नागपूर : दिल्लीनंतर तेवढ्याच भव्य-दिव्य स्वरुपात नागपूरमध्ये होत असलेले भाजप पक्ष कार्यालय त्याच्या भूमिपूजनापासूनच चर्चेत आले आहे. यासाठी निमित्त ठरले ते भूमिपूजनाला झालेली नेत्यांची भाषणे. कार्यकर्ते, नेत्यांनी काय करावे, काय करू नये, असा सल्ला देताना नेतृत्वाने कार्यालय आपल्या ‘घर’, ‘परिवारा’ प्रमाणे असावे, तेथे फक्त सिमेंटच्या ‘ भिती’ नसाव्या तर त्यात जिव्हाळा असावा,असे सांगितले. नेत्यांचे हे बोल व्यासपीठावर बसणाऱ्यांसाठी होते की, पुढे बसलेल्या कार्यकर्त्यांसाठी ? हे स्पष्ट झाले नाही. पण त्याची चर्चा मात्र सुरू झाली आहे.
२०१४ मध्ये ठरलेले व २०१९ मध्ये बांधकाम पूर्ण करण्याचे निश्चित झालेल्या भाजपच्या नागपूरमधील शहर-ग्रामीण-विभागीय अशा एकत्रित कार्यालयाचे भूमिपूजन रविवारी रामनवमीच्या शूभमुहूर्तावर झाले. अपेक्षेप्रमाणे कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या तीन नागपूरकर नेत्यांसह जिल्ह्यातील सर्व आजी-माजी आमदार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षाच्याच कार्यालयाचे भूमिपूजन असूनही मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमासाठी फारच कमी वेळ दिला. त्यामुळे त्यांचे भाषणही अल्पवेळेचे झाले.पण त्यांनी आपल्या कमी वेळेतील भाषणात कार्यकर्त्यांना अनेक सल्ले दिले. कार्यालयाला आपल्या घराप्रमाणे माना, हे भाजपचेच नवे घर आहे, तेथे परिवाराप्रमाणे एकत्रित नांदा,असे मुख्यमंत्री म्हणाले. याचा अर्थ कार्यकर्ते आत्ता गुणागोविंदाने एकत्रितपणे नांदत नाही, असा होतो, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना असा सल्ला का द्यावा लागला प्रश्न पडतो.
मुख्यमंत्र्यानंतर भाषण झाले ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे. त्यांनी त्यांच्या नावलौकिकाप्रमाणे शाब्दिक फटकेबाजीही केली ती नेेत्यांना जशी लागू होणारी होती तशीच ती उपस्थित नेत्यांचे कान टोचणारीही ठरली. प्रस्तावित कार्यालयाची भव्य-दिव्यता सांगणारे बावनकुळे यांनाही गडकरी यांनी कानपिचक्या दिल्या. ते म्हणाले. कार्यालय हे स्वत:च्या घराप्रमाणे असावे पण घरा:घरात असणारे आपसी वाद त्यात नसावे. नुसत्याच सिमेट क्रॉंक्रिटच्या भिंती नसाव्या तर त्यात कार्यकर्त्यांप्रती आपुलकीचा जिव्हाळाही असावा. त्यांच्याविषयी प्रेम असावे, त्यांच्याच मुळे पक्ष आज मोठा झाला आहे. त्यामुळे त्यांचा विसर पडू देऊ नका, निवडणुका आल्यावर तिकीट वाटप करताना ‘परिवार’ आठवू नका, कार्यकर्त्यांना संधी द्या, असे गडकरी म्हणाले. गडकरी यांनी तर व्यासपीठावर बसलेल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांनी कोणत्या चुका करू नये हे सुद्धा सांगितले. एकूणच पक्षात कार्यकर्त्यांची अवस्था काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. दोन वर्षात हे कार्यालय पूर्ण करण्याचा संकल्प नेत्यांनी केला. भूमिपूजनाचा कार्यक्रम नेत्यांच्या भाषणातील खड्या बोलांमुळे गाजला. त्याची चर्चा कार्यक्रमानंतर सुरू झाली आहे.
© The Indian Express (P) Ltd