नाशिक – शिवसेना सोडल्यापासून पुन्हा राजकीय पुनर्वसन करण्यासह प्रत्येक संकटात छगन भुजबळ यांना साथ देणारे शरद पवार यांना आधाराची गरज असताना भुजबळ यांनी त्यांना दूर लोटावयास नको होते, ही भावना येवला येथील जाहीर सभेस उपस्थित असणाऱ्या जवळपास प्रत्येकाची होती. ग्रामीण भाग आणि शेतकरीवर्ग हा प्रथमपासूनच राजकारणाचा पाया राहिलेल्या शरद पवार यांच्या लोकप्रियतेत राष्ट्रवादीतील बंडामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीची भर पडली आहे. भविष्यातील राजकारणात केवळ भुजबळच नव्हे तर, इतर सर्व बंडखोरांसाठी हीच मोठी डोकेदुखी ठरणार असल्याचा संदेश आयोजकांच्या अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळालेल्या या सभेने दिला आहे.

राष्ट्रवादीत अजित पवार यांनी सवतासुभा मांडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होण्यात धन्यता मानली. अजितदादा यांना प्रफुल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांसारख्या ज्येष्ठ मंडळींनी साथ दिल्याने शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला गेला. या सर्व ज्येष्ठ मंडळींनी शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करून त्यांना आता थांबण्याचा सल्लाही दिला. नेमकी हीच बाब जिव्हारी लागलेले शरद पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढत राष्ट्रवादीची उभारणी करण्याचा निर्णय जाहीर केला. चाणाक्ष पवार यांनी पहिल्या जाहीर सभेसाठी कायमच त्यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील येवला या भुजबळ यांच्या मतदारसंघाची निवड केली.

Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Sharad Pawar on ajit pawar
Sharad Pawar : अजित पवारांचा परतीचा मार्ग मोकळा? शरद पवारांच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या
Sharad Pawar criticize BJP in pune said concentrated power is corrupt
शरद पवार म्हणाले, केंद्रित झालेली सत्ता…
Fear of division in Teli community due to the candidates given by sharad pawar and ajit pawar
पवार काका पुतण्यांनी दिलेल्या उमेदवारांमुळे तेली समाजात फूट पडण्याची भीती
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
maharashtra vidhan sabha election 2024, rashtrawadi congress sharad pawar,
पूर्व नागपुरात राष्ट्रवादीसमोर अडचणींचा डोंगर
sharad pawar nagpur, Sharad Pawar visits Nagpur,
पवार यांचा नागपूर दौरा, भाजपला इशारा अन् कॉंग्रेस नेत्यांशी खलबते

हेही वाचा – अनेक सहकारी ‘पांगती’; पण गामा पवारांचा ‘सांगाती!’

शिवसेनेतून बाहेर पडलेल्या भुजबळ यांचा माझगाव या त्यांच्या मतदारसंघात पराभव झाल्यानंतर ॲड. माणिकराव शिंदे यांच्यासह इतर राजकीय मंडळींच्या मागणीनुसार आणि सुरक्षित म्हणून येवला मतदारसंघात पवार यांनी भुजबळ यांचे बस्तान बसविले. त्यासाठी सलग दोन वेळा निवडून आलेले जनार्दन पाटील, मारोतराव पवार यासारख्या माजी आमदारांना नाराजही केले. भुजबळ यांनी अंगभूत कौशल्याने त्यानंतर सर्व विरोधकांना आपल्या जाळ्यात ओढून सलग चार वेळा येवल्याचे प्रतिनिधित्व केले.

