मुंबई : पक्षाच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करीत दोन महिने सुट्टीवर जात असल्याचे जाहीर करणाऱ्या पंकजा मुंडे यांना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीत सचिवपदी कायम ठेवण्यात आल्याने पक्षात त्यांचे महत्त्व अबाधित असल्याचे स्पष्ट झाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यात राज्यातील तावडे, मुंडे व रहाटकर यांचे स्थान कायम राहिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंकजा मुंडे या पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर नाराज असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील व काही प्रदेश नेत्यांबरोबर त्यांचे फारसे सख्य नाही. त्यामुळे नाराज मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी दोन महिने सुटीवर जाणार असल्याचे जाहीर केले होते. राजकीय वाटचालीबाबत विचार व चिंतन करून पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांचे वर्तन अनेकदा भाजपच्या पक्षशिस्तीत बसणारे नसले तरी त्या ओबीसी समाजाच्या मोठ्या नेत्या असून मराठवाड्यात त्यांचा प्रभाव आहे. वंजारी समाजाची ताकद त्यांच्या पाठीशी आहे. दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना मानणारे अनेक नेते व कार्यकर्ते राज्यात असल्याने आणि पंकजा यांचाही प्रभाव असल्याने त्यांना दुखावणे भाजपला आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेता परवडणार नाही.

हेही वाचा – नव्या तालुका निर्मितीवरून भाजप आमदारांमध्येच वाद

हेही वाचा – मणिपूरवरून आज पुन्हा संसदेत गदारोळ; पंतप्रधान मोदी मात्र लोकसभेची तयारी करण्यासाठी एनडीएची बैठक घेणार

राज्यात भाजपने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सहभागी करून घेतले आहे व पंकजा यांचे चुलतबंधू व राजकीय प्रतिस्पर्धी धनंजय मंडे यांना मंत्री केले आहे. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता आणि पुढील निवडणुकीतही तेच उमेदवारीवर हक्क सांगतील. त्यामुळे पंकजा यांना पुढील राजकीय भवितव्याबाबत चिंता वाटत आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा यांनी राष्ट्रवादीला बरोबर घेण्याच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The importance of pankaja munde who expressed displeasure is intact in the bjp print politics news ssb
Show comments