देशातील चार राज्यांत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले असून आता सर्वांचे लक्ष तेलंगणा या राज्याकडे लागले आहे. या राज्यात येत्या ३० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. हे राज्य जिंकण्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रचार केला जात आहे. सत्तेत आल्यास आम्ही तेलंगणात मुस्लिमांना दिले जाणारे ४ टक्के आरक्षण रद्द करू, असे आश्वासन भाजपाकडून केले जात आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हैदराबादमध्ये जाऊन मोठी घोषणा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करू”

विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी योगी आदित्यनाथ शनिवारी (२५ नोव्हेंबर) हैदराबादच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी एका सभेला संबोधित केले. सभेत बोलताना त्यांनी मुस्लीम आरक्षण रद्द करण्यासह हैदराबाद शहराचे नाव बदलण्याचे आश्वासन दिले. सत्तेत आल्यास आम्ही हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करू, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. “काँग्रेसने हैदराबादची निर्मिती केली. बीआरएस सरकार तुम्हाला १७ सप्टेंबरचा दिवस साजरा करू देत नाही. भाजपा सत्तेत आल्यावर मात्र तुम्हाला कोणतेही बंधन येणार नाही. आम्ही हैदराबादचे भाग्यनगर करायला येथे आलो आहोत,” असे योगी आदित्यनाथ म्हणाले. ते हैदराबाद शहरातील गोशामहल या भागात एका रोड शोदरम्यान बोलत होते.

नरेंद्र मोदी यांच्याकडून हैदराबादचा भाग्यनगर असा उल्लेख

निझामाची राजवट असलेले हैदराबाद संस्थान १७ सप्टेंबर १९४८ रोजी भारतीय संघराज्यात विलीन झाले होते. हाच संदर्भ घेऊन बीआरएस पक्ष तेलंगणातील जनतेला १७ सप्टेंबरचा दिवस साजरा करू देत नाही, असा आरोप आदित्यनाथ यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ मध्ये हैदराबादचा भाग्यनगर असा उल्लेख केला होता. तेव्हापासून हैदराबाद शहराचे नाव बदलण्याची मागणी केली जाऊ लागली.

२०२० सालीदेखील दिले होते आश्वासन

योगी आदित्यनाथ यांनी तेलंगणामध्ये येऊन दुसऱ्यांना हैदराबाद शहराचे नाव बदलण्याबाबत भाष्य केले आहे. याआधी ते २०२० साली ते पालिकेच्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी हैदराबादमध्ये आले होते. हैदराबादमध्ये भाग्यलक्ष्मी देवीचे मंदिर आहे. याच कारणामुळे हैदराबाद शहराला भाग्यनगर असे नाव दिले गेले पाहिजे, असे त्यावेळी आदित्यनाथ म्हणाले होते.

“सत्तेत आल्यास मुस्लीम आरक्षण रद्द करू”

योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी मुस्लीम आरक्षणावरही भाष्य केले. आसिफाबाद जिल्ह्यातील कुमुराम भीम येथे एका सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, मुस्लिमांना देण्यात आलेले आरक्षण हे असंवैधानिक आहे. त्यामुळे या आरक्षणाची अंमलबजावणी कोणत्याही परिस्थितीत झाली नाही पाहिजे. काँग्रेस आणि बीआरएसला या देशाला आणखी एका वेगळ्या विभाजनाकडे घेऊन जायचे आहे. या दोन्ही पक्षांकडून घाणेरडे आणि तुष्टीकरणाचे राजकारण केले जात आहे.

“…तर हा संविधानाचा अपमान”

“मुस्लिमांना आरक्षण म्हणजे दलित आणि मागास जातींना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्याच्या कटाचाच एक भाग आहे. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाचा अपमान आहे. सत्तेत आल्यास भाजपा धर्माच्या नावावर देण्यात आलेले हे असंवैधानिक आरक्षण रद्द करेल. तसेच रद्द करण्यात आलेले हे आरक्षण ओबीसी आणि दलितांना दिले जाईल,” असेही आदित्यनाथ म्हणाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telangana assembly elections 2023 yogi adityanath said will change hyderabad name to bhagyanagar if come to power prd