भाईंदर : २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचा बालेकिल्ला बनलेल्या मीरा-भाईंदर मतदारसंघातून यंदा विद्यमान अपक्ष आमदार गीता जैन की भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र मेहता या दोघांपैकी कुणाला आणि महायुतीच्या कोणत्या पक्षातून उमेदवारी मिळते याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. गुजराती-जैन-मारवाडी बहुसंख्येने असलेल्या या मतदारसंघात पाच वर्षांपूर्वी गीता जैन यांनी भाजपतून बंडखोरी करत तेव्हाचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा पराभव केला. मात्र गेल्या अडीच वर्षांत शिंदे यांच्या शिवसेनेच्या सहयोगी सदस्य असलेल्या गीता जैन या विद्यमान आमदार असल्याने या जागेवर शिंदेगटाकडूनही दावा केला जाण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुजराती-जैन-मारवाडी लोकसंख्येचे प्रमाण वाढल्याने गेल्या काही वर्षांपासून भाईंदर हा भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. २०१४ मध्ये राज्यात भाजपची सत्ता आली आणि मीरा-भाईंदर महापालिकेतही या पक्षाला एकहाती सत्ता मिळाली. गीता जैन यांची महापौरपदी निवड झाली. तेव्हापासूनच त्यांना आमदारकीचे वेध लागले होते. मात्र पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी २०१९ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत अपक्ष गीता जैन, भाजपचे नरेंद्र मेहता आणि काँग्रेसचे मुज्जफर हुसेन अशी तिरंगी लढत होती. त्यात जैन यांनी नजीकचे प्रतिस्पर्धी नरेंद्र मेहता यांचा १५ हजार ५२६ मतांनी पराभव केला. निवडून आल्यानंतर जैन यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांनी शिवसेनेची साथ धरली. शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच जैन यांनी शिंदेगटाला पाठिंबा जाहीर केला. मात्र, असे असले तरी, गेल्या अडीच वर्षांत त्या कधी भाजपच्या बैठकांना तर कधी शिवसेनेच्या कार्यक्रमांना उपस्थित असतात. त्यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी संभ्रम कायम आहे.

हेही वाचा…दिल्लीत पाणी तुटवडा, मुख्यमंत्री अटकेत आणि पक्षाला गळती; आप आमदाराने सोडला पक्ष

आगामी विधानसभा निवडणुकीत मीरा-भाईंदर मतदारसंघात महायुतीला पोषक वातावरण आहे. मात्र, गीता जैन आणि नरेंद्र मेहता यांच्यातील संघर्षही तीव्र झाला आहे. भाजपमधील हा संघर्ष वाढत ठेवण्यात शिंदेगटातील काही नेतेही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे समजते. गीता जैन या शिवसेनेच्या सहयोगी सदस्य असल्याने ही जागा शिवसेनेलाच मिळावी, असे शिंदेगटाचे म्हणणे आहे.

मीरा-भाईंदरमध्ये उमेदवारीवरून भाजपच्या गोटात सुरू असलेल्या चढाओढीचा फायदा घेऊन ही जागा आपल्या पदरात पाडून घेण्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे समजते.

हेही वाचा…पुन्हा काय झाडी, काय डोंगर? महाराष्ट्रात ‘हॉटेल पॉलिटिक्स’ परतण्यामागे काय आहे कारण?

अपक्ष लढण्याची तयारी

जैन आणि मेहता हे दोन्ही आजी-माजी आमदार सर्वार्थाने बलाढ्य मानले जातात. शिंदे शिवसेना आणि भाजपची महायुती असल्याने या दोन पक्षांपैकी एकाला तिकीट मिळणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी एकीकडे आमदारकीचे तिकीट मिळविण्याबरोबरच अपक्ष लढण्याचीदेखील तयारी सुरू केली आहे. गीता जैन यांनी मागील निवडणूक अपक्ष लढवून जिंकली होती. त्यासाठीचे डावपेच त्यांना माहीत आहेत. त्यांची एक टिम यासाठी काम करत आहे. मेहता यांनीही जोरदार तयारी सुरू केली असून महायुतीची उमेदवारी मलाच मिळणार असा त्यांचा दावा आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tensions rise in mira bhayandar constituency bjp stronghold faces candidature conflict between geeta jain and narendra mehta print politics news psg
Show comments