ठाणे : महायुतीमधील चढाओढीच्या राजकारणात ठाणे लोकसभा मतदारसंघावरील दावा कायम ठेवत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटातून या मतदारसंघासाठी ठाणे शहराच्या माजी महापौर आणि पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुख मिनाक्षी शिंदे यांचे नाव पुढे आणण्यात आल्याचे विश्वसनिय वृत्त आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला भाजपच्या सहमतीनेच उमेदवारांची निश्चिती करावी लागत आहे. ठाण्याच्या जागेवर दावा सांगत असताना येथून महिला उमेदवार म्हणून मिनाक्षी शिंदे यांचे नाव पुढे आणण्यात आले आहे. शिंदे यांच्यासह माजी महापौर नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक आणि माजी आमदार रविंद्र फाटक ही नावेही चर्चेत आहेत
हेही वाचा : निवडणूक तोंडावर, सपाने बदलले १० जागांवरील उमेदवार; कारण काय?
लोकसभा निवडणुकांच्या अखरेच्या टप्प्यातील मतदानासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असली तरी महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यासह नाशीक, दक्षिण मुंबई, वायव्य मुंबई आणि पालघर या पाच मतदारसंघावरुन शिंदे सेना आणि भाजपमध्ये अजूनही रस्सीखेच सुरु आहे. संभाजीनगर येथील प्रचार सभेनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी नाशीकची जागा आम्हीच लढविणार असे जाहीर केले. हे करत असताना ठाण्यातील जागेविषयी अजूनही चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण मुंबईची जागा शिंदेसेनेला देण्याचे निश्चित होताच भाजपच्या स्थानिक पदाधिकारी तसेच नेत्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली. या जागेसाठी शिंदेसेनेकडे तुल्यबळ उमेदवार नसून नुकतेच राज्यसभेवर नियुक्त झालेले मिलींद देवरा यांची हा मतदारसंघ लढविण्याची इच्छा नसल्याचे सांगण्यात येते. दक्षिण मुंबईसह पालघर मतदारसंघही मुख्यमंत्र्यांना विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्यासाठी हवा आहे. वायव्य मुंबईतून कुणाला रिंगणात उतरवायचे याविषयी शिंदेसेनेत अजूनही स्पष्टता नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ठाण्यावरील दावा कायम ठेवला असून येथून वेगवेगळ्या उमेदवारांच्या नावांची चाचपणी केली जात आहे.
हेही वाचा : जातीय समीकरणं साधत काँग्रेसने हरयाणात जाहीर केले उमेदवार; भाजपाला रोखण्यासाठी विशेष डावपेच
महिला उमेदवाराचा प्रयोग ?
ठाणे लोकसभेसाठी शिंदेसेनेतून ओवळा माजीवड्याचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक आणि माजी महापौर नरेश म्हस्के अशा तीन नावांची चर्चा अगदी सुरुवातीपासून सुरु आहे. लोकसभा निवडणुक लढविण्यास सरनाईक सुरुवातीला इच्छुक नव्हते. मात्र वेगवेगळ्या नावांची चर्चा होऊ लागताच त्यांनीही आपण ठाणे लढविण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांना कळविल्याचे सांगितले जाते. रविंद्र फाटक यांचे नावही या शर्यतीत सुरुवातीपासून चर्चेत असले तरी संघटनेत सक्रिय राहीलेले नरेश म्हस्के यांना उमेदवारी मिळावी यासाठी पक्षाच्या काही माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांची मध्यंतरी भेट घेतल्याचे समजते. उमेदवारीसाठी पक्षात जोरदार स्पर्धा सुरु असताना ठाण्याच्या माजी महापौर आणि पक्षाच्या महिला विभागाच्या प्रमुख मिनाक्षी शिंदे यांचे नाव या स्पर्धेत पुढे आणण्यात आल्याचे वृत्त आहे.
हेही वाचा : हाथरस बलात्कार प्रकरणामुळे भाजपा अडचणीत? काँग्रेस-सपा भाजपाचा बालेकिल्ला भेदणार का?
कोण आहेत मिनाक्षी शिंदे ?
ठाणे महापालिकेत चितळसर-मानपाडा भागातून सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या मिनाक्षी शिंदे या २०१७ मध्ये ठाण्याच्या महापौर पदी विराजमान झाल्या होत्या. एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांमध्ये ओळखल्या जाणाऱ्या मिनाक्षी शिंदे या शिवसेनेतील बंडाच्या पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्र्यांसमवेत राहील्या आहेत. पक्षाच्या महिला विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर नवी जबाबदारी सोपवली होती. पक्षाच्या आक्रमक महिला नेत्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिनाक्षी शिंदे यांनी आठडाभरापुर्वी ठाण्यात सखी महोत्सवाचे आयोजन करत शिंदेसेनेकडून मोठे शक्तीपर्दशन केले होते. माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासमवेत संघटनेत सतत सक्रिया असणारा चेहरा म्हणून त्यांना ओळखले जाते.