Pahalgam Terrorist Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला घडल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला. दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेबाबत देशभरातून संतप्त प्रकिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक पर्यटक जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकले होते. त्यांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारकडून मदत करत व्यवस्था करण्यात आली. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जम्मू-काश्मीर प्रशासन आणि तेथे अडकलेल्या पर्यटकांमधील समन्वयासाठी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जबाबदारी देऊन त्यांना श्रीनगरला पाठवण्यात आलं होतं.

तसेच पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला त्यांचे पार्थीव मुंबईत आणल्यानंतर त्या ठिकाणी भाजपा नेते आशिष शेलार आणि मंत्री मंगल प्रभात लोढा हे देखील उपस्थित होते. मात्र, दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील जम्मू आणि काश्मीरला गेले होते. तसेच काश्मीरमधून परतलेल्यांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर स्वागत करण्यासाठी शिवसेना (शिंदे) मंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील आणि योगेश कदम यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. दरम्यान, यावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे) यांच्यात एक प्रकारे पहलगाम मदतकार्यावरून श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तणाव निर्माण झाला नाही ना? असा सवालही आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी राज्य सरकारने मदतीसाठी योजना बनवली होती. त्यानुसार मदतही करण्यात आली. पण त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळी योजना आखत पर्यटकांना मदत केली. यातच शिवसेना (शिंदे) खासदार नरेश म्हस्के यांनी एक विधान केलं. जम्मू-काश्मीरला गेलेल्या लोकांना परत घेऊन येण्याबाबत बोलताना तिथे रेल्वेने गेलेली लोकं पहिल्यांदा विमानात बसत आहेत अशा आशयाचं विधान म्हस्के यांनी केलं. त्यानंतर आता म्हस्के यांच्या या विधानावरून शिवसेना (शिंदे) पक्षावर टीका होत आहे.

पहलगाममधील पर्यटकांना मदत करण्यावरून महायुतीत झालेल्या या श्रेयवादाची राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा अद्यापही सुरु आहे. यावरून विरोधकांनी महायुतीच्या सरकारवर टीका देखील केली आहे. दरम्यान, महायुतीच्या या श्रेयवादाच्या लढाईसंदर्भात बोलताना भाजपाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटलं की, “अशा संकटाच्या काळातही महायुतीत श्रेयवाद किंवा मतभेद दिसून येत आहेत. त्यामुळे सरकारसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. मग त्या तुलनेत विरोधकांनी चांगली परिपक्वता दाखवली आहे”, असं म्हटलं.

भाजपाच्या सूत्रांनी महायुतीमधील दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं उदाहरण दिलं. जे त्यांच्या मते शांतपणे काम करत आहेत आणि फडणवीसांना पाठिंबा देत आहेत. तसेच त्यांनी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी फोनवर चर्चा केली. तसेच महायुतीच्या श्रेयवादाच्या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आणि म्हटलं की, “याकडे राज्य किंवा राजकीय मुद्दा म्हणून पाहिले जाऊ शकत नाही. एकनाथ शिंदे असोत किंवा अजित पवार, दोघांनाही मुख्यमंत्र्‍यांच्या बरोबर त्यांचं मत शेअर करून फायदा होऊ शकतो. मात्र, एका सरकारमध्ये असताना तुम्ही दोन वेगवेगळे निर्णय घेऊ शकत नाहीत किंवा एकच गोष्ट तुम्ही वेगळी-वेगळी करू शकत नाहीत.”

राज्य सरकारच्यावतीने श्रीनगरमध्ये असताना मंत्री महाजन यांच्या भेटीबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता शिंदे म्हणाले की, “माझा उद्देश फक्त दहशतवादी हल्ल्यानंतर घाबरलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना वैयक्तिकरित्या आश्वासन देऊन आणि त्यांच्या घरी परतण्यासाठी पुरेशी व्यवस्था करून मदत करणे हाच होता.” त्यांनी असा दावा केला की श्रीनगरला पोहोचल्यानंतर लगेचच ७० पर्यटकांना एका विशेष विमानाने मुंबईत परतण्यास मदत केली आणि गुरुवारी आणखी दोन विमानांची व्यवस्था केली. तसेच या श्रेयवादावर बोलताना शिवसेनेच्या एका नेत्याने म्हटलं की, “भाजपाने याकडे दुर्लक्ष केलं होतं म्हणून त्यांनी हस्तक्षेप केला. जर भाजपाने महायुतीत असलेल्या सर्वांना विश्वासात घेतलं असतं आणि तर परिस्थिती अधिक चांगली झाली असती. त्यामुळे समन्वयाचा अभाव उघड झाला नसता”, असं म्हटलं.

दरम्यान, महायुती सरकारच्या कारभारावर एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. शिवसेनेला असं वाटतं की भाजपाने अजित पवारांना महायुतीत घेऊन एकनाथ शिंदे यांना एकप्रकारे बाजूला केलंय का? मग यामध्ये महायुतीमधील मंत्रिमंडाळाचं वाटप असो किंवा पालकमंत्री पदाचे वाटप असो. यासंदर्भात टीका करताना शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी म्हटलं होतं की, “एकनाथ शिंदे महाराष्ट्रात समांतर सरकार चालवत आहेत का? अशा परिस्थितीत प्रशासनावर देखरेख करणारे आणि निर्णय घेणारे मुख्यमंत्री असताना शिंदे श्रीनगरला का गेले?”