शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे राज्यभरात शिवगर्जना आणि शिवसंवाद अभियान सुरू झाले असताना पश्चिम विदर्भात या अभियानाला कितपत प्रतिसाद मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पडझड रोखणे आणि पक्षसंघटना मजबूत करण्यावर या निमित्ताने भर दिला जाणार आहे. पश्चिम विदर्भातील शिवसेनेचे दोनही खासदार शिंदे गटात सामील झाले.
हेही वाचा- आता तरी सांगा सोलापूरचे ‘महेश कोठे’ कुणाचे ?
दुसरीकडे, बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे ठाकरे गटातर्फे एकाकी झुंज देत आहेत. अशा स्थितीत शिवसंवाद अभियानातून जुन्या आणि नवीन कार्यकर्त्यांची मोट बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवगर्जना आणि शिवसंवाद अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात उद्धव ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांसह, महिला आघाडी आणि युवा सेनेचे पदाधिकारी राज्याच्या विविध भागांचा दौरा करीत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने आमदारांचा या अभियानात समावेश नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का ठरला आहे. या निर्णयानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनी बैठका, चर्चा आणि राज्यातील विविध भागात दौरे करण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच पक्षाची पडझड रोखून संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न केले जाणार आहेत. या अभियानासाठी जिल्हावार पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आढावा घेण्यात येणार आहे. तसेच शाखांची माहिती, पदाधिकाऱ्यांची रिक्त पदे, स्थानिक प्रश्नांची माहिती या अभियानाद्वारे घेतली जाणार आहे.
हेही वाचा- Exit Polls: त्रिपुरा, नागालँडमध्ये भाजपा सत्ता राखेल; मेघालयमध्ये त्रिशंकू अवस्था
अमरावती विभागातील बुलढाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्याची जबाबदारी खासदार ओमराजे निंबाळकर, उपनेत्या सुषमा अंधारे, महिला आघाडीच्या शुभांगी पाटील, माजी आमदार रामकृष्ण मडावी, प्रवक्ते अनिल गाढवे यांच्यावर सोपविण्यात आली असून यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात शिवसेना नेते (ठाकरे गट) चंद्रकांत खैरे, सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार, युवासेनेचे हर्षल काकडे, शरद कोळी, दुर्गा शिंदे हे जनतेशी संवाद साधणार आहेत. राज्यात सत्तांतरानंतर पश्चिम विदर्भातील शिवसेनेचे अनेक नेत्यांनी एकतर शिंदे गटाची साथ देण्याचा निर्णय घेतला, तर काही नेते हे भाजपात सामील झाले. अमरावतीचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश वानखडे हे आता भाजपवासी झाले आहेत. अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचे समर्थक शिंदे गटात सहभागी झाले असले, तरी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी हे ठाकरे गटासोबत आहेत. शक्ती क्षीण झाली असली, तरी शिवसैनिकांचे पाठबळ हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे, हे दाखवण्यासाठी ठिकठिकाणी शक्तिप्रदर्शन केले जात आहे. विशेषत: ग्रामीण भागात हे जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे.