नवी दिल्ली : काँग्रेसच्या छाननी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये ८४ जागांवरील उमेदवारांबाबत चर्चा झाली. यामध्ये ६२ जागांच्या उमेदवारांवर सहमती झाली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. रविवारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल. काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी २० ऑक्टोबर रोजी जाहीर होणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले.

राज्यातील २८८ जागांपैकी २२२ जागांवर महाविकास आघाडीमध्ये सहमती झाली असून त्यातील ८४ जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. उर्वरित ६६ जागांवर गुरुवारी होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस ११० जागा लढवणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील हिमाचल भवनमध्ये झालेल्या छाननी समितीच्या बैठकीत समितीचे अध्यक्ष मधुसुदन मिस्त्री, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, वर्षा गायकवाड आदी नेते उपस्थित होते.

हेही वाचा >>>काँग्रेसकडून विदर्भात सांगली प्रारुपाची पुनरावृत्ती? राष्ट्रवादीकडे असलेल्या काटोल मतदारसंघाकडे लक्ष

नांदेडमध्ये रवींद्र चव्हाणांना उमेदवारी

नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होत असून, दिगंवत खासदार वसंत चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली जाणार आहे. त्यांच्या नावावर केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब केले जाईल, असेही पटोले यांनी सांगितले.