सोलापूर : एकेकाळी स्वतःचा बालेकिल्ला असलेल्या आणि दस्तुरखुद्द शरद पवार यांनी प्रतिनिधित्व केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची अवस्था अतिशय दयनीय झाली असताना ही जागा पुन्हा शरद पवार यांनीच लढवावी, असा आग्रह त्यांच्या समर्थकांनी धरला आहे. परंतु पवार यांनी २०१४ नंतर निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे माढ्यातून लोकसभेची जागा कोणी आणि कशी लढवायची, याचा पेच कायम आहे.

शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली. तेव्हा माढा लोकसभा जागा लढविण्याच्या दृष्टीने आढावा घेण्यात आला. या बैठकीसाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आभिजित पाटील, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शंकर पाटील, प्रमोद गायकवाड, माढ्याचे संजय पाटील घाटणेकर, नवनाथ पाटील आदी उपस्थित होते. माळशिरस तालुक्यातील मोहिते-पाटील यांचे विरोधक तथा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश शामराव पाटील यांनी या बैठकीस हजेरी लावून शरद पवार यांच्यावर निष्ठा जाहीर केली. सोलापूर जिल्ह्यात शरद पवार यांच्यावरील प्रेमापोटी राष्ट्रवादी काँग्रेसची शक्ती वाढली होती. परंतु पवार यांच्याशी अकलूजचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील हे दुरावल्यानंतर म्हणजे २००९ पासून मोहिते-पाटील यांची पक्षात अडचण वाढली होती. यातच माढा लोकसभेच्या २००९ सालच्या निवडणुकीसाठी मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांची इच्छा डावलून स्वतः शरद पवार यांनाच उतरावे लागले होते. त्यानंतर २०१४ सालच्या मोदी झंजावातात या मतदारसंघातून विजयसिंह मोहिते-पाटील हे राष्ट्रवादीकडून स्वतःच्या हिंमतीवर निवडून आले होते. पुढे २०१९ साली राष्ट्रवादीकडून निवृत सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे आदींनी इच्छूक म्हणून उमेदवारी पुढे आणली. यात मोहिते-पाटील यांची उमेदवारी डावलण्याचे राजकारण खेळले गेले. त्यामुळे शेवटी मोहिते-पाटील कुटुंबीयांनी राजकीय निर्णय घेत थेट भाजपमध्ये जाणे पसंत केले. तेव्हापासून माढ्यातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ल्याला खिंडार पडत गेले.

News About Mahayuti
BJP : शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्याचा सर्वाधिक फायदा भाजपाला कसा झाला?
Sharad Pawar vs Ajit Pawar Who is real NCP leader
राष्ट्रवादी काँग्रेसवर अजित पवारांचाच वरचष्मा; शरद पवारांचं पुढचं पाऊल काय असणार?
Krishna Khopde, Nagpur East BJP candidate Krishna Khopde,
नागपूर पूर्वमध्ये ‘खोपडे त्सुनामी’, एका लाखांवर मताधिक्य
West Nagpur Assembly Constituency,
दांडगा जनसंपर्क, संघटन कौशल्यावर ठाकरेंनी पश्चिम नागपूर मतदारसंघ राखला
Shirish Naik, Mahavikas aghadi, North Maharashtra,
उत्तर महाराष्ट्रातील मविआच्या एकमेव विजयाने शिरीष नाईक चर्चेत
BJP wins due to formulaic planning Congress loses due to factionalism
सूत्रबद्ध नियोजनाने भाजपचा विजय, गटबाजीमुळे काँग्रेस पराभूत
Thane city MNS , MNS campaigning Thane, MNS results,
ठाणे शहरात मनसेची प्रचारात केवळ हवाच, निकालात मात्र पिछेहाट
Vidhan Sabha Election Result News
Assembly Election : RSSचे पाठबळ ते ‘एक है तो सेफ है’ घोषणा; भाजपामुळे महायुतीचे राज्यात जोरदार पुनरागमन

हेही वाचा – राजस्थान : काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदामुळे उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्यास उशीर?

मागील माढा लोकसभा निवडणुकीत मोहिते-पाटील यांनी स्वतःच्या माळशिरसमधून भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना ठरवून एक लाखाचे मताधिक्य मिळवून दिले होते. एव्हाना, शरद पवार व अजित पवार यांनी पक्षाअंतर्गत राजकारणात मोहिते-पाटील यांना शह देण्यासाठी ज्यांना ज्यांना मदत केली, ते माढ्याचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे, त्यांचे बंधू आमदार संजय शिंदे, माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार दीपक साळुंखे, करमाळ्याच्या रश्मी बागल आदींनी एका रात्रीत शरद पवार यांना पाठ दाखविली. आमदार शिंदे बंधू, दीपक साळुंखे यांच्यापासून ते मोहोळचे माजी आमदार राजन पाटील-अनगरकर आदी अनेक प्रस्थापितांनी राष्ट्रवादीत फूट पडताच अजित पवार यांच्या गटात उडी मारली. या परिस्थितीत शरद पवारगटाची स्थिती अतिशय केविलवाणी म्हणजे ‘ ना घर का ना घाट का ‘ अशी झाली आहे. पंढरपूरचे साखर सम्राट अभिजित पाटील यांच्यासारखे काही अपवाद वगळता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शरद पवार यांच्या पाठीशी एकही वजनदार नेता उरला नाही.

हेही वाचा – घराणेशाहीत भाजपही मागे नाही, केंद्रीय राज्यमंत्र्याच्या मुलाला व बहिणीला पक्षात स्थान

या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात असताना फलटणचे रामराजे निंबाळकर, माढ्याचे शिंदे बंधू आदी सर्व नेते दूर गेल्यामुळे पक्षापुढे आव्हान उभे राहिले आहे. सध्या अजित पवार गटात असलेले आमदार शिंदे बंधूंसह इतर अजित निष्ठावंतांना आगामी माढा लोकसभा निवडणुकीत भाजपचेच काम करावे लागणार आहे. दरम्यान, तिकडे भाजपमध्ये खासदार रणजितसिंह निंबाळकर व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यातील सुप्त संघर्ष कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फोडू शकतो. या संघर्षात आमदार शिंदे बंधू व इतर मंडळी मोहिते-पाटील यांच्या विरोधात आतापासून खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याशी दोस्ताना वाढविण्याची भूमिका घेतली आहे. दुसरीकडे मोहिते-पाटीला गटानेही खासदार निंबाळकर यांच्यासह आमदार शिंदे बंधू, दीपक साळुंखे आदींना लक्ष्य बनवून हिशोब चुकते करण्याची खेळी हाती घेतल्याचे बोलले जाते. यातून मोहिते-पाटील यांची भाजपमध्ये नाराजी कशी वाढेल ? त्यावेळी त्यांची कोणती भूमिका राहील ? मोहिते-पाटील गटाचा पुन्हा शरद पवार यांच्याशी मिलाफ होणार का ? तसे खरोखर घडल्यास राष्ट्रवादी शरद पवार गटाला लाभ होणार काय, याबद्दल अजून तरी मत-मतांतरे आहेत. तूर्त तरी माढ्यात शरद पवार गटाची अवस्था निर्नायकी असल्याचे दिसून येते.