पालघर जिल्हा मुख्यालयातील नगरपालिकेतील शिवसेनेच्या १९ पैकी नऊ नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाची पकड सैल झाली आहे. नगरपालिकेची मुदत एप्रिलमध्ये संपुष्टात येत असल्याने आगामी पालिका निवडणुकीत ठाकरे गटासमोर शिंदे गटाचे आव्हान असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालघर नगर परिषदेच्या सन २०१९ मधील निवडणुकीमध्ये २८ पैकी १४ सदस्य निवडून आले होत. शिवाय बंडखोरी केलेल्या पाच अपक्ष सदस्यांनी निवडणूकी नंतर शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. अशाप्रकारे २८ पैकी १९ सदस्य असलेल्या शिवसेनेतील नऊ सदस्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात अधिकृत प्रवेश केल्याने ठाकरे गटासमोर आव्हान उभे राहिले आहे.

२०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेला सर्वात मोठा पक्ष व नंतर अपक्षांच्या मदतीने बहुमत मिळविण्यात यश आले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर तसेच काँग्रेस व इतर मित्र पक्षांच्या पाठिंब्याने डॉ. उज्वला काळे या थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. नगरपरिषदेमध्ये त्यावेळेला भाजपाला सात व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दोन जागांवर विजय मिळवता आला होता. एकंदर पक्षीय बलाबल पाहता आपल्यावर काही काळाने अविश्वास ठराव आणला जाऊ शकेल ही शक्यता पाहता नगराध्यक्ष यांचे पती केदार काळे यांनी काँग्रेसच्या प्रवक्ते पदाचा राजीनामा देऊन काही महिन्यातच शिवसेनेत प्रवेश केला होता. तसेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी या पक्षाचे प्रवक्तपदी नेमणूक झाली होती.

पालघर मधील १९ शिवसेना नगरसेवकांपैकी काही नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते. अमोल पाटील, रवींद्र म्हात्रे, प्रियंका म्हात्रे या शिवसेनेच्या नगरसेवकांसह शेरबानू मेमन व प्रवीण मोरे या अपक्ष नगरसेवकांनी काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला होता. तरी देखील पुरेसे संख्याबळ नसल्याने स्वतंत्र गट स्थापन करण्यास शिंदे सेना यांनी प्रयत्न करण्याचे टाळले होते. नामनिर्देशित सदस्यांच्या नेमणुकीसाठी शिवसेनेमध्ये एकमत न झाल्याने तब्बल चार वर्षांचा कालावधी वाया गेला. त्यानंतर शिवसेनेच्या वाटेला असणाऱ्या दोन जागांपैकी एका जागेवर शिंदे गटाच्या सदस्याची निवड झाली. दुसऱ्या जागेवर दोन अर्ज आले दोन्ही अपात्र ठरले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या तसेच शिंदे सेनेच्या एका सदस्याचा अर्ज अपात्र ठरल्याने एक जागा रिक्त राहिली.

शिवसेनेच्या शिंदे गटाशी संलग्न झालेल्या सदस्यांपैकी बहुतांश सदस्यांना भरघोस निधीच्या आधारे विकास कामांना मंजुरी देण्यात आली होती. नगरपरिषदेची विद्यमान कार्यकारणीची मुदत एप्रिल २०२४ मध्ये संपुष्टात येत असून राज्यातील एकंदर परिस्थिती पाहता ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२४ पूर्वी नगर परिषदेची निवडणूक होण्याची शक्यता सध्या धुसर दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर शहराचा व आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी अतिरिक्त व मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून विद्यमान उप नगराध्यक्ष उत्तम घरत, ज्येष्ठ सदस्य सुभाष पाटील, चंद्रशेखर वडे तसेच दिनेश घरट या सदस्याने शिवसेना शिंदे गटाचा भगवा हाती धरला. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची पकड पालघर नगर परिषदेवरून सैल झाली असून शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष झाला आहे.

आगामी निवडणुका या शिवसेना – भाजपा तसेच राष्ट्रवादी – काँग्रेस अजित दादा गटामार्फत एकत्रितपणे लढवण्याचे एकंदर चित्र असताना पालघरमध्ये भाजपा हे नगराध्यक्ष पदावर लक्ष केंद्रित करून पक्षबांधणी करीत होते. अजून पर्यंत शिंदे गटाचा पालघर शहरावर विशेष प्रभाव नसल्याने नगराध्यक्ष पदासाठी त्यांचा दावा करण्याचा इरादा होता. मात्र सर्वसाधारण असणाऱ्या थेट नगराध्यक्ष पदासाठी विद्यमान उप नगराध्यक्ष तसेच सर्वात अनुभवी अशा उत्तम घरत यांनी पक्षांतर केल्याने पालघर मधील युती मधील अंतर्गत समीकरण बदलल्याचे दिसून आले आहे. पालघर शहराचे पालघर विधानसभेच्या निवडणुकीतील समीकरणांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान असून शिवसेना शिंदे गटाने त्या दृष्टिकोनातून सुरू केलेल्या प्रयत्नांना यश येताना दिसून आले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी सुरू झालेली ही गळती ही चिंतेची बाब असून आगामी काळात दोन्ही शिवसेनेच्या गटामध्ये होणाऱ्या पक्ष बांधणी व मजबुतीकरणाच्या प्रयत्नांवर निवडणूक काळातील भवितव्य ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackerays grip on palghar city has been loosened due to many corporators joining the shiv sena eknath shinde group print politics news dvr