शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून वर्षानुवर्षे ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात झपाट्याने विस्तारू लागलेल्या भाजपला सध्या ग्रामीण पट्ट्यात केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील आणि राज्य मंत्री मंडळातील समावेशासाठी आस लावून बसलेले किसन कथोरे या दोन दिग्गज नेत्यांमधील टोकाचा विसंवाद सतावू लागला आहे. राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षातून आयात केलेल्या या दोन नेत्यांच्या जोरावर भाजपने भिवंडी, शहापूर, मुरबाड या पट्ट्यात उत्तम मांड बसवली आहे. जिल्हा परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांचे बहुमत असले तरी पाटील, कथोरे यांचा प्रभाव मात्र ग्रामीण पट्ट्यात कायम आहे. असे असताना या दोन नेत्यांमधील मतभेद मात्र दिवसागणिक वाढू लागल्याने ठाणे जिल्हा पदाक्रांत करण्याचे स्वप्न पहाणाऱ्या भाजप श्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून प्रत्येक लोकसभा मतदारसंघात भाजपकडून महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे. यासाठी केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील यांनी सोमवारी कल्याणमध्ये मोठे अभियान घेतले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भाजप नेते टी.सी.रवी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या अभियानास कथोरे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. भिवंडी लोकसभेच्या प्रमुखपदी नुकतीच मधुकर मोहपे यांची नियुक्ती करण्यात आली. हे मोहपे आमदार कथोरे यांच्या कट्टर विरोधकांपैकी एक मानले जातात. मोहपे यांचे भिवंडी लोकसभा मतदारसंघात जागोजागी फलक लागतात. त्यात कथोरे यांची छबी जाणीवपूर्वक टाळली जाते असा त्यांच्या समर्थकांचा आरोप आहे. याशिवाय मंत्री पाटील आणि आमदार कथोरे यांच्यात स्थानिक पातळीवर सतत धुसफूस सुरू असते. हे दोन्ही नेते एका व्यासपीठावर येणे टाळतात असे चित्रही सातत्याने पहायला मिळत आहे.

हेही वाचा – देशातील नद्यांना आजार एक.. सरकार ब्युटी पार्लरमध्ये, राजेंद्र सिंह काय म्हणाले?

शिंदे, फडणवीसांची जवळीक पाटलांच्या पथ्यावर

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपने वेगवेगळ्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला होता. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सुरुवातीला तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. त्यावर ठाणे, रायगड जिल्ह्यातील आगरी, कोळी बहुल पट्ट्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटलेली पहायला मिळाली. या विमानतळास प्रकल्पग्रस्तांचे लोकप्रिय नेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यावरून ठाणे, रायगड जिल्ह्यातील आगरी, कोळी समाज एकवटला. या आंदोलनाला भाजपची उघडपणे साथ होती. याचा फायदा पुढे कपील पाटील यांना मिळाला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात पाटील यांची वर्णी लावत देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे, रायगड जिल्ह्यात बहुसंख्य असलेल्या आगरी समाजाला खूष करण्याचा प्रयत्न केला. भिवंडी परिसरात अमर्याद साधन, सामुग्री उभी करणारे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही सख्य राखले आहे. शिंदे, फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक आणि केंद्रीय मंत्रिपद यामुळे पाटील यांचा वारू ग्रामीण पट्ट्यात चौखूर उधळलेला सध्या पहायला मिळत आहे. जुळवाजुळवीच्या या गणितात कथोरे मात्र मागे राहिल्याने त्यांची मात्र कोंडी होऊ लागली आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात आपली वर्णी लागेल या आशेवर कथोरे आहेत. सलग चार वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून येणारे आमदार म्हणून अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड पट्ट्यात त्यांची मोठी ताकद आहे. असे असतानाही पक्षीय राजकारणात कपील पाटील यांच्यामुळे आपली कोंडी होत असल्याची भावना कथोरे समर्थकांमध्ये वाढीस लागली आहे.

हेही वाचा – बुलढाणा : समृद्धी महामार्गावर अपघातापाठोपाठ आता इंधन चोरीचे सत्र!

वाढती नाराजी पक्षासाठी डोकेदुखी

राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आल्यावर पहिल्याच प्रयत्नात भिवंडी लोकसभा मतदारसंघातून पाटील मोदी लाटेवर निवडून आले. मात्र त्यांना निवडून आणण्यात जसे अनेकांनी प्रयत्न केले, त्यात मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांचा मोलाचा वाटा राहीला. केंद्रात मंत्री झाल्यानंतर आपला माणूस मंत्री झाला म्हणून दिल्लीला जाऊन पाटलांचा सत्कार करणारे कथोरे हे राज्यातील पहिले आमदार. ग्रामपंचायतीपासून आमदारकी असा प्रवास करणाऱ्या कथोरे यांनी विकासाची गंगा बदलापूर, मुरबाड पट्ट्यात आणली हे त्यांचे विरोधकही खासगीत मान्य करतात. सरकार कोणाचेही असो शासकीय अधिकाऱ्यांशी त्यांचा असलेला सलोखाही नेहमीच चर्चेत राहिला. मात्र पाटलांच्या माध्यमातून आपली जागोजागी कोंडी होत असल्याची भावना त्यांच्यात अलिकडे वाढू लागली आहे. मुरबाड बाजार समिती निवडणुकीत कथोरेंचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी प्रतिस्पर्ध्यांना बळ देण्यात मंत्री पाटील पुढाकार घेतात, अशी कुजबूज आहे. पाटलांचा ताठ बाणा आणि कठोर वागणुकीचा सर्वाधिक फटका कथोरे समर्थकांनाच बसतो असेही बोलले जाते. ही धुसफूस ठाणे जिल्ह्यात विस्तारणाऱ्या भाजपसाठी मात्र धोक्याची घंटा ठरू लागली आहे.