BRS Chief K chandrashekar rao comeback : भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत केसीआर यांच्या पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे गेल्या वर्षभरापासून ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. आता माजी मुख्यमंत्री मोठ्या तयारीने राजकीय मैदानात उतरणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, केसीआर यांच्या अनुपस्थितीत त्यांचे पुत्र आणि बीआरएसचे कार्याध्यक्ष केटी रामाराव हे पक्षाचे कामकाज सांभाळत आहेत.
२०१४ मध्ये तेलंगणा विधानसभेची स्थापना झाल्यानंतर केसीआर यांनी राज्याच्या राजकारणावर आपली मजबूत पकड ठेवली. दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या चंद्रशेखर राव यांना अत्यंत कमी कालावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली. मात्र, निवडणुकीतील पराभवानंतर काही काळ ते सक्रिय राजकारणापासून दूर गेले होते, त्यामुळे विरोधकांनी त्यांची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली होती. मात्र, केसीआर यांनी गेल्या आठवड्यात पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत.
आणखी वाचा : शालेय पोषण आहारातील अंडी आणि साखरेचा निधी बंद; महायुतीच्या निर्णयामागचं कारण काय?
के. चंद्रशेखर राव नेमकं काय म्हणाले?
३१ जानेवारीला माजी मुख्यमंत्र्यांनी बीआरएसच्या कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली. या बैठकीत ते कार्यकर्त्यांना म्हणाले, “मी काँग्रेस सरकारच्या हालचाली बारकाईने आणि शांतपणे पाहत आहे. रेवंत रेड्डी सरकारविरोधात राज्यातील नागरिकांचा असंतोष वाढत आहे. लवकरच आपण सत्ताधाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर देऊ.” यावेळी के. चंद्रशेखर राव यांनी जाहीर केलं की, काँग्रेस सरकारला लक्ष्य करण्यासाठी फेब्रुवारीच्या अखेरीस बीआरएसची जाहीर सभा घेतली जाईल. दरम्यान, “केसीआर हे बंद पडलेल्या चलनासारखे आहेत. पूर्वी त्यांचे मूल्य होते आणि आता त्यांना कोणीही महत्व देत नाहीत”, असं मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी म्हटलं आहे.
के. टी. रामाराव करणार बीआरएसचे नेतृत्व?
२०२३ च्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकून सत्तेत येण्याची किमया करून दाखवली. बीआरएसने सत्ता गमावल्यानंतर के. चंद्रशेखर हे राजकारणात फारसे सक्रिय दिसले नाहीत. विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना त्यांनी काही वेळासाठीच सभागृहात हजेरी लावली होती. लोकसभा निवडणुकीतही केसीआर यांनी पक्षातील मोजक्याच उमेदवारांचा प्रचार केला होता. त्यानंतर माजी मुख्यमंत्री नेमके गेले कुठे? असा प्रश्न तेलंगणातील नागरिकांसह बीआरएसच्या कार्यकर्त्यांना पडला होता. के. चंद्रशेखर राव यांच्या अनुपस्थितीत त्यांचे पुत्र के. टी. रामाराव, टी. हरीश राव आणि के. कविता यांनी पुढे येऊन पक्षाच्या कामकाजाची जबाबदारी घेतली.
काँग्रेस सरकारवर बीआरएसची टीका
बीआरएसच्या एका कार्यकर्त्याने सांगितले की, काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेला काही आश्वासने दिली होती. मात्र, सत्तेत आल्यानंतर ती पूर्ण केली नाही. सध्या केसीआर यांच्या अनुपस्थितीत पक्षाचे तिन्ही नेते काँग्रेस सरकारवर सातत्याने टीका करीत आहेत. गेल्या आठवड्यात के. टी. रामाराव यांनी नालगोंडा येथे आंदोलन करून रेवंत रेड्डी सरकारवर टीकेची तोफ डागली. सत्ताधाऱ्यांनी रायथू भरोसा योजनेचे हप्ते थकवले असून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीपासून वंचित ठेवलं, असा आरोप रामाराव यांनी केला.
के. चंद्रशेखर राव यांची भूमिका काय?
विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यानंतर केसीआर यांनी माघार का घेतली हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे. बीआरएसच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री अजूनही राजकारणात सक्रिय असून पडद्यामागून निर्णय घेत आहेत. पक्षाचा कोणताही निर्णय केसीआर यांच्या सहमतीनुसारच होतो. दरम्यान, माजी मुख्यमंत्री लवकरच पुन्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय होतील, असं पक्षातील एका नेत्याने सांगितलं.
पक्षाच्या नेत्यांच्या एका गटाचं म्हणणं आहे की, केसीआर यांनी भाऊ-बहिणीच्या जोडीला (के. टी. रामाराव आणि के. कविता) राजकारणात सक्रिय करण्यासाठी काही काळ विश्रांती घेतली. काहींनी त्यांची तुलना तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एम करुणानिधी यांच्याशी केली आहे. “एम के स्टॅलिन (सध्याचे मुख्यमंत्री) यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतरही करुणानिधी यांची पडद्यामागील भूमिका महत्त्वाची होती. केसीआर यांनी त्यांच्या मुलांना असे करण्याची संधी का देऊ नये? असा प्रश्न एका नेत्याने विचारला.
‘केसीआर राजकारणातून निवृत्त होणार नाहीत’
पक्षातील दुसऱ्या गटातील नेत्यांचं असं मत आहे की, माजी मुख्यमंत्र्यांना अत्यंत दिमाखात राजकीय पुनरागमन करायचं आहे आणि त्यासाठीच ते स्वत:ला वेळ देत आहेत. फक्त मुलांना राजकारणात सक्रिय होता यावे यासाठी केसीआर राजकारणातून निवृत्त होणार नाहीत, असा विश्वासही बीआरएसच्या नेत्यांनी व्यक्त केला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर बीआरएसला गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मोठा धक्का बसला. २०१९ च्या तुलनेत पक्षाचे मताधिक्य ४१.७ टक्क्यांवरून १६.७ टक्क्यांपर्यंत घसरले.
हेही वाचा : Political News : काँग्रेसची ईगल समिती नेमकं कसं काम करणार? कथित मतदार घोटाळ्यांचा छडा लागणार?
दुसरीकडे भाजपाला लोकसभा निवडणुकीत मोठा फायदा झाला. २०१९ च्या निवडणुकीत तेलंगणात भाजपाला फक्त दोन जागांवर विजय मिळवता आला होता. मात्र, २०२४ मध्ये पक्षाने जोरदार पुनरागमन केलं आणि ३५ टक्के मताधिक्यासह तब्बल आठ जागा जिंकल्या. २०१९ मध्ये राज्यात भाजपाला मिळालेलं मताधिक्य १९.६ टक्के इतकं होतं. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत बीआरएसने भाजपाला पडद्यामागून मदत केली होती. त्यामुळे माजी मुख्यमंत्री काही वर्ष सक्रिय राजकारणापासून दूर गेले आहेत, असा दावा रेवंती रेड्डी यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केला आहे.
केसीआर यांची लोकप्रियता कमी झाली का?
तेलंगणातील लोकसभा निवडणुकीत भाजपाला प्रचंड यश मिळाल्याने केसीआर यांची लोकप्रियता कमी झाली, असा चिमटाही काँग्रेसच्या नेत्यांनी काढला आहे. “तेलंगणात बीआरएसला पुन्हा सत्ता मिळवायची असल्यास त्यांना भाजपाकडे गेलेले आपले मतदार पुन्हा परत आणावे लागतील. यासाठी केसीआर यांना पुन्हा राजकारणात सक्रिय व्हावे लागेल. सध्या माजी मुख्यमंत्री भाजपावर एकही शब्द बोलत नाहीत. शक्यतो त्यांचे मनोमिलन झाले असावे”, असंही काँग्रेस नेत्यांनी म्हटलं आहे.
काँग्रेससह भाजपाला सभेतून उत्तर देणार
दरम्यान, बीआरएसच्या अंतर्गत सूत्रांनी असा दावा केला आहे की, येत्या जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री भाजपासह काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर देतील आणि राजकारणात सक्रिय होतील. “केसीआर यांची घोषणा अगदी स्पष्ट आहे. आम्ही केवळ भाजपालाच नव्हे तर काँग्रेसलाही प्रत्युत्तर देऊ,” असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले. आगामी काळात तेलंगणात होणाऱ्या निवडणुकांमध्ये बीआरएसला नक्कीच यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे के. चंद्रशेखर राव पक्षाच्या सभेत भाजपासह काँग्रेसला काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.