विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येथे सत्ताधारी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेस आणि भाजपा अशा दोन्ही पक्षांकडून प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून आपले राजकीय प्रस्थ वाढलेले असताना, ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भाजपाला येथे मोठा फटका बसणार आहे. भाजपाचे बडे नेते तथा भाजपाच्या कार्यकारी समितीचे सदस्य कोमातीरेड्डी राज गोपाल रेड्डी हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. ते काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेदरम्यान काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.
गेल्या वर्षी केला होता भाजपात प्रवेश
राज गोपाल यांनी गेल्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. काँग्रेस सोडताना त्यांनी तत्कालीन तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंथ रेड्डी यांच्याशी मतभेद आहेत, असे सांगितले होते. भाजपात त्यांना मुनूगोडे मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत तिकीट दिले होते. मात्र, बीआरएस पक्षाचे के. प्रभाकर रेड्डी यांनी त्यांचा पराभव केला होता.
महत्त्वाचे पद न दिल्यामुळे गोपाल राज नाराज
भाजपा पक्षाने महत्त्वाचे पद न दिल्यामुळे राज गोपाल यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत, काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज गोपाल यांनी भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार यांच्याविरोधात दिल्लीच्या नेतृत्वाकडे तक्रार केली होती. बंडी संजय कुमार यांना नुकतेच प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे. सध्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जी. किशन रेड्डी आहेत. भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर राज गोपाल यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) त्यांची भूमिका स्पष्ट केली. “कार्यकर्ते हेच माझी ताकद आहेत. माझे चाहते हे माझा श्वास आहेत, पद माझ्यासाठी नवे नाही, मी हा निर्णय लोकांसाठी घेतला आहे”, असे गोपाल राज यांनी म्हटले.
रेड्डी बंधूंची राजकीय कारकीर्द
राज गोपाल रेड्डी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला काँग्रेस पक्षापासून सुरुवात केली. २००९ साली त्यांनी भोंगीर येथून निवडणूक लढवत विजय मिळवला होता. मात्र, २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना बीएआरएस पक्षाच्या नेत्याने पराभूत केले होते. राज गोपाल यांचे बंधू वेंकट रेड्डी हे दखील नालगोंडा मतदारसंघातून चार वेळा आमदार राहिलेले आहेत. या दोन्ही भावांना नालागोंडा जिल्ह्यात मोठा जनाधार आहे. गेल्या वर्षी काँग्रेस पक्ष सोडताना राज गोपाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली होती. के. चंद्रशेखर राव यांच्या कुटुंबाचे राज्य मोदीच संपवू शकतात, असे राज गोपाल म्हणाले होते. “ज्या नेत्याने सोनिया गांधी यांच्यावर काही वर्षांपूर्वी टीका केलेली आहे, त्या नेत्यासोबत मी काम करू शकत नाही. सोनिया गांधी यांच्यावर टीका करणारा नेताच आज तेलंगणात काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करत आहे”, असे म्हणत राज गोपाल यांनी त्यावेळी काँग्रेसचे नेते रेवंथ रेड्डी यांच्यावर टीका केली होती.
भाजपाला फटका बसणार का?
राज गोपाल यांनी सोडचिठ्ठी दिल्यामुळे भाजपाला फटका बसू शकतो. तेलंगणात भाजपाची लढाई ही काँग्रेस तसेच बआरएस अशा दोघांशीही आहे. २०१९ सालानंतर भाजपाने तेलंगणात चांगला विस्तार केलेला आहे. सध्या येथे १७ पैकी ४ जागांवर भाजपाचे खासदार आहेत. बीआरएस पक्षाचे ९, तर काँग्रेस पक्षाचे ३ खासदार आहेत. २०१८ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला एका जागेवर विजय मिळाला होता. मात्र, २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाचा येथील जनाधार वाढलेला आहे. येथे भाजपाने हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती. एकूण १५० पैकी ४८ जागांवर भाजपाने विजय मिळवला होता. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज गोपाल यांच्यासारख्या नेत्याने पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे भाजपाला याचा फटका बसू शकतो.