हर्षद कशाळकर

अलिबाग: रायगड जिल्ह्यात स्वबळावर वर्चस्व निर्माण करता येईल अशी ताकद एकाही राजकीय पक्षाकडे नाही. त्यामुळे युत्या आघाड्यांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेपर्यंतची वाटचाल करणे अपरिहार्य झाले आहे. त्यामुळे स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन सोयीस्कर युत्या आघाड्या करण्याचे धोरण राजकीय पक्षांनी स्वीकारले आहे.

जिल्ह्यात शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस असे पाच राजकीय पक्ष कार्यरत आहेत. बॅरिस्टर अंतुले आणि माणिकराव जगताप यांच्या निधनानंतर काँग्रेसची ताकद क्षीण झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शेकापलाही उतरती कळा लागली आहे. कोकणात फारसे अस्तित्व नसलेल्या भाजपने हळुहळू उत्तर रायगडात जम बसवला आहे. पण दक्षिण रायगडात त्यांचे स्थान नगण्य आहे. जिल्ह्यातील दोन्ही विभागात संघटनात्मक बांधणी असलेला शिवसेना हा एकमेव पक्ष होता. मात्र फूट पडल्यानंतर त्याचा परिणाम पक्षाच्या पुढील वाटचालीवर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस श्रीवर्धन आणि कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघापुरता सीमित झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात स्वबळावर निर्विवाद वर्चस्व निर्माण करू शकेल असा एकही पक्ष शिल्लक राहिलेला नाही. याची जाणीव सर्वच राजकीय पक्षांना आहे.

हेही वाचा: अमित सामंत : वचनपूर्तीसाठी धडपड

त्यामुळे स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन सोयीस्कर युत्या आघाड्यांकरण्यावर राजकीय पक्षांनी भर दिला आहे. नवीन राजकीय समीकरण जुळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. जिल्ह्यात १७१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. डिसेंबर महिन्यात या निवडणुका होत आहेत. त्यानंतर नऊ नगरपालिका, एक महानगरपालिका, पंधरा पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. त्यामुळे स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन सोयीस्कर आघाड्या करण्याचे धोरण सर्वच राजकीय पक्षांना घ्यावे लागणार आहे.
याची प्रचीती नुकत्याच पार पडलेल्या खालापूर नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेतून सहभाग काढून घेतल्यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेना गटाने शेकापशी सलगी केली आहे. त्यामुळे शेकापच्या संतोष जंगम यांची उपनगराध्यक्षपदावर वर्णी लागली आहे. त्यामुळे विरोधी पक्षात बसलेला शेकाप पुन्हा एकदा सत्तेत आला आहे.

हेही वाचा: महाराष्ट्रात काँग्रेसचा आवाज वाढणार

शेकापच्या सध्याच्या या परिस्थितीला राष्ट्रावादी काँग्रेस जबाबदार असल्याची शेकाप नेत्यांची धारणा आहे. त्यामुळे असंगाशी संग यापुढे नकोच असा शेकाप नेत्यांचा आग्रह आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नवीन राजकीय समीकरणासाठी शेकाप प्रयत्नशील आहे. शिवसेनेतील फूट ही राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणार असली तरी त्यांना चांगल्या जोडीदाराची गरज भासणार आहे. उत्तर रायगडात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची युती स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणकीत कायम राहू शकणार आहे. मात्र त्याच वेळी दक्षिण रायगडात भाजपचे अस्तित्व फारसे नसल्याने इथे स्थानिक पातळीवर एखादा जोडीदार सोबत घ्यावा लागणार आहे. यासाठी वेळ पडल्यास शेकापशी जळवून घेण्याचा प्रयत्न बाळासाहेबांची शिवसेना गटाकडून होऊ शकणार आहे. अलिबाग मात्र शेकापशी जुळवून घेण्यात त्यांची अडचण होणार आहे.त्यामुळे एकूण परिस्थिती लक्षात घेता राजकारणातील सोयीस्कर आघाड्यांचा रायगड पॅटर्न आगामी काळात पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Story img Loader