राहाता : लाडकी बहीण योजना म्हणजे महिलांना दिलेली लाच आहे, असे विरोधक म्हणतात. लाडक्या बहिणींना देण्यात येणारा पैसा हा इतर कुणाचा नसून जनतेचा आहे. तोच पैसा सरकार लाडक्या बहिणींना देत आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत लाडक्या बहिणींना लाचखोर म्हणण्याचा अधिकार विरोधकांना कुणी दिला, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिर्डी येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला महामेळाव्याप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

सावत्र भावांपासून महिलांनी सावध राहावे, त्यांच्या पोटात दुखायला लागले आहे. लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत शिक्षण, मोफत गॅस सिलेंडर या योजनेतून देण्यात येणारा हा पैशाचा चुराडा व अपव्यय आहे, असे म्हणत या योजनांना स्थगिती द्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व त्यांचे निवडणूक प्रमुख यांनी उच्च न्यायालयात केली आहे. परंतु मी त्यांना सांगतो आम्ही या योजनांना स्थगिती येऊ दिली नाही व येऊ देणार नाही. आम्ही तीन भाऊ सक्षम असून विरोधकांनी आमची चिंता करू नये, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>गंगाजल-गोमूत्र प्राशन करायला लावून काँग्रेस नगरसेवकांचं शुद्धीकरण? महापौर म्हणाल्या, “आता ते भ्रष्टाचारमुक्त झाले”

राधाकृष्ण विखे म्हणाले, शिर्डीतील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटनाने आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११ लाख बहिणींनी लाडक्या बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत.

अजित पवार यांची कार्यक्रमाकडे पाठ

मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमाला अचानक दांडी मारल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला येणार होते. परंतु शस्त्रक्रिेयेमुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांती सांगितल्यामुळे ते कार्यक्रमाल येऊ शकले नाही. त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. असा खुलासा फडणवीस यांनी करीत अजित पवार यांनीही या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्याचे सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The money given to beloved ladki bahin yojna to the public print politic news amy