नागपूर: केंद्र आणि राज्य अशा दोन्ही ठिकाणी सत्तेत असूनही भारतीय जनता पक्षातर्फे विविध मुद्यांवर नागपुरात केली जाणारी आंदोलने विरोधी पक्षाची जागा (स्पेस) भरून काढणारी ठरली आहे. सामान्यपणे सताधारी पक्ष आंदोलनाचा मार्ग स्वीकारत नाही. सत्ताधारी पक्षाचे काम सरकारच्या धोरणाचे समर्थन करणे असते आणि विरोधी पक्षाचे हे काम असते.
सरकारच्या धोरणातील उणीवा शोधून त्या जनतेपुढे मांडण्यासाठी आंदोलने केली जातात. पण २०१४ नंतर राजकारणात जे अनेक बदल झाले, त्यात सत्ताधा-यांनीच विरोधकांची भूमिका बजावणे आणि त्यांची राजकारणातील जागा व्यापणे याचाही समावेश आहे. विधिमंडळात सत्ताधा-यांनीच कामकाज बंद पाडल्याचे अनेक २०१४ नंतरच पाहायला मिळाली. विधीमंडळाच्या बाहेरही हेच चित्र आहे. नागपुरात मागील आठवड्यात झालेली दोन आंदोलने याचे उत्तम उदाहरण ठरावे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात ई. डी. ने केलेल्या कारवाईच्या विरोधात कॉंग्रेस देशभर आंदोलन करीत असतानाच भाजपची युवा शाखा भाजयुमोने नागपुरात आंदोलन केले. ते कॉंग्रेसच्या विरोधात होते की गांधी कुटुंबाच्या विरोधात? की ई. डी. कारवाईच्या समर्थनार्थ? स्पष्ट झाले नाही. मात्र वातावरण निर्मिती, प्रसिद्धी उत्तम झाली.
दुसरे आंदोलन भाजप आमदार प्रवीण दटके यांनी विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या विरोधात केले. त्यांनी चक्क पाणी पुरवठ्याचे काम करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठोकून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली सक्रियता दाखवून दिली. अशाच प्रकारचे आंदोलन भाजप नेते बाल्या बोरकर यांनी स्थानिक प्रश्नावर केले.
एकूणच २०१४ ते आतापर्यंत दोन वर्षाचे मविआ सरकार सोडले तर भाजप सत्तेत आहे. पण त्यांच्यातील आंदोलनजीवी वृत्ती संपलेली नाही असे दिसून येते. या संदर्भात भाजपच्या स्थानिक नेत्याला विचारणा केली असता ते म्हणाले, कार्यकर्ते सक्रिय राहण्यासाठी विविध कार्यक्रम, आंदोलने करणे आवश्यक आहे. अन्यथा कार्यकर्ते सुस्त होतात. प्रदीर्घ काळ कॉंग्रेस सत्तेत होती त्यामुळे सुस्तावले होते, भाजपचे तसे होऊ नये.
विरोधकांची जागा बळकावली
दहा वर्षांपासून राज्यात आणि मागील १५ वर्षापासून महापालिकेत सत्तेबाहेर असलेल्या कॉंग्रेसची स्थिती मरगळल्या सारखी आहे. त्याचा फायदा घेत भाजप आता सत्ताधारी आणि विरोधक अशा भूमिका बजावत आहे. शहर कॉंग्रेसचे प्रवक्ते अभिजित झा यांनी मात्र कॉंग्रेस मरगळल्याचा आरोप फेटाळून लावला. पक्षातर्फे नेहमीच आंदोलने केली जातात मात्र सत्ताधारी ते दडपण्याचा प्रयत्न करतात. सत्तेत असून भाजपला आंदोलने का करावी लागते हाच खरा प्रश्न आहे, असे झा म्हणाले.