चंद्रपूर : बल्लारपूर या काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघावर शिवसेना( ठाकरे ) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) दावा केला आहे. यामुळे महाविकास आघाडीत रस्सीखेच पहायला मिळू शकते. राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यापासून मुनगंटीवार येथून सातत्याने विजयी होत आले. मात्र, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांचा पराभव केला.

यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास बळावला आहे. पारंपरिक मतदारसंघ असल्याने महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसलाच सुटणार, असे निश्चित मानले जात होते. मात्र, लोकसभा निवडणुकीतील विजयात आपलाही वाटा असल्याचा दाखला देत ठाकरे गट आणि शरद पवार गटाने आता या मतदारसंघावर दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचा सातत्याने पराभव झाला. यामुळे या निवडणुकीत जिल्ह्यातील सहा मतदारसंघांपैकी एक, विशेषत: बल्लारपूर हा मतदारसंघ मित्रपक्षांसाठी सोडावा, असे या दोन्ही पक्षांचे मत आहे.

हेही वाचा >>> नालासोपाऱ्यात महाविकास आघाडीला उमेदवार मिळेना

शरद पवार गटाच्या पुण्यात नुकत्याच झालेल्या मुलाखतींमध्ये येथील जिल्हाध्यक्षांनी या जागेसाठी आग्रह कायम ठेवला. दुसरीकडे, ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनीही हा मतदारसंघ सोडू नये, अशी गळ पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांना घातली.

यावरून बल्लारपूर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. ही जागा तीनपैकी कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

दावे-प्रतिदावे

– काँग्रेसकडून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांचा या मतदारसंघावर दावा कायम आहे. तथापि, ही जागा शरद पवार गटाच्या वाट्याला गेलीच तर आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी ‘फिल्डींग’ही लावून ठेवली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत त्यांनी केलेला मोटारप्रवास याच धोरणाचा भाग होता, हे सर्वश्रूत आहे.

हेही वाचा >>> तळोद्यात भाजप आमदाराविरोधात महाविकास आघाडीत इच्छुकांची रांग

– या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला संधी द्यावी, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकत्याच झालेल्या सभेत केले होते. जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी तर, हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळाला नाही तर सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील, असे जाहीर केले आहे. – शिवसेनेनेचे (ठाकरे) पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख आमदार भास्कर जाधव चंद्रपूर दौऱ्यावर आले असता, त्यांनी या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गट लढणारच, अशी घोषणा केली होती. यानंतर किशोरी पेडणेकर यांनीही तीच री ओढली होती.