Telangana MLC Election Results : तेलंगणा राज्यात मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार सत्तेत आहे. मात्र, आता काँग्रेसला तेलंगणात मोठा धक्का बसला आहे. तेलंगणात विधान परिषदेच्या तीन जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत तीनपैकी दोन जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आहेत. तसेच एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली. काँग्रेसने फक्त एक जागा लढवली होती. मात्र, ती एक जागाही काँग्रेसला जिंकता आलेली नाही. त्यामुळे आता काँग्रेसवर टीका होत आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या या यशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून स्थानिक नेत्यांवर कौतुकाचा वर्षाव झाल्याचं पाहायला मिळालं आहे. जून २०१४ मध्ये तेलंगणाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच भाजपाकडे निवडून आलेले एवढे प्रतिनिधी आहेत. त्यामध्ये आठ आमदार (११९ पैकी), तीन एमएलसी (४० पैकी) आणि आठ खासदार (१७ पैकी) एवढे लोकप्रतिनीधी तेलंगणात आहेत.
यामध्ये सी अंजी रेड्डी यांनी मेडक-निजामाबाद-आदिलाबाद-करीमनगर पदवीधर मतदारसंघात ५ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे. या मतदारसंघात आतापर्यंत काँग्रेसचे टी जीवन रेड्डी प्रतिनिधित्व करत होते. मात्र, या निवडणुकीत सी अंजी रेड्डी यांनी विजय मिळवला. व्ही नरेंद्र रेड्डी यांनी चुरशीची लढत दिली. अंजी रेड्डी यांना सुरुवातीला पहिल्या पसंतीची आवश्यक मते मिळाली नाहीत. पण नंतर अंजी रेड्डी आणि नरेंद्र रेड्डी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली.
तसेच मलका कोमरैया यांनी मेडक-निजामाबाद-आदिलाबाद-करीमनगर शिक्षक मतदारसंघात प्रोग्रेसिव्ह रेकग्नाइज्ड टीचर्स यूनियन (PRTU) च्या व्ही महेंद्र रेड्डी यांचा पराभव करून विजय मिळवला. वारंगल-खम्मम-नलगोंडा शिक्षक मतदारसंघातील तिसरी एमएलसी जागा पीआरटीयूचे अपक्ष उमेदवार पी श्रीपाल रेड्डी यांच्याकडे गेली. आता या निवडणुकीचे निकाल हे फारसे आश्चर्यकारक लागले नसल्याचं बोललं जातं. कारण मेडक, निजामाबाद, आदिलाबाद आणि करीमनगर या चारही लोकसभा जागांवर भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. एम रघुनंदन राव मेडकमधून खासदार आहेत, तर डी अरविंद हे निजामाबादमधून खासदार आहेत. तसेच गौडम नागेश आदिलाबादमधून खासदार आहेत आणि केंद्रीय राज्यमंत्री बंदी संजय कुमार करीमनगरमधून खासदार आहेत.
दरम्यान, तेलंगणा राज्यात भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या या यशाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “एमएलसी निवडणुकीत भाजपाला जनतेने अभूतपूर्व पाठिंबा दिल्याबद्दल मी तेलंगणातील जनतेचे आभार मानतो. आमच्या नवनिर्वाचित उमेदवारांचे अभिनंदन करतो. मला आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे, जे लोकांमध्ये अतिशय मेहनतीने काम करत आहेत.”, असं मोदींनी म्हटलं. तसेच अमित शाह यांनीही प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “एमएलसी निवडणुकीत भाजपाला दणदणीत विजय मिळवून दिल्याबद्दल तेलंगणातील जनतेचे आभार. तुमचा विश्वास आम्हाला आणखी कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा देतो”, असं अमित शाह यांनी म्हटलं.
दरम्यान, बंडी संजय कुमार यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “मेडक-निजामाबाद-आदिलाबाद-करीमनगर शिक्षक आणि पदवीधर एमएलसी जागांवर १३ जिल्हे आणि ४२ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. त्यामुळे भाजपाला किती पाठिंबा आहे? या विजयावरून दिसून येतं. आमच्या पक्षाचे ए व्ही एन रेड्डी यापूर्वी महबूबनगर-रंगारेड्डी-हैदराबाद शिक्षक मतदारसंघातून विजयी झाले होते. या दोन जागांवर विजय मिळवत भाजपाने तेलंगणातील जवळपास ७० टक्के भागावर आपले वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. शिक्षक आणि पदवीधरांनी काँग्रेसचे खोटं आश्वासन नाकारलं आहे. गेल्या निवडणुकीत जनतेनं ‘बीआरएस’लाही नाकारलं होतं”, असं बंडी संजय कुमार यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटलं आहे.
भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विजयावरून असं दिसून येतं की पक्षाला प्रदेशातील शिक्षक आणि पदवीधरांचा पाठिंबा कायम आहे. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीदरम्यान देखील असाच पाठिंबा पाहायला मिळाला होता. तसेच केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी आणि इतर भाजपा खासदारांच्या मोठ्या प्रचारामुळे त्यांना या दोन्ही जागा जिंकण्यास मदत झाल्याचं जातं. दरम्यान, काँग्रेसचे नेते तथा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी एमएलसी निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार केला होता. मात्र, तरीही काँग्रेसला यश मिळालं नाही.