्या मतांवर परिणाम होत आहे. राज्याच्या आणि नागरिकांच्या हितासाठी आम्ही तेलंगणा विधानसभा निवडणूक लढवणार नाही”, असं शर्मिला यांनी म्हटलं.
येत्या ३ डिसेंबर रोजी मतदान
दरम्यान, तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक होणार आहे; तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल. बीआरएस, भाजपा आणि काँग्रेस या तीन पक्षांत येथे प्रमुख लढत होणार आहे. असे असताना वायएसआर तेलंगणा काँग्रेस आणि डीएमके पक्षाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेसचे बळ वाढणार आहे.