पिंपरी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली, तरी मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अद्याप ठरला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघावर मित्रपक्ष भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रबळ दावेदारी केल्याने पेच वाढला आहे. यावर दिल्ली दरबारी तोडगा निघेल असे सांगितले जाते. पुढील दोन दिवसांत मतदारसंघ कोणत्या पक्षाला आणि उमेदवारी कोणाला मिळणार हे स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.
पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांत विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघावर एकत्रित शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. सलग तीन वेळा शिवसेनेचा उमेदवार निवडून आला, तर एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसला तिन्ही वेळा पराभव पाहावा लागला. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत भाजपसोबत आहे. बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे मावळमधील गणितेही बदलली आहेत. या बदलल्या घडामोडींचा विचार करून भाजप, राष्ट्रवादीने मावळवर दावा केला आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली, तरी दोन्ही पक्षांनी दावेदारी सोडली नाही. त्यामुळे शिवसेनेपुढील अडचणी कमी होताना दिसत नाहीत.
हेही वाचा >>>भिवंडीत उमेदवारीवरून महाविकास आघाडीत स्पर्धा; सुरेश म्हात्रे, निलेश सांबरे हे उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील
मावळ लोकसभा मतदारसंघ भाजपला लढविण्यास मिळावा, अशी मागणी वरिष्ठांकडे केली आहे. आजपर्यंत एकदाही मावळमधून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढविली नाही. या वेळी कमळाच्या चिन्हावर उमेदवार अशी भाजपची भूमिका आहे, तर तिन्ही निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसने लढविल्या आहेत. मावळात राष्ट्रवादीला मानणारा मोठा वर्ग आहे. पिंपरी, मावळ विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार आहेत. मागील वर्षी चिंचवडमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत आमच्या उमेदवाराला लाखापेक्षा जास्त मते मिळाली आहेत. त्यामुळे आमचा दावा असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगितले जाते.
हेही वाचा >>>काँग्रेसच्या बसवराज पाटील यांच्या भाजप प्रवेशाने औस्यात समीकरण बिघडले
दुसरीकडे महायुतीचा उमेदवार मीच असेल असे ठामपणे सांगणारे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे धनुष्यबाण की कमळाच्या चिन्हावर लढणार यावर आजपर्यंत भाष्य करत नव्हते. परंतु, आता माझे नाव शिवसेनेच्या यादीतच असेल असे सांगत खासदार बारणे यांनी कमळावर लढण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. उमेदवारीची घोषणा कधी करायची याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील. या भागातून मी तीन निवडणुका लढलो आहे. एकदा चिंचवड विधानसभा आणि दोनवेळा मावळ लोकसभेच्या निवडणुकीला महायुतीचा उमेदवार म्हणून सामोरे गेलो. आता पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीला महायुतीचा उमेदवार म्हणून मी निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे बारणे यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघ महायुतीत नेमका कोणत्या पक्षाला सुटतो, कोण उमेदवार असेल हे पुढील दोन दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.