ठाणे : राज्य पोलीस दलातील एक प्रभावी पोलीस अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण करणारे ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे बदलापूर विनयभंग प्रकरणातील प्रमुख आरोपीच्या चकमक प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, उल्हासनगर झपाटयाने नागरिकरण होत असलेल्या शहरांच्या कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी डुंबरे लिलया पेलतील अशी अपेक्षा असताना मागील दहा महिन्यांत त्यांची कामगिरी प्रभावशून्य राहील्याची टीका दबक्या आवाजात सुरु झाली होती. शहरात नामचिन गुंडांचा मुक्त वावर, जागोजागी या गुंडांचे लागणारे होर्डिग, खून-बलात्काराच्या वाढत्या घटना, शहरातील वाहतूक व्यवस्थेचे वाजलेले तीन-तेरा, काही भागात होणाऱ्या दंगली यामुळे डुंबरे सत्ताधारी महायुतीच्या गोटातही ‘नकोसे’ ठरतात की काय असे चित्र असतानाच बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या चकमकीनंतर सत्ताधारी ठाणे पोलिसांचे गोडवे गाऊ लागले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असलेल्या ठाण्यात डुंबरे यांची दहा महिन्यांपुर्वी पोलीस आयुक्तपदी निवड करण्यात आली तेव्हा ठाणेकरांनी या निवडीचे स्वागतच केले. जयजीत सिंह यांच्या लांबलेल्या आणि प्रभावहिन कामगिरीमुळे संपूर्ण पोलीस आयुक्तालयात कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती फारशी समाधानकारक नव्हती. याशिवाय ठाणे पोलीस आयुक्तालयात नियुक्त होणारे इतर वरिष्ठ अधिकारीही ’वरच्या”च्या संमतीने येत असल्याने पोलीस आयुक्तांचा पुरेसा धाक या अधिकाऱ्यांवर चालतो का हा प्रश्नही अनुत्तरीत असायचा. जयजीत यांच्यानंतर ठाणे पोलीस दलात कुणाचा वर्णी लागणार याविषयी वेगवेगळ्या नावांची चर्चा असताना आशुतोष डुंबरे यांच्या नावावर डिसेंबर २०२३ मध्ये राज्य सरकारने शिक्कामोतर्ब केले.
आणखी वाचा-Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त निवडणुकीच्या मैदानात उतरणार? कोण आहेत संजय पांडे?
ठाण्याचे सहपोलीस आयुक्त म्हणून डुंबरे यांची कारकिर्द गाजली होती. संवेदनशील विभागांचा तसेच दहशतवादी हालचालींची खडानखडा माहिती असलेला अधिकारी म्हणून डुंबरे यांची ओळख होती. शिवाय ठाणे शहरासाठी आवश्यक असलेला जनसंपर्क हीदेखील त्यांची उजवी बाजू मानली जात होती. त्यामुळे त्यांच्या निवडीचे सुरुवातीला स्वागतच झाले. ठाण्याची कायदा-सुव्यवस्था, येथील गुंडांचा वावर, वाहतूक व्यवस्थेची सुधारणा करण्याचे काम डुंबरे वेगाने हाती घेतील अशी ठाणेकरांची अपेक्षा होती. दहा महिने होत आले तरी या आघाडीवर फारशी सुधारणा दिसली नाही. पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांच्या काळात ठाण्याच्या वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले. नामचीन गुंडांचे होर्डिग्ज, बॅनर शहरात वाढतच गेले. ‘जो तो मी साहेबांचा माणूस’ याच आविर्भावात फिरत असल्याने पोलीसही गांगरुन गेल्याचे चित्र होते. याच काळात बदलापूरचे प्रकरण घडले. पोलिसांनी काही तासातच गुन्हा दाखल केला असे म्हणतात. मात्र आपली बाजू ठोसपणे मांडण्याचा शहाणपणा बदलापूरच्या पोलिसांना दाखविता आला नाही आणि जनसंपर्कासाठी नावाजले गेलेले आशुतोष डुंबरेही पडद्यामागेच राहीले.
आणखी वाचा-खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामीचे प्रकरण: उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर मानहानीचा खटला चालवणार
चकमक आणि महायुतीच्या गोटात उत्साह
बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी ठाणे पोलिसांनी चकमकीत ठार केले. या चकमकीनंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून विविध प्रश्न उपस्थित करत ठाणे पोलिसांच्या कार्यपध्दतीवर टीका होत आहे. एकूणच या चकमकीमुळे डुंबरे हे नव्या वादात सापडले असले तरी राज्य सरकार आणि महायुतीच्या गोटात या घटनाक्रमामुळे उत्साह संचारला आहे. या चकमकीनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करणारे पोस्टर समाज माध्यमांवर प्रसारित होत असून त्यात देवभाऊचा पॅटर्न वेगळा, असा मजकूर त्यात आहे.
शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन चकमक प्रकरणातील जखमी पोलीस अधिकारी संजय शिंदे आणि निलेश मोरे यांची भेट घेत त्यांचा सत्कार केला. याशिवाय महायुतीचे नेते पेढे वाटून आणि फटाके वाजवून पोलिसांचे आभार मानत आहेत. बदलापूर, भिवंडीच्या घटनेनंतर डुंबरे आता नको असे दबक्या सुरात बोलणारे महायुतीचे नेते ठाणे पोलिसांचे गोडवे गाऊ लागले आहेत. महत्वाचे म्हणजे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून प्रभावन्न्य ठरु लागल्याची टीका होत असताना टिीकेचा ‘भार’ उतरविल्याचे समाधान मात्र डुंबरे समर्थक अधिकाऱ्यांमध्ये दिसू लागले आहे.