अलिबाग : लाडकी बहीण योजनेची मुदत १५ ऑक्टोबरला संपत आहे. या पार्श्वभूमीवर बँक खात्याशी आधार जोडणी शिल्लक राहिलेल्या महिलांनी बँकांमध्ये मोठी गर्दी केली होती. अखेरच्या टप्प्यात तरी योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिलांची धडपड सुरू असल्याचे सोमवारी पाहायला मिळाले.
राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी १५ आक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. ही मुदत मंगळवारी संपत असल्याने बँकांमध्ये महिलांची झुंबड उडाली होती. बँकांच्या बाहेर महिलांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे बँक व्यवस्थापनाला दैनंदिन कामकाज काही प्रमाणात बाजूला ठेवून महिलांच्या आधार प्रमाणीकरणासाठी प्राधान्य द्यावे लागत होते. लाडक्या बहिणींची ही धडपड पाहून बँक व्यवस्थापनाची चांगलीच तारांबळ उडाल्याचे सोमवारी सकाळच्या सत्रात अनुभवायला मिळाले.
हेही वाचा >>>लोकसभेला फटका बसल्यामुळे ‘बहिणीं’ची आठवण; शरद पवार यांची टीका
शासनाच्या प्रत्येक योजनेचे पैसे हे लाभार्थी यांच्या खात्यात थेट जमा केले जात आहेत. त्यामुळे बँक खात्याला आधार लिंक अपडेट करणे आवश्यक आहे. आधार लिंक नसेल तर पात्र असूनही लाभ मिळत नाही. त्यामुळे अनेकजण लाभापासून वंचित राहतात. लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील ४० हजार महिलांना पात्र असूनही बँक खात्याला आधार लिंक नसल्याने वंचित राहिलेल्या आहेत. त्यामुळे या महिलांनी खाते आधार लिंक करून घ्या जेणेकरून योजनेचा लाभ खात्यात प्राप्त होईल, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाने केले आहे.
लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी सुरुवातीला ३० सप्टेंबरची मुदत देण्यात आली होती. अनेक महिला या लाभापासून वंचित होत्या त्यामुळे ही मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती. ही मुदत मंगळवारी संपत आहे. त्यामुळे आधार प्रमाणीकरण झालेले नाही अशा महिला बँकेत आल्या होत्या.