संतोष प्रधान
कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात आपल्याच गटातील आमदारांना संधी मिळाली पाहिजे या चढाओढीत मंत्रिमंडळाचा आकार अत्यंत मर्यादित ठेवण्यात आला असला तरी त्यात काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांच्या मुलाला मात्र मंत्रिपद मिळाले आहे.
नेतेमंडळी महत्त्वाच्या पदांवर आपल्या कुटुंबियांची वर्णी लावतात हे सर्वच पक्षांमध्ये घडते. कर्नाटकात सत्ता मिळाल्यावर मुख्यमंत्रीपदाचा आठ दिवस घोळ घालण्यात आला. सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात २८ मंत्र्यांचा समावेश करण्याची योजना होती. पण केवळ आठ नावांवरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांमध्ये सहमती होऊ शकली. तरीही या आठ जणांमध्ये खरगे यांचे पुत्र प्रियंक खरगे यांचा समावेश झाला आहे. पक्षाध्यक्ष खरगे यांनी छोटेखाटी विस्तारातही आपल्या मुलाची वर्णी लावली आहे. भविष्यात खरगे यांचे पुत्र मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत येऊ शकतात.
हेही वाचा >>> विरोधकांच्या एकीचा ‘बंगळुरू प्रयोग’ देशभर यशस्वी होणार का?
डावी आघाडी नेहमीच घराणेशाहीवर नाके मुरडते. पण केरळमध्ये मुखमंत्री पिनरायी विजयन यांचे जावई मोहमंद रियास हे विधानसभेत पहिल्यांदा निवडून आले तरी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम व पर्यटन ही महत्त्वाती खाती सोपविण्यात आली आहेत. केरळमधील एका मल्याळी वृत्तपत्राने केलेल्या सर्वेक्षणात विजयन यांचे उत्तराधिकारी म्हणून रईस हे मुख्यमंत्री होऊ शकतात. काँग्रेस पक्षाध्यक्ष खरगे यांनी आपल्या मुलाला जसे पुढे आणले तसेच केरळात मुख्यमंत्री विजयन यांनी जावयाकडे सूत्रे जातील या दृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा >>> अमरावतीत महाविकास आघाडी सक्षम उमेदवाराच्या शोधात
तमिळनाडूत द्रमुकचे सर्वेसर्वा व मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांचा अलीकडेच मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. शेजारील तेलंगणात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे पुत्र के. टी. रामाराव हे मंत्री असून, राज्याचा कारभार त्यांच्याच इशाऱ्यावर चालतो. आगामी निवडणुकीत भारत राष्ट्र समितीने सत्ता कायम राखल्यास रामाराव हे मुख्यमंत्री होतील, असा अंदाज वर्तविला जातो. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे हे मंत्रिपदी होते. अमित देशमुख, सुनील केदार, विश्वजित कदम, वर्षा गायकवाड, प्राजक्त तनपुरे आदी नेतेमंडळींची मुले मंत्रिमंडळात होती. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये पंकजा मुंडे या घराणेशाहीतून पुढे आलेल्या होत्या. त्यांनी तर ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ हे जाहीर करून टाकले होते.