छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे ज्या मतदारसंघातून पाच वेळा निवडून आले त्या पैठण मतदारसंघात आता ठाकरे गटाने पुन्हा नव्या गडी आपल्या बाजूने ओढला आहे. पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे सचिन घायाळ यांना उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी प्रवेश देण्यात आला. या पुर्वी राष्ट्रवादीतून आलेल्या दत्ता गोर्डे यांना प्रवेश देण्यात आला होता. याच मतदारसंघातील सुदाम शिसोदे हेही शिवसेनेत आले. प्रत्येक भेटीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षात एक नवा गडी अधिक होताना दिसतो आहे. उद्धव ठाकरेंचे नेतृत्व नाकारणाऱ्या आमदारांच्या मतदारसंघातील बाजार समितीमधील संचालक, सरपंच, जिल्हा परिषद सदस्यांना पक्षात घेण्याचा सपाटा ठाकरे गटाने सुरू केला आहे. मात्र, साखरेच्या राजकारणातील नेतेही आता शिवसेनेमध्ये आवर्जून जाऊ लागल्याचे पहिल्यांदा दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Arvind Kejriwal Resignation: दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, केजरीवाल राजीनामा देणार; आता राजधानीची सूत्रं कुणाच्या हाती?

मराठवाड्यात ५४ साखर कारखाने. बहुतांश साखर कारखांनदार कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेस या दोनच पक्षात. संस्थात्मक रचना असणारे नेत्यांचा शिवसेना पक्षात जाण्याकडे कल तसा कमीच. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भाजपचे नेते हरिभाऊ बागडे वगळता अन्य साखर कारखान्याच्या व्यवस्थापनातील दोषामुळे अनेक प्रश्नचिन्ह उभे ठाकलेले. पैठणचा संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे गैरव्यवस्थापनामुळे हा कारखाना कोणास तरी चालवायला द्यावा असे प्रयत्न पैठणचे नेत संदीपान भुमरे यांनीच सुरू केले होते. अगदी गोपीनाथ मुंडे हयात असतानाही या कारखाना अन्य कोणीतरी चालवायला घ्यावा असे प्रयत्न सुरू होते. भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी पुढे यात लक्ष घातले आणि सचिन घायाळ यांनी हा कारखाना चालवायला घेतला. भाडे तत्त्वावर हा कारखाना चालविण्यास घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते गव्हाणीमध्ये मोळी टाकण्याचा कार्यक्रम झाला. तेव्हा या कारखान्याला गाळप परवानाही राज्य सरकारने दिला नव्हता. तेव्हा सचिन घायाळ यांचे भाजप नेत्यांबरोबर चांगले संबंध होते. आता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश घेतला आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या गटात साखर कारखांनदार आता येऊ लागल्याचे चित्र आहे. या पूर्वी परंडा मतदारसंघातील शंकर बोरकर यांनीही साखर कारखाना चालविण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनीही पूर्वी ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारले होते. औसा तालुक्यात दिनकर माने यांनीही काही दिवस किल्लारी साखर कारखाना चालविण्याचा प्रयत्न केला होता. असे माेजकेच प्रयत्न शिवसेनेतील काही कार्यकर्त्यांनी केले.

हेही वाचा >>> कारण राजकारण: दिग्रसमध्ये राठोड यांचा प्रचार भाजप करणार? ‘मविआ’कडून कोणाला उमदेवारी?

मराठवाड्यात साखर कारखाने, दूध संघ, बाजार समित्या, जिल्हा बँका या राजकारणावर केवळ कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्यांचाच वरचष्मा. जालन्यात राजेश टोपे, लातूरमध्ये अमित देशमुख, हिंगाेलीमध्ये जयप्रकाश दांडेगावकर, माजलगाव प्रकाश सोळंके, नव्याने बीड जिल्ह्यातून निवडून आलेले बजरंग साेनवणे ही मंडळी साखरेची गोडीतून राजकारण करणारे. भाजपमध्येही साखर कारखांनदारमंडळी गेली. अशोक चव्हाण यांच्यासारखा बडा नेताही साखरेचे राजकारण माहीत असणारा. अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारणारी मंडळी तर साखर कारखान्यातील अगदी छोट्या समस्या घेऊनही मंत्रालयात चकरा मारत असतात. राष्ट्रवादीतील नेत्याचा कारखाना हेच सत्ताकारणाचे प्रमूख केंद्र. पण शिवसेनेमध्ये ही मंडळी फारशी येत नव्हती. सचिन घायाळ यांच्या रुपाने शिवसेनेचे नेते साखरेच्या राजकारणात शिरकाव करत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray group strategy against mp sandipan bhumre dominance in paithan print politics news zws