एजाज हुसेन मुजावर
सोलापूर : आषाढी वारीचे निमित्त साधून भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या अख्ख्या मंत्रिमंडळासह पंढरपुरात येऊन विठ्ठलाची पूजा केली. परत जाताना तुळजापूर येथे जाऊन तुळजाभवानी मातेची पूजा केली. लौकिक अर्थाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल आणि महाराष्ट्राची कुलस्वामीनी तुळजाभवानी माता या दोन्ही देवता केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर आसपासच्या प्रांतांतील भाविकांची विशेषतः बहुजन समाजातील लाखो शेतकरी, कष्टक-यांची श्रध्दास्थाने. आषाढी सोहळा तर वारक-यांची मोठी मांदियाळी होते.
नेमका हाच मुहूर्त साधत के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह आमदार-खासदारांचा मोठा लवाजमा घेऊन पंढरपूरची केलेली वारी ही महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. पंढरपूरच्या वारी निमित्ताने चंद्रशेखर राव (केसीआर) तब्बल सहाशे गाड्यांचा भलामोठा ताफा घेऊन हैदराबादहून मुद्दामहून रस्ते मार्गाने सोलापुरात आले. यात जागोजागी, गावा-गावांत ‘ अब की बार किसान सरकार ‘ हा संदेश जाणीवपूर्वक देण्याचा आणि शेतक-यांना आकृष्ट करण्याचा हेतू असवा.
हेही वाचा >>> जमाखर्च : चंद्रकांत पाटील; सूर हरवला….
भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने पंढरपूर वारीच्या निमित्ताने सोलापूर हेच ठिकाण निवडण्यामागेही राजकीय गणिते निश्चितच दिसून येतात. केसीआर यांनी बीआरएस पक्षाचे महाराष्ट्रात जाळे विणत असताना प्रथम तेलंगणा-मराठवाडा सीमेवरील नांदेडचा भाग निवडला होता. त्यापाठोपाठ पूर्व विदर्भातही बस्तान बसविण्यासाठी पाऊल उचलले. त्यापाठोपाठ महाराष्ट्र-कर्नाटक-तेलंगणा सीमेवर, पश्चिम महाराष्ट्रातील मजबूत साखर पट्टा असलेल्या सोलापूरकडे मोर्चा वळविला. ऊस, ज्वारी, कांद्यासह डाळिंब, द्राक्षे, केळीसाठी ओळख निर्माण झालेल्या सोलापूर जिल्ह्यात शेतीवरील अर्थकारण मोठे आहे.
हेही वाचा >>> इचलकरंजी पालिकेत खासदार, आमदारांच्या हस्तक्षेपाने प्रशासक कंटाळले
दुस-या बाजूला तेलुगुभाषक विणकर समाज स्थानिक राजकारणात प्रभावी मानला जातो. तेलंगणात केसीआर यांनी शेतक-यांसाठी आणलेल्या विविध कल्याणकारी योजनाचा प्रचंड बोलबाला होत आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील शेतक-यांना आपल्या बाजूने खेचून घेण्याचा प्रयत्न दिसून येतो. त्यासाठी पंढरपूरच्या आषाढी वारीसारखा आणखी दुसरा दुसरा योग नाही. म्हणूनच केसीआर यांनी पध्दतशीरपणे ही किमया साधण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळते. सोलापूरचा पूर्वभाग विणकर तेलुगु समाजाने व्यापलेला. यात झोपडपट्ट्यांमध्ये याहणारे गरीब यंत्रमाग व विडी कामगार बहुतांशी याच समाजाचे. तीन लाखांपर्यंत मतदार याच समाजाचे आहेत. सोलापुरात पंधरा-वीस वर्षे खासदारकी आणि त्याही पेक्षा जास्त काळ आमदारकी तसेच सोलापूर महापालिकेतील सत्ता याच समाजाकडे चालत आलेली. परंतु आलिकडे हा तेलुगु समाज राजकीयदृष्ट्या काहीस अडगळीत पडला आहे.
हेही वाचा >>> चंद्रपूरमध्ये ओबीसी मतदारांना आकर्षित करण्याचा भाजपचा प्रयत्न
मूळ तेलंगणातून दीडशे वर्षांपूर्वी पोटापाण्यासाठी सोलापुरात स्थिरावलेल्या तेलुगु समाजाचे तेलंगणाशी आजही रोजीबेटीचे व्यवहार कायम आहेत. त्यामुळे केसीआर यांच्यादृष्टीने सोलापूर विशेषतः सोलापूर लोकसभा मतदारसंघात पाय रोवणे लाभदायक ठरू शकते. स्थानिक तेलुगु समाजाच्या हाती एकेकाळी सोलापूरच्या राजकारणाबरोबरच अर्थकारणाची बळकट दोरी होती. तीन सूतगिरण्या, बँका हे सारे सहकारातून निर्माण झालेले जाळे केव्हाच संपुष्टात येऊन राजकीयदृष्ट्या पोकळीही निर्माण झाल्यामुळे हा समाज सध्या तरी संघाच्या दावणीला बांधला गेला आहे. परंतु त्यातही राजकीय भागीदारी मिळत नसल्यामुळे हा समाज योग्य पर्यायाच्या शोधात आहे. त्यादृष्टीने केसीआर यांना काँग्रेसचे दोनवेळा निवडून आलेले माजी खासदार धर्मण्णा सादूल हे गवसले आहेत. यंत्रमाग उद्योगासाठी तेलंगणा सरकारने दिलेल्या सवलती सोलापूरच्या विणकरांना आकर्षित करू शकतात.
दुसरीकडे पंढरपूर-मंगळवेढा भागातील राष्ट्रवादीचे दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके हेसुध्दा राष्ट्रवादीवर नाराज होऊन केसीआर यांच्या पक्षात सामील झाले आहेत. . पंढरपूर वारीच्या निमित्ताने भालके यांनी आपल्या सरकोली गावात आयोजिलेल्या शेतकरी मेळाव्यात केसीआर यांच्यासमोर शकूतिप्रदर्शन घडविले आणि हजारो समर्थकांसह बीआरएस पक्षात प्रवेश केला. ही बाब जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाय रोवण्यासाठी केसीआर यांनी पोषक ठरली आहे. याशिवाय काँग्रेसचे माजी आमदार विश्वनाथ चाकोते, सोलापुरात प्रभाव असलेले कर्नाटकातील माजी आमदार रवी पाटील, दक्षिण सोलापूर तालुक्यात स्वामी समर्थ सहकारी सूतगिरणीसह सिध्देश्वर सहकारी बँक व अन्य संस्थांचे अध्वर्यू राजशेखर शिवदारे, भाजपचे नेते माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या कन्या कोमल ढोबळे आदींनी केसीआर यांची भेट घेऊन बंद खोलीत चर्चा केली असून नव्या पर्यायाच्या शोधात असलेल्या या मंडळींना केसीआर यांचा बीएसआर खुणावतो आहे.