भुजबळ यांच्या कार्यशैलीविषयी नंतर पवार यांच्याकडे काही तक्रारी गेल्या तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. इतका विश्वास थोरल्या साहेबांनी भुजबळ यांच्यावर टाकला होता. त्यामुळे भुजबळांविषयी नाराजी असूनही ज्येष्ठ मंडळींना गप्प राहण्याशिवाय पर्यायही उरला नव्हता. राष्ट्रवादीतील बंडानंतर आणि भुजबळ यांनी पवार यांची साथ सोडल्यामुळे या सर्व नाराजवंतांना एकत्र येण्याची संधी आयतीच चालून आली. त्यामुळे येवल्याच्या राजकीय व्यासपीठावर प्रथमच पवार यांच्या सभेच्या निमित्ताने जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष ॲड. माणिकराव शिंदे, जनार्दन पाटील, मारोतराव पवार, कल्याणराव पाटील, अंबादास बनकर या माजी आमदारांसह ठाकरे गटाचे विधान परिषदेतील आमदार नरेंद्र दराडे अशी मंडळी एकत्र आली. एकत्रित राहिल्यास येवला मतदारसंघाचे राजकारण पूर्णपणे बदलून टाकण्याची ताकद या मंडळींमध्ये आहे. शरद पवार यांनी साद दिली आणि एकमेकांमधील सर्व मतभेद विसरून ही मंडळी दोन दिवसांत सभा यशस्वी करण्यासाठी एकत्र आली. त्यात काँग्रेस, ठाकरे गटानेही भक्कम साथ दिली. येवल्यात अल्पसंख्यांकांचे प्रमाणही बऱ्यापैकी असून त्यांचीही उपस्थिती सभेला होती.

नाशिक जिल्ह्याने शरद पवार यांना कायमच साथ दिलेली असल्याने आणि जिल्ह्यातील कांदा या जिव्हाळ्याच्या विषयावर शहरी भागातील ग्राहकांपेक्षा शेतकरी हित जपण्यास पवार यांनी सतत प्राधान्य दिलेले असल्याने आजही त्यांच्याविषयीचा जिव्हाळा शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. ग्रामीण भागातील राजकारणाची नाडी चांगलीच ओळखून असलेल्या पवार यांच्यावरील हा जिव्हाळाच राष्ट्रवादीतील बंडात त्यांना आधार देणारा ठरणार असल्याचे येवल्यातील सभा सांगून गेली. सभेसाठी उपस्थितांमध्ये शेतकऱ्यांचे प्रमाण लक्षणीय होते. त्यात जसे ज्येष्ठ होते, तसेच तरुणही होते. गंमत म्हणजे, पवार यांचा आपल्या वयाचा उल्लेख करू नये, अ्सा आग्रह असतानाही सभेसाठी ठिकठिकाणी लागलेल्या सर्व फलकांवरील ८३ वर्षांचा योद्धा ही नोंद लक्ष वेधून घेत होती. बंडखोरी करणाऱ्यांविरोधात असंतोष निर्माण करण्यात ही नोंदही महत्वपूर्ण ठरली. जमलेल्या गर्दीतून उमटणारी भावना हेच दर्शवित होती.

हेही वाचा – एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात वरचढ कोण?

मुद्देसूद आणि संयत मांडणी करीत पवार यांनी भाषणामध्ये भुजबळ यांची निवड करण्यात आपली चूक झाल्याचे सांगितल्यावर टाळ्यांचा आणि घोषणांचा झालेला वर्षाव बरेच काही सांगून जाणारा होता. विशेष म्हणजे, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी साताऱ्यात भर पावसात झालेल्या सभेतही पवार यांनी उदयनराजेंना लक्ष्य करताना आपली निवड चुकली हे नमूद केले होते. हा अपवाद वगळता पवार यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपांचा उल्लेख करीत, केंद्रातील सर्वशक्ती वापरून या आरोपांची चौकशी करावी आणि आरोप सिद्ध होणाऱ्यांना शिक्षा करावी, असे आव्हान दिले.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री झालेल्या राष्ट्रवादीतील अनेकांवर याआधी भाजपकडूनच भ्रष्टाचाराचे आरोप झालेले असल्याने (भुजबळ तर तुरुंगातही होते) हे आव्हान देण्यामागील राजकीय चातुर्य लक्षात येईल. सभा झाल्यानंतर सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्या वाहनांभोवती पडलेला लोकांचा गराडा पवार यांच्यासमवेत असलेल्या नवीन पिढीच्या नेत्यांसाठीही उत्साहवर्धक म्हणावा लागेल. पहिल्याच सभेत पवार यांनी बाजी मारल्याचे सध्यातरी दिसत असून ही लय यापुढेही कायम ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.