मुंबई : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ‘पद्माविभूषण रतन टाटा कौशल्य विद्यापीठ’ असे या विद्यापीठाचे नाव असेल. ज्येष्ठ उद्याोगपती रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतींचे जतन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दमणगंगा, वैतरणा, गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता
दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस आणि दमणगंगा वैतरणा, गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे.
दमणगंगा-एकदरे-गोदावरी या योजनेतून मराठवाड्यातील १० हजार ११ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होईल. तसेच ६८.७८६ दलघमी पाणी सिंचनासाठी, १३.७६ दलघमी पाणी पिण्यासाठी आणि ९.१७ दलघमी पाणी उद्याोगासाठी उपलब्ध होणार आहे. यापूर्वी दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणातून पाणी वळविण्याच्या योजनांना मान्यता देण्यात आली आहे. आंतरराज्यीय दमणगंगा-पिंजाळ, नदीजोड प्रकल्प व नारपार गिरणा नदी योजना, पार-गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे-गोदावरी या नदीजोड प्रकल्पांना राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राबविण्याचे ठरले आहे. या प्रकल्पाची किंमत दोन हजार २१३ कोटी रुपये आहे.
हेही वाचा >>>लोकसभेतील पराभवानंतर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार विधानसभेच्या तयारीला
दमणगंगा वैतरणा गोदावरी नदी जोड योजनेच्या १३ हजार ४९७ कोटी २४ लाख किंमतीच्या प्रकल्पास देखील मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे दमणगंगा व वैतरणा उपखोऱ्यातील ५.६८ टीएमसी अतिरिक्त पाणी स्थानिक वापरासाठी व नाशिक जिल्ह्यातील अवर्षणप्रवण सिन्नर तालुका आणि मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्राला उपलब्ध होईल.
वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता
वैजापूर तालुक्यातील शनीदेवगाव उच्चपातळी बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. हा बंधारा गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत गोदावरी खोऱ्यात असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील या प्रकल्पामुळे ८.८४ दलघमी पाणी साठा निर्माण होणार आहे. त्यामुळे १९७८ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळेल. या बंधाऱ्याच्या बुडीत क्षेत्रातील नादुरुस्त अवस्थेतील कमालपूर व खानापूर या कोल्हापुरी बंधाऱ्यांचा पाणी वापर शनीदेवगाव बंधाऱ्यातून करण्यात येईल.
मिरजच्या शासकीय वैद्याकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे
मिरजच्या शासकीय वैद्याकीय महाविद्यालयात अतितात्काळ उपचार (इमर्जन्सी मेडिसिन)ची ३ पदे निर्माण करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सहयोगी प्राध्यापक, फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन, साथरोग तज्ज्ञ, अभिरक्षक, रसायन शास्त्रज्ञ, सुरक्षा निरीक्षक आदी ६ पदे रद्द करून ही तीन पदे नव्याने निर्माण करण्यात येतील.
अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास महामंडळासाठी अभ्यासगट
अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास महामंडळासाठी अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या तरुणांना उद्याोग आणि स्वयंरोजगारासाठी विविध योजना राबविण्यात येतील.
हेही वाचा >>>Maharashtra Election 2024: काँग्रेसमध्ये उमरखेडसाठी सर्वाधिक इच्छुक, दिग्रसमध्ये केवळ दोन!
समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांसाठी योजना
समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर अॅडव्हान्समेंट योजना लागू करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. १ जानेवारी २०१६ पासून या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी ४५ कोटी ९८ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या योजनेचा एक भाग म्हणून ही योजना इतर महाविद्यालयांना लागू आहे. त्यामुळे तिचा लाभ समाजकार्य महाविद्यालयातील अध्यापकांना लागू करण्याची मागणी होती.
सेवा खंड झालेल्या वैद्याकीय अधिकाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना
सेवा खंड झालेल्या वैद्याकीय अधिकाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सेवा खंड झालेल्या महाराष्ट्र वैद्याकीय व आरोग्य सेवा ‘गट-अ ’ संवर्गातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी अस्थायी सेवेत रुजू झालेले तसेच २ फेब्रुवारी २००९ रोजीच्या अधिसूचनेव्दारे समावेशन झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित या निवड मंडळामार्फत नियुक्त झालेल्या वैद्याकीय अधिकाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.