डोंबिवली : ठाणे, नवी मुंबई आणि डोंबिवली या तीन शहरांच्या वेशीवर असलेल्या कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात यंदा पुन्हा एकदा आगरी समाजाच्या अस्मितेचा मुद्दा रंगतदार ठरु लागला आहे.

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा मुद्दा, याच मतदारसंघातील एका देवळात आगरी समाजातील एका महिलेवर झालेला बलात्कार आणि हत्या, वेगवेगळ्या स्थानिक विकास प्रकल्पात जमिनींचे संपादन होत असताना होणारी दिरंगाई यासारखे मुद्दे आतापासूनच येथील राजकारणात तापू लागले आहेत. २७ गावांची नगरपालिका आणि १४ गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्याच्या मुद्दयावरुनही येथील राजकारण तापू लागले असून तीन आगरी समाजातील उमेदवारांमधील ही लढाई त्यामुळे प्रतिष्ठेची बनली आहे.

हेही वाचा – नागपूरच्या देवगिरीवर फडणवीसांच्या उपस्थितीत रात्री अडीचपर्यंत बंडखोरांची समजूत घालण्यासाठी प्रयत्न

ठाण्याच्या वेशीवरील दिवा-आगासन पट्टा, नवी मुंबईच्या वेशीवरील तळोजा, डोंबिवली जवळील २७ गाव आणि भिवंडी परिसरातील काही गावे हा सगळा ठाणे तालुक्यातील आगरी बहुल समाजाचा चौकटबद्ध पट्टा मानला जातो. या भागातील आगरी समाज संघटितपणे जी भूमिका घेईल त्याचे राजकीय परिणाम एकेकाळी संपूर्ण जिल्ह्यावर दिसत असत. यावेळी कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणुकीत मनसेकडून राजू पाटील, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सुभाष भोईर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राजेश मोरे हे तीन आगरी समाजाचे नेते मैदानात आहेत. त्यामुळे आगरी अस्मितेचा मुद्दा येथे रंगतदार ठरु लागला आहे.

प्रश्न प्रलंबित, अस्वस्थता टोकाला

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या पुर्नवसनाचा प्रश्न तसेच डोंबिवलीजवळील २७ गावांमधील विविध प्रकारच्या नागरी प्रश्नांवर आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते दिवंगत दि. बा. पाटील यांनी स्थानिकांच्या लढ्याचे यापूर्वी नेतृत्व केले आहे. दि. बा. पाटील यांच्या कार्यपद्धतीचा पगडा या समाजातील उभरत्या नेत्यांवरही दिसतो आहे. अन्याय होत असेल तर संघटित व्हा आणि लढा, हा मंत्र घेऊनच या चौकटबद्ध भूभागातील आगरी समाज आपल्या विविध विषयांवर स्थानिक, शासन पातळीवर लढा देताना यापूर्वीही दिसला आहे. बाहेरील सामाजिक, राजकीय वातावरण काय आहे, यापेक्षा आपले नागरी, सामाजिक प्रश्न विषयांवर हा समाज सर्वपक्षीय भेद विसरून एक होतो, हेही या समाजाचे महत्वाचे वैशिष्ट्य ठरले आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराच्या प्रश्नासह इतर प्रलंबित प्रश्नांविषयी हा समाज पुन्हा एकदा एकवटल्याचे चित्र असून या निवडणुकीतही हे मुद्दे चर्चेत आले आहेत.

हेही वाचा – अमरावती जिल्‍ह्यात सूडाच्या राजकारणाचा दुसरा अंक!

अस्मितेसाठी संघर्ष ?

मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होत असताना उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेऊन भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला होता. या निर्णयासाठी आग्रह धरण्यात सुभाष भोईर यांच्यासारखे नेते त्यावेळी पुढे होते. राज्य सरकारने यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर करुनही केंद्र सरकारच्या स्तरावर अजूनही यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. १४ गावांचे हस्तांतरण, तेथील नागरी समस्या, २७ गावातील विकास केंद्र, २७ गावांची नगरपालिका, गावे कल्याण डोंबिवली पालिकेतून वगळणे, संजय गांधी उद्यानातील झोपडपट्टीधारक खोणी जवळील गावरान जमिनीवर आणणे या विषयावर आगरी समाज, नेत्यांनी पक्षभेद, अंतर्गत वैर विसरून एक दिलाने वेळोवेळी लढा दिला आहे. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त संघटना, २७ गावातील संघर्ष समिती या आगरी समाज संघटनांनी एकदिलाने महत्वाची भूमिका वेळोवेळी बजावली आहे. या निवडणुकीत पुन्हा हे प्रश्न चर्चेत आले असून राज्यातील महायुती सरकारला कोंडीत पकडण्याची खेळी महाविकास आघाडीकडून खेळली जात आहे. नवी मुंबई विमानतळ नामांंतराचा प्रश्न रेंगाळत पडला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावांना दहा वर्षांपूर्वी गावे पालिकेतून वेगळे काढतो, २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करतो ही आश्वासनेही जैसे थे आहेत. २७ गाव परिसरातील बेरोजगारीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी १०८९ हेक्टर क्षेत्रावर तेवढ्याच खर्चाचे विकास केंद्र उभारणीचे आश्वासन दिले होते. या विकास केंद्राचा प्रकल्प अधांतरी असल्यामुळे या निवडणुकीत या मुद्दयावरुन राजकारण रंगू लागले आहे.