भाजप नेते किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यातील आर्थिक घोटाळ्याचा वाद आता दुसऱ्या टप्प्यावर पोहोचला आहे. मुश्रीफ यांच्या संस्थात्मक कामावर भाजपाचे कोल्हापूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आरोपांच्या फैरी चालवल्या आहेत. त्याला प्रत्युत्तर देताना मुश्रीफ यांनीही घाटगे यांच्या साखर कारखाना, दूध संघातील गैरकारभारावर प्रश्नचिन्ह लावले आहे. मुश्रीफ – घाटगे यांच्यातील राजकीय वाद संस्थात्मक संघर्षावर पोहोचला आहे. पोलीस ठाण्याची वाट दाखवताना न्यायालयात खेटे मारायला लावण्याची तयारी उभयतांनी चालवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ‘उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत,’ देवेंद्र फडणवीसांच्या विधानाचा अर्थ काय? पुन्हा युती होणार?

भाजपाने कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांना लक्ष्य केले आहे. गेल्या आठवड्यात सोमय्या चौथ्यांना कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांनी मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेत तसेच सहकार निबंधक कार्यालयात चर्चा केली. काही शेतकऱ्यांची संवाद साधला असता मुश्रीफ संस्थापक अध्यक्ष असलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे या खाजगी कारखान्यातील भाग भांडवल रकमेत घोटाळा झाल्याचा मुद्दा त्यांच्या निदर्शनास आणला गेला. त्याचा धागा पकडून सोमय्या यांनी मुश्रीफ यांचा आर्थिक घोटाळा १५८ कोटी वरून ५०० कोटीवर गेल्याचा नवा आरोप केला. सोमय्या यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला प्राप्तीकर विभागाला उत्तर दिले आहे. शासकीय यंत्रणांकडून चौकशी सुरू असताना सोमय्या यांनी कोल्हापुरात येण्याची गरज काय असा प्रतिप्रश्न मुश्रीफ यांनी उपस्थित केला.

हेही वाचा- शिंदे गटाच्या आमदाराला अडचणीत आणण्याची भाजपचीच खेळी

मुश्रीफ – घाटगे वाद तापला

सोमय्या यांच्या आरोपांमध्ये तेच ते मुद्दे येत आहेत. पत्रकार परिषदेतही अडचणींच्या प्रश्नांना भिडण्याऐवजी सोयीचे प्रश्न घेऊन पसंतीची मांडणी करण्यावर त्यांचा भर असल्याचे दिसू लागले आहे. सोमय्या यांच्या आरोपाची धार कमी होत आहे की काय असा मुद्दा निर्माण झाला आहे. सोमय्या यांच्या मुद्द्यापेक्षा समरजित घाटगे यांनी मुश्रीफ यांच्या जिल्हा बँक आणि संताजी घोरपडे कारखान्याबाबत केलेले आरोप हे अधिक लक्षवेधी ठरले. यातूनच मुश्रीफ – घाटगे यांच्यातील संस्थात्मक राजकारणाचा संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. एका वृत्ताचा हवाला देत घाटगे यांनी मुश्रीफ यांच्यावर निशाना साधला. जिल्हा बँकेतून आपण व कुटुंबीयांनी जिल्हा बँकेतून कर्ज घेतले नाही मुश्रीफ म्हणतात. मग जिल्हा बँकेतून संताजी घोरपडे कारखान्यासाठी २३३ कोटीचे कर्ज मुश्रीफ यांनी कसे घेतले याचे प्रकरण पुढे आणले. घोरपडे कारखान्याचे नाव बदलून हसन मुश्रीफ प्रा. लि. करावे, असा टोला लगावला. ‘ जिल्हा बँकेतून आपण वा कुटुंबीयांनी वैयक्तिक कर्ज घेतले नाही. कारखान्यासाठी कर्ज घेतले असून त्याची नियमित वसुली सुरू आहे. घोरपडे कारखान्यांशी संबंधित शेतकऱ्यांचा गळा घोटू नका, असा प्रतिहल्ला मुश्रीफ यांनी घाटगे यांच्यावर केला.

हेही वाचा- तिसरी आघाडी भाजपाच्या फायद्याची! काँग्रेसच्या ठरावात भूमिका

घोरपडे कारखाना – शाहू दुध संघाचा बोभाटा

जिल्हा बँकेतील व्यवहारावरून घाटगे – मुश्रीफ यांच्यात सुरू असलेली जुगलबंदी त्याच विषयापुरती सीमित राहील असे वाटत असताना हळूहळू त्याचा विस्तार वाढत चालला आहे. घाटगे यांनी मुश्रीफ यांच्या संताजी घोरपडे कारखान्यातील कारभारावर टीकास्त्र डागण्यास सुरुवात केली आहे. मुश्रीफ यांनी घाटगे यांच्या शाहू मिल्क प्रकल्पावरून त्यांची कोंडी चालवली आहे. घोरपडे कारखान्यातील प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे होणारी ४० हजार शेतकऱ्यांची ४० कोटीची शेअर्सची रक्कम कोठे गेली, असा नवा प्रश्न घाटगे यांनी केला. कारखान्यावर शेतकऱ्यांची नव्हे तर मुश्रीफ कुटुंबीयांची आणि दिवाळीत निघालेल्या कंपन्यांची मालकी कशी आहे हे दर्शवणारी कागदपत्रे घाटगे यांनी सादर केली. इतकेच नव्हे तर घाटगे समर्थक सुनील कुलकर्णी यांच्यासह काही शेतकऱ्यांनी मुश्रीफ यांनी ४० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये दाखल केला. प्रतिक्रिया म्हणून मुश्रीफ समर्थकांनी मुरगूड पोलीस ठाण्यासमोर दिवसभर ठिय्या आंदोलन करून किरीट सोमय्या – समरजित घाटगे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

हेही वाचा- सहकारमंत्री म्हणतात टॅबचे वितरण होईल…

गुन्हा दाखल करणारे हे घाटगे यांच्या कारखान्यातील कामगार, संचालक कसे आहेत याचा पाढा मुश्रीफ यांनी वाचला. घाटगे यांनी शाहू दूध संघातून काहीच परतावा सभासदांना दिला नाही. या संघाची विक्री केली. केंद्र शासनाचे अनुदानात आर्थिक गोंधळ केला. सभासदांची फसवणूक अपहार केला, अशा आरोपांची मालिका लावली. घाटगे यांनी मुश्रीफ यांच्यावर १०० कोटीचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. राजकारणावरून संस्थात्मक संघर्षावर घसरलेल्या या वादाने मुश्रीफ – घाटगे यांचे नुकसान संभवत असले तरी दोघांनीही आक्रमकता ढळू न देण्याचा निर्धार केला असल्याचे दिसत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The controversy between mushrif and bjp is on a personal level print politics news dpj