तेलंगणामध्ये ७२वी मिस वर्ल्ड स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेमुळे पर्यटनाला चालना देण्यासाठी एक पाऊल उचललं गेलं असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. तर, दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष भारत राष्ट्र समितीने या स्पर्धेच्या आयोजनावर होणाऱ्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

तेलंगणात होऊ घातलेल्या या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे. याबाबत अधिकृतरीत्या माहिती प्रसारित झाल्यावर बीआरएसचे ज्येष्ठ नेते के. टी. रामा राव यांच्या एक्सवरील पोस्टने नवा वाद सुरू झाला आहे. काँग्रेस सरकार एका सौंदर्य स्पर्धेवर २०० कोटी इतका सार्वजनिक पैसा खर्च करीत असल्याचा दावा राव यांनी केला. त्याशिवाय त्यांच्या सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावरील सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन यापेक्षा कमी किमतीत केले होते, असा खोचक टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला. याचं उदाहरण देताना राव यांनी २०२३ मध्ये हैदराबाद इथे फॉर्म्युला-ई स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. इलेक्ट्रिक कारचा समावेश असलेली ही पहिलीच स्पर्धा होती. असं असलं तरी या स्पर्धेतील आर्थिक अनियमिततेबाबत तेलंगणा एसीबी चौकशी करीत आहे.

रामा राव यांची एक्सवरील पोस्ट
“हैदराबादमध्ये फॉर्म्युला-ई स्पर्धेसाठी ४६ कोटी रुपये खर्च करणे चुकीचे होते आणि परिणामी या प्रकरणी खटले दाखल झाले आहेत. पण, मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेसाठी २०० कोटींइतका खर्च करणं योग्य आहे? हे चुकीचं नाही का? तुम्ही याबाबत स्पष्ट कराल का”, असे राव यांनी लिहिले आहे.

सरकार पैशाच्या विनियोगाबाबत गंभीर नाही, सरकारकडे निधीची कमतरता असताना असल्या इव्हेंट्स वर पैसा खर्च करणे योग्य नाही. राव यांनी केलेल्या दुसऱ्या पोस्टमध्ये राज्यात ७१ हजार कोटींची तूट असल्याचे म्हटले आहे. “नकारात्मक ध्येय धोरणांचा परिणाम नकारात्मक विकासात पाहायला मिळतो”, अशा शब्दात त्यांनी टीका केली.
राव यांच्याव्यतिरिक्त इतर पक्षांच्या नेत्यांनी अशी मते व्यक्त केली आहेत.

“आर्थिक शहाणपणा असेल, तर पैसे हातात येण्याआधी कधीही खर्च करू नयेत. दुर्दैवानं रेवंत रेड्डी यांच्या ही वस्तुस्थिती लक्षात येत नाही. फॉर्म्युला-ई स्पर्धा आयोजित करण्यावरून ते आधीच अडचणीत आहेत आणि आता ते मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी तब्बल २०० कोटी खर्च करण्याबाबत बोलत आहेत”, असे वक्तव्य विधान परिषद सदस्य दासोजू श्रवण यांनी केले आहे. “मिस वर्ल्ड स्पर्धेवर केला जाणारा खर्च पाहता काँग्रेसच्या चार हजार रूपये पेन्शन आणि महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांसाठी मासिक २५०० रुपये अशी निवडणूक आश्वासनं पूर्ण होतीलच याची हमी मिळणार नाही”, असेही श्रवण यांनी म्हटले.

दरम्यान, विरोधी पक्षाचे हे आरोप फेटाळत ते निराधार असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. तसंच प्राधान्य कशाला द्यावं हे पक्षाला माहीत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

काँग्रेसचे उत्तर
“रेवंत रेड्डी जर शिक्षणाबाबत गंभीर नसते, तर शाळांचं डिजिटल एकत्रीकरण करण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी २०० कोटींची तरतूद का केली असती? बेरोजगारी दूर करण्यासाठी सरकार शक्य तेवढे प्रयत्न करीत आहे. आम्ही सत्तेत आल्यापासून ५० हजारांहून अधिक सरकारी पदं भरण्यात आली आहेत. कोणतेही निराधार आरोप करण्यापूर्वी बीआरएसनं एकदा स्वत:कडे पाहावं”, असं उत्तर तेलंगणा युवक काँग्रेसचे सरचिटणीस शिवनाथ रेड्डी यांनी दिलं.

७ ते ३१ मेदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेची घोषणा करताना तेलंगणा सरकारनं सांगितलं, “या स्पर्धेमुळे प्रगतिशील, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध व पर्यटनपूरक राज्य म्हणून आपल्या राज्याची प्रतिमा आणखी ठळक होईल”. एकंदर या कार्यक्रमासाठी होणाऱ्या खर्चाबाबत राज्य सरकारनं कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

१९५१ मध्ये यूकेमध्ये सर्वांत पहिली मिस वर्ल्ड स्पर्धा पार पडली. त्यानंतर १९९८ मध्ये या स्पर्धेचं आयोजन पहिल्यांदाच भारतातील बंगळुरू इथे करण्यात आलं होतं. मागील वर्षात मुंबईत ही स्पर्धा पार पडली होती.

१९९८ मध्ये अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ‘अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड’मार्फत सौंदर्य स्पर्धा आयोजित केली होती. त्यावेळी या स्पर्धेला बराच विरोध झाला होता. परिणामी या स्पर्धेतली स्विम सूट फेरी सेशेल्स इथे घेण्यात आली होती.

अनेक ठिकाणी विरोध म्हणून आत्मदहनाचे प्रकार घडले. काहींना हा उपक्रम महिलांची प्रतिमा मलिन करणारा वाटला. काही हिंदू राष्ट्रवादी संघटनांना हा कार्यक्रम म्हणजे भारतीय संस्कृतीचं अध:पतन करण्यासाठीचा पाश्चिमात्य संस्कृतीचा डाव वाटला. विरोधाचा सूर वाढत गेल्यामुळे अखेर स्विमसूट स्पर्धा सेशेल्स इथे घ्यावी लागली असं न्यूयॉर्क टाईम्सच्या तत्कालीन वृत्तात म्हटलं आहे.