सांगली : तासगावमधील पंचवीस वर्षापुर्वीचा आबा-काका यांच्यातीन राजकीय संघर्ष कवठेमहांकाळ नगरपंचायत नगराध्यक्ष निवडीवरून पुन्हा डोके वर काढत आहे. कवठेमहांकाळ नगराध्यक्ष निवड दि.१० ऑक्टोंबर रोजी होत आहे. पुढच्या महिन्यात विधानसभेची निवडणुक होत असून या पार्श्‍वभूमीवर कवठेमहांकाळची नगराध्यक्ष निवडणूक महत्वाची ठरत असल्याने गेली दोन दशके सुप्तावस्थेतील असलेला आबा-काका गटातील राजकीय संघर्ष तरूण पिढीच्या रूपाने पुढे येत आहे.

कवठेमहांकाळची नगरपंचायत अद्याप बाल्यावस्थेत असली तरी इथला राजकीय संघर्ष काही नवा नाही. ढालगावमध्ये ९० च्या दशकात झालेल्या गोळीबाराचा आणि महांकाली साखर कारखान्याची गाजलेली वार्ष्रिक सर्व साधारण सभा हा इतिहास आता विस्मृतीत गेला असला तरी कवठेमहांकाळने सगरे-घोरपडे हा वाद पाहिला आहे. एकीकडे साखर कारखाना तर दुसरीकडे दूध संघ असे राजकीय अड्डे विधानसभेची पायरी बनत गेले. यात घोरपडे यांनी विकास आघाडीच्या माध्यमातून आमदारकी मिळवली. या आमदारकीतूनच म्हैसाळ योजनेला गती मिळाली. आज सिंचन योजनेच्या पाण्यामुळे भाग प्रगतीच्या मार्गावर आहे.

हेही वाचा >>>नाशिकमध्ये महायुतीचे विविध कार्यक्रमांद्वारे सामाजिक अभिसरण

तासगावही द्राक्ष पिकामुळे सधनतेच्या वाटेवर राहिला आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी मतदार संघाची पुनर्रचना झाली आहे. कवठेमहांकाळमधील मिरज पुर्व भागातील २९ गावे मिरज मतदार संघात समाविष्ट झाली आणि तासगावमधील विसापूर मंडळातील गावे वगळून तासगाव-कवठेमहांकाळचा एक मतदार संघ झाला. मात्र, तत्पुर्वीपासूनच तासगावमध्ये आरआर आबा पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष सुरू आहे. आबांना तासगावमध्ये रोखण्यासाठी १९९९ च्या निवडणुकीत संजयकाका पाटील मैदानात उतरले. त्यावेळी अवघ्या ३ हजार ४९७ मतांनी पराभूत झाले, पुन्हा २००४ च्या निवडणुकीत आबा-काका लढतीमध्ये मतांची फरक ६ हजार ३०४ ठेवून आबा निवडून आले. हा राजकीय संघर्ष परवडणारा नाही हे ओळखून आमदार जयंत पाटील यांनी पुढाकार घेत काकांना विधानपरिषदेत संधी दिली. त्यानंतर काही काळ हा संघर्ष संपला असे वाटत होते.तासगावमध्येही खासदारही आमचा आणि आमदारही आमचा असा प्रचार होउन अजितराव घोरपडे यांचा पराभव झाला. यानंतर दोन्ही गटात गुप्त समझोता होउन गेली दहा वर्षे राजकीय पातळीवर शांतता नांदत असतानाच खासदार आणि आमदार आमच्याच घरातला या भूमिकेमुळे आबा-काका संघर्षाला नव्याने चूड लागली.

कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीमध्ये आबा गटाने १७ पैकी ११ जागा एकहाती जिंकत वर्चस्व सिध्द केले. यावेळी आबा गटाच्या विरोधात काका, घोरपडे आणि महांकाली कारखान्याचा सगरे गट असे तीनही गट एकत्र येउनही आबा गटाला मिळालेले यश कौतुकास पात्र ठरले. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या नगराध्यक्ष निवडीवेळी आबा गटाचे काही नगरसेवक फुटल्याने काकांनी फुटीर नगरसेवकांच्या मदतीने आपल्या गटाकडे नगराध्यक्ष पद मिळवले. यानंतर पुन्हा हा राजकीय संघर्ष सुरू झाला.

हेही वाचा >>>रानटी हत्तींचा गडचिरोलीच्या सीमेत प्रवेश, शहरापासून चार किमी अंतरावर वाहतूक रोखली..

आता विधानसभेसाठी रोहित पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी निश्‍चित झाली आहे. लोकसभा निवडणुकीत माजी खासदार पाटील यांना पराभव पत्करावा लागला. मात्र, या पराभवात तासगाव-कवठेमहांकाळचा वाटा मोठा आहे. काकांना घरच्या मैदानात ९ हजार मतांची घट झाली आहे. विधानसभेसाठी काका गटाकडून अजून निश्‍चित उमेदवार नसला तरी त्यांचे पुत्र प्रभाकर पाटील हे पुढे येतील अशी अटकळ असली तरी ऐनवेळी भाजपकडून माजी खासदार पाटील यांनाच मैदानात उतरविण्याची खेळी केली जाउ शकते. रोहित पाटील यांनी मैदानात छोटा येउ दे अथवा मोठा पैलवान येउ दे आपली तयारी जंगी असल्याचे जाहीर केले आहे, तर एका पराभवाने खचून जाणारा मी नाही म्हणत काकांनीही तयारी सुरू केली आहे. कवठेमहांकाळच्या घटनेने आबा- काका गटातील सुप्त संघर्ष आता नव्या वळणावर आला आहे. तर या मतदार संघात असलेला तिसरा कोन माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या विकास आघाडीचा असणार आहे. नको अंजनी, नको चिंचणी अशी घोषणा देउन या गटानेही पायाभरणी सुरू केली आहे.