गणेश यादव
पिंपरी : भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यापुढे आव्हानांचा डोंगर आहे. पक्षातील पदाधिका-यांची नाराजी दूर करुन लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीचे मोठे दिव्य त्यांना पार पाडावे लागणार आहे. या तीन निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळून दिल्यास बंधू दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्याप्रमाणे शंकर जगताप यांचे नेतृत्व सिद्ध होईल. पण जगताप यांच्या निवडीवरून घराणेशाहीचा आक्षेप पक्षातूनच घेतला जाऊ लागला आहे.
आमदार महेश लांडगे यांना शहराध्यक्षपदी मुदतवाढ देण्याची मागणी भाजपमधील एका गटाने केली होती. परंतु, प्रदेश नेतृत्वाने ती मागणी फेटाळत चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांचे दीर शंकर जगताप यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली. जगताप यांच्या नावाची घोषणा होताच नाराज झालेले भाजपचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी एकाच घरातील किती जणांना पदे देणार, असा सूर आवळत विरोध करण्यास सुरूवात केली. नाराजी कमी होण्यापेक्षा वाढतच गेली. एकेकाळी लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनीही जगताप घरात सातत्याने पदे दिली जात असल्याचा आक्षेप घेतला. तसेच दहा ते बारा माजी नगरसेवकांसह पक्ष नेतृत्वाची भेट घेऊन नाराजी कळविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
हेही वाचा >>>गुजरातमध्ये आप-काँग्रेस एकत्रपणे लोकसभा लढविणार; ‘आप’ची घोषणा, काँग्रेसचा सावध पवित्रा
पक्षातील अंतर्गत विरोध कमी करण्याचे शंकर जगताप यांच्यासमोर पहिले मोठे आव्हान असणार आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा शहराच्या राजकारणात मोठा दरारा होता. त्यांची आदरयुक्त भीती होती. त्यांच्याविरोधात उघडपणे बोलण्याचे कोणी धाडस करत नव्हते. परंतु, आता त्यांच्या पश्चात जगताप घराण्याला उघडपणे राजकीय विरोध होऊ लागला आहे. राजकारणात आव्हान मिळण्यास सुरुवात झाली आहे. या आव्हानांना सामोरे जात जगताप यांना स्वत:चे नेतृत्व सिद्ध करावे लागणार आहे. जगताप हे पक्षातील पदाधिका-यांची नाराजी कशी दूर करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कार्यकारिणी जाहीर करताना नव्या-जुन्यांचा समतोल साधण्याचे आव्हान असणार आहे. भाजपने पूर्वी १०० नगरसेवक निवडून आणण्याचा नारा दिला होता. त्यानंतर राज्यातील सत्ता समीकरणे बदली. मुख्य विरोधी पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला. त्यामुळे नव्या समीकरणात मित्रपक्षांना सोबत घ्यावे लागणार आहे. जगताप यांनी अगोदर भाजपचे १२५ नगरसेवक निवडून आणण्याचा नारा दिला. त्यानंतर घूमजाव करत मित्रपक्षांसह १२५ नगरसेवक निवडून आणणार असल्याचे सांगितले. त्यामुळे यापुढील काळात त्यांना मित्रपक्षांशी समन्वय ठेवावा लागणार आहे.
हेही वाचा >>>विरोधकांच्या ‘इंडिया’ला आत्ता तरी ‘भारत माते’चा पर्याय
आमदार महेश लांडगे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर आली. त्यांच्या शहराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात एकही निवडणूक झाली नाही. नवनियुक्त शहराध्यक्ष जगताप यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे. महापालिका निवडणूक विविध कारणामुळे दीड वर्षांपासून लांबणीवर पडली आहे. जगताप यांच्या कार्यकाळात लोकसभा, विधानसभा आणि महापालिका या महत्वाच्या तीनही निवडणुका होणार आहेत. त्यामुळे जगताप यांच्या शहराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात पक्षाची कामगिरी कशी होते, पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आणण्यात यश येते का, या कामगिरीवरच त्यांचे नेतृत्व सिद्ध होईल.