छत्रपती संभाजीनगर : भारतीय पुरातत्त्व विभागाच्या ‘संरक्षक स्मारक’ यादीतून खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटविण्याची हिंमत भाजपने दाखवावी अशी एमआयएमने केलेली मागणी आता शिवसनेच्या वतीनेही करण्यात आली आहे. ‘ औरंग्या’ च्या औलादी असा शब्द प्रयोग करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण सहन केले जाणार नाही, असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर एमआयएम व ठाकरे गटाची मागणी महत्त्वाची ठरते.
औरंगजेबाचे छायाचित्र झळकावल्यामुळे तणाव निर्माण होण्याच्या घटनांची वारंवारिता गेल्या काही दिवसापासून वाढू लागली आहे. औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर ‘एमआयएम’ च्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात औरंगजेबाचे छायाचित्र झळकावण्यात आले होते. पण ही कृती कोणी केली हे माहीत नाही असे म्हणत पोलिसात तक्रार देत हे कृत्य ‘एमआयएम’च्या कार्यकर्त्यांचे नव्हते, असा दावा खासदार जलील यांनी केला होता. औरंगजेबाचे छायाचित्र झळकावणे व त्यानंतरच्या दंगली या विषयी बोलताना खासदार जलील म्हणाले, ‘ मला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगायचे आहे, जसे औरंगजेबाच्या औलादी वाढत आहेत, तशाच त्या गोडसेंच्या पण औलादी वाढत आहेत. त्यांच्याही विरोधात त्यांनी कधी तरी वक्तव्य करावे. जर हिंमत असेल तर फडणवीस यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून सांगावे की खुलताबादमधील औरंगजेबाची कबरी हे स्थळ ‘ संरक्षक स्मारक’ यादीतून काढावे.’ खासदार जलील यांच्या या वक्तव्यानंतर आता विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनीही ट्विट करुन खुलताबादच्या संरक्षित स्मारक यादीतून औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची मागणी केली.
हेही वाचा >>>मध्यप्रदेश जिंकण्यासाठी काँग्रेसची ‘कमलनाथ संदेश यात्रा’, नरोत्तम मिश्रा यांना पराभूत करण्यासाठी आखली खास रणनीती
‘बाटलीतून भूत’ बाहेर काढावे तसा हा ‘ औरंग्या’ सत्ताधारीच उभ्या महाराष्ट्रात उभा करत आहेत. शत्रूची भीती दाखवून मत मागण्याची तुमची जुनी सवय जनता ओळखते. मग ती औरंगाबाद असो की पाकिस्तान. कर्नाटकात बजरंगबली उपयोगाला पडला नाही म्हणून आता औरंगजेब राजकारणात आणला जात आहे.’ असा त्यांचा मजकूर त्यांनी समाजमाध्यमांवर लिहिला आहे.
हेही वाचा >>>उद्योगपती ते राजकीय नेते; राष्ट्रवादीचे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचा राजकीय प्रवास
भाजपची कोंडी करण्यासाठी संरक्षित स्मारकाच्या यादीतून औरंगजेबास बाहेर काढण्याच्या मागणीवरुन एमआयएम आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एका समान रेषेवर आल्याचे चित्र मात्र दिसून येत आहे. शिवसेना आणि एमआयएम यांच्या राजकीय भूमिका गेली काही वर्षे कमालीच्या परस्पर विरोधी असत आता भाजपची कोंडी करण्यासाठी दोन्ही पक्षाची भाषा समान रेषेवर आली आहे.