संतोष प्रधान

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या दोघींमुळे सध्या तेलंगणाच्या राजकारणात वादळ उभे ठाकले आहे. एकीला सत्ताधारी पक्ष रोखण्याचा प्रयत्न करीत आहे तर दुसरीला सीबीआय, ईडी या केंद्रीय यंत्रणांचा सामना करावा लागत आहे. तशा या दोघाही कोणी साध्या नाहीत तर एक आहे मुख्यमंत्र्यांची कन्या तर दुसरी आहे भगिनी. एकीमुळे पोलीस व शासकीय यंत्रणा जेरीस आली आहे तर दुसरी चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे.

या दोघींपैकी एक आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या कविता तर दुसरी आहे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची भगिनी वाय. एस. शर्मिला. या दोघींमुळे तेलंगणाच्या राजकारणात वेगळाच वाद निर्माण झाला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची कन्या आमदार कविता यांचे नाव दिल्लीतील मद्य परवाना घोटाळ्याशी जोडण्यात येत आहे. कविता यांच्या निकटवर्तीयांना अलीकडेच अटक झाली. त्यानंतर सीबीआयने कविता यांची सुमारे सात तास कसून चौकशी केली. तसेच पुन्हा चौकशीसाठी त्यांना समन्स बजाविण्यात आले आहे. सीबीआय व ईडी या दोन्ही केंद्रीय यंत्रणा कविता यांच्या मागे हात धुवून लागल्या आहेत. आपण कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत, असे कविता वारंवार सांगत आहेत.

हेही वाचा… गजानन मालपुरे : सर्वसामान्य कार्यकर्ता

दुसरीकडे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची भगिनी शर्मिला यांच्यामुळे तेलंगणा सरकारची कोंडी झाली आहे. जगनमोहन यांच्याशी फारसे न जमल्याने आंध्रच्या राजकारणात संधी मिळणार नाही हे लक्षात येताच शर्मिला यांनी तेलंगणावर लक्ष केंद्रीत केले. त्यांनी वायएसआर तेलंगणा या पक्षाची स्थापना करून तेलंगणात पदयात्रा काढली आहे. राजधानी हैदराबादमध्ये कूच करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखले. त्यांचे वाहन पोलिसांनी रोखल्यावर त्यांनी गाडीतून खाली उतरण्यास नकार दिला. बराच वेळ समजूत काढूनही शर्मिला यांनी दाद दिली नाही म्हणून पोलिसांनी त्यांची गाडीच उचलून (टो) केली. तेव्हा त्या गाडीत बसून होत्या. त्याची छायाचित्रे देशभर प्रसारित झाली. साहजिकच शर्मिला यांना सहानुभूती मिळाली. हैदराबादमध्ये त्यांनी उपोषण सुरू केले. पदयात्रेला परवानगी द्यावी अशी त्यांची मागणी होती. शेवटी उच्च न्यायालयाने त्यांच्या पदयात्रेला परवानगी दिली.

हेही वाचा… राष्ट्रीय महामार्गाच्या आंदोलनातून आमदार लंके यांची लोकसभेसाठी वातावरण निर्मिती

तेंलगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने केंद्रीय यंत्रणा त्यांच्या कन्येच्या मागे हात धुवून मागे लागल्याचा आरोप तेलंगणा राष्ट्र समितीकडून केला जातो. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी चंद्रशेखर राव यांना शह देण्याकरिता केंद्रीय यंत्रणा मुख्यमंत्र्यांच्या कन्येच्या विरोधात कारवाई करण्याची शक्यता वर्तविली जाते.

एका मुख्यमंत्र्याची कन्या अडचणीत आली असताना दुसऱ्या मुख्यमंत्र्यांच्या भगिनीने व्यवस्थेला अडचणीत आणले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Telangana cm chandrashekar rao daughter kalvakuntla kavitha and andhra pradesh cm jagan mohan reddys sister sharmila are in trouble print politics news asj