Thane Vidhan Sabha Election 2024 ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एकहाती सत्ता असलेल्या ठाणे महापालिकेतील अनियमितते विरोधात सातत्याने शंखनाद करणारे भाजपा आमदार संजय केळकर यांच्यविषयी टोकाची नाराजी असताना राजन विचारे यांच्या उमेदवारीमुळे केळकरांमागे बळ उभे करावे लागत असल्यामुळे ठाण्यातील शिंदे सेनेच्या नेत्यांची अवस्था इकडे आड तर तिकडे विहीर अशी झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मतदार संघात केळकर यांच्या विरोधात प्रचार केला तर, त्याचा अप्रत्यक्ष फायदा ठाकरे गटाला होऊ शकतो. त्यामुळे काहीही झाले तरी केळकर यांच्या मागे बळ उभे करा असे आदेशच स्थानिक पदाधिकाऱ्यांना मिळाल्याने शिंदे सेनेचे नेते आता केळकर यांच्यासाठी गलो गल्ली प्रचार करताना दिसू लागले आहे.

हेही वाचा…Arvi Assembly Constituency : आर्वीत अखेर केचेंची माघार, म्हणतात माझा पक्षाला लाभच होणार

u

ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून भाजपचे संजय केळकर हे दोनदा निवडून आले आहेत. यामुळे महायुतीच्या जागा वाटपात ही जागा भाजपलाच मिळेल अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु या जागेवर शिंदेच्या सेनेतील माजी नगरसेवक संजय भोईर आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी दावा केला होता. संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेतील कामकाजावर तसेच बेकायदा बांधकामांवर आवाज उठवून पालिकेतील तत्कालीन सत्ताधारी शिंदेच्या सेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळेच त्यांच्या उमेदवारीला शिंदे सेनेतून विरोध होत होता. अखेर महायुतीच्या जागा वाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला गेली आणि भाजपने संजय केळकर यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. केळकर यांची उमेदवारी जाहीर होताच शिंदे सेनेचे संजय भोईर आणि मिनाक्षी शिंदे यांनी बंडखोरी करण्याची तयारी सुरू केली होती. केळकर यांच्याविरोधात अपक्ष निवडणुक लढण्याची तयारी दोघांनी सुरू केली होती. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा धर्म पाळण्याचे आदेश देताच, दोघांनी बंडाच्या तलावारी म्यान केल्या आहेत.

संजय भोईर, मिनाक्षी शिंदे या दोघांचे आणि केळकर यांच्यात विळा-भोपळ्यासारखे नाते आहे. यामुळे भोईर आणि शिंदे यांचे बंड शमले असे असले तरी ते दोघे केळकर यांचा प्रचार करणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. परंतु मतदार संघातील राजकीय समीकरण लक्षात घेता केळकर यांच्या उमेदवारीला संमती नसली तरी महायुतीचे उमेदवार केळकर यांचा प्रचार करण्याशिवाय शिंदे सेनेतील नाराजांपुढे दुसरा पर्याय शिल्लक नसल्याचे चित्र आहे. या मतदार संघात शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार राजन विचारे आणि मनसे उमेदवार अविनाश जाधव हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याशिवाय, अपक्ष उमेदवार आहेत. ठाकरे आणि शिंदे गट हे एकमेकांचे कट्टर शत्रु पक्ष आहेत. तसेच भाजप आणि ठाकरे गट हे सुद्धा एकमेकांचे शत्रुपक्ष आहेत. शिंदे सेनेतील नाराजांनी वेगळी भुमिका घेऊन केळकरविरोधी छुपा प्रचार केला आणि त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे ठाकरे गटालाही होऊ शकतो. त्यामुळेच ‘शत्रुचा शत्रु तो आपला मित्र’ या उक्तीप्रमाणे ठाकरे गटाला फायदा होऊ नये म्हणून शिंदे सेनेच्या नाराजांना केळकर यांच्या प्रचार करावा लागणार असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा…Manoj Jarange Patil in Assembly Election : मनोज जरांगे यांच्या निर्णयाने उमेदवार नाराज

केळकरांसाठी कामाला लागा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात ठाण्यातून राजन विचारे सहभागी झाले नव्हते. आपले प्रभावक्षेत्र असलेल्या भागातील खासदारच बंडात सहभागी झाला नसल्याने शिंदे यांनी अगदी सुरूवातीपासूनच राजन विचारे यांच्या विरोधात आक्रमक रणनिती अवलंबली होती. ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदर या महापालिकांमध्ये खासदार म्हणुन विचारे यांची डाळ शिजणार नाही अशी व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी तेथील प्रशासकांमार्फत करून ठेवली होती. विचारे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मिळेल त्या मार्गाने कोंडी करण्याचे प्रयत्न शिंदेसेने कडून केले गेले. लोकसभा निवडणुकीत विचारे यांचा पराभव करून शिंदे यांनी ठाण्यात वरचष्मा मिळवला. विधानसभा निवडणुकीत विचारे पुन्हा शहर मतदार संघात उभे असल्याने शिंदे यांच्यासाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची झाली आहे. केळकर यांच्या विषयी नाराजीचे नंतर पाहू आधी त्यांच्यासाठी कामाला लागा असे आदेशच पक्षाच्या पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत. काहीही झाले तरी विचारे निवडून येता कामा नये अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane assembly constituency sanjay kelkars strength with candidature of ubt rajan vichare for maharashtra vidhan sabha election 2024 print politics news sud 02