ठाणे : भाजपने टोकाचा आग्रह धरल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अखेर ठाणे लोकसभेची जागा आपल्या पक्षाकडे राखण्यात यशस्वी झाले आहेत. शिंदे यांचा बालेकिल्ला राहीलेल्या ठाणे महापालिकेतील राजकारण, अर्थकारणावर वर्षानुवर्षे प्रभाव राखणारे आणि एका अर्थाने येथील व्यवस्थेचे ‘कारभारी’ असलेले ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना ठाण्याची उमेदवारी जाहीर करत मुख्यमंत्र्यांनी उमेदवार कोण हा तिढाही सोडविला आहे. शिंदे यांच्या बंडानंतर आणि त्याही आधी शिवसेनेतील संघटनात्मक पातळीवरील कामकाजाची खडानखडा माहिती असणारा नेता म्हणून म्हस्के यांची ओळख आहे. असे असले तरी म्हस्के यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या स्वपक्षीयांची सख्याही काही कमी नाही. त्यामुळे या नाराजांची मनधरणी करत नवी मुंबईपासून मिरा-भाईदरपर्यत ताकद वाढलेल्या भाजपला सोबत घेण्याचे आव्हान मुख्यमंत्र्यांना पेलावे लागणार आहे.
शिवसेनाप्रणीत भारतीय विद्यार्थी सेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे म्हस्के हे ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेतील तसे परिचीत नाव आहे. आनंद दिघे यांच्या काळापासून विद्यार्थी संघटनेत कार्यरत राहीलेले म्हस्के यांचे पक्षातील राजकीय महत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षाचे जिल्हाप्रमुख पद असताना वाढले. ठाणे महापालिकेत सुरुवातीला स्विकृत नगरसेवक म्हणून त्यांची पक्षाकडून पाठवणी झाली. त्यानंतर २०१२ आणि २०१७ सालच्या महापालिका निवडणुकीत ठाण्यातील आनंदनगर भागातून म्हस्के मोठ्या मताधिक्याने निवडून आले. ठाणे महापालिकेतील दीड दशकांच्या कारकिर्दीत येथील राजकारण तसेच अर्थकारणावर म्हस्के यांनी मोठी पकड मिळवली. महापालिकेतील शिवसेनेचा चेहरा म्हणून म्हस्के कार्यरत राहीले. सर्वपक्षीय राजकारणाचा ‘समन्वयी’ कारभार हे ठाण्याचे राजकारणाचे वैशिष्ट्य राहीले आहे. ठाण्यातील काॅग्रेस, राष्ट्रवादी, भाजपमधील प्रभावी नेत्यांची मोट बांधून महापालिकेचा कारभार हाकण्यात म्हस्के तरबेज मानले जात. महापालिकेतील अर्थकारणावर प्रभाव राखणारी ही सर्वपक्षीय ‘टोळी’ नेहमीच चर्चेत असताना म्हस्के यांची राजकीय उंचीही याच काळात वाढत गेल्याचे पहायला मिळाले. महापालिकेच्या शेवटच्या अडीच वर्षात शहराचे महापौर पद त्यांच्याकडे सोपविण्यात आले. कोवीड महामारीमुळे त्यांचा महापौरपदाचा बराचसा काळ वाया गेला, मात्र शहरात वेगवेगळे सांस्कृतीक, सामाजिक उपक्रम राबवून नंतरच्या काळात ते प्रकाशझोतात राहीले.
हेही वाचा : “सूरतमध्ये जे झालं ते फारच वाईट, पण काँग्रेस डबघाईला आल्यास काय करणार?” विजय रुपाणींचा हल्लाबोल
आमदारकीचे स्वप्न अपुर्णच
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची काही दशकांची युती मोडली तेव्हा ठाणे विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून नरेश म्हस्के यांचे नाव सर्वात आधी पुढे आले होते. म्हस्के आणि भाजपच्या काही नेत्यांचे सलोख्याचे संबंध राहीले आहेत. त्यामुळे ठाण्यासाठी ते उमेदवार असतील अशी चर्चाही सुरुवातीला सुरु होती. मात्र उमेदवारी जाहीर करण्याच्या अखेरच्या टप्प्यात एकनाथ शिंदे यांनी म्हस्के यांच्याऐवजी रविंद्र फाटक यांना ठाण्याची उमेदवारी दिली. पुढे भाजपने संजय केळकर यांना उमेदवारी देऊन फाटक यांचा पराभव केला. ठाण्याची उमेदवारी मिळाली नाही याची खंत म्हस्के अजूनही जाहीरपणे बोलून दाखवितात. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडानंतर म्हस्के पहिल्या दिवसापासून त्यांच्यासोबत राहीले. मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीयांमध्ये ते ओळखले जातात. शिंदे यांच्या बंडानंतर विरोधी पक्षातील नेत्यांवर टिका करत ते प्रसिद्धीच्या झोतात राहीले खरे मात्र त्यांचे विरोधक त्यामुळे वाढले. ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या गटात रहाणाऱ्या माजी नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांना महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून त्रास दिला जात असल्याची टिका होत असताना या टिकेचे धनी म्हस्के ठरले. स्वपक्षासह मित्र आणि विरोधी पक्षातही जितके मित्र तितकेच शत्रुही निर्माण केल्यामुळे सतत चर्चेत राहीलेल्या म्हस्के यांच्यासाठी ठाण्याची उमेदवारी शेवटच्या टप्प्यात अपेक्षीत मानली जात होती.