नाशिक, धुळे : जाती-जातीत भांडणे लावून सत्ता मिळविणे हे काँग्रेसचे षडयंत्र आहे. काँग्रेसला दलित, अनुसूचित जमाती, इतर मागासांचा तिरस्कार आहे. या समाजातील एकजूट त्यांना तोडायची आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये संविधान बदलून ३७० कलम पुन्हा लागू करण्याचे प्रयत्न कदापि यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत, असा निर्धार व्यक्त करीत मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केले.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक प्रचाराला पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी उत्तर महाराष्ट्रातून सुरुवात केली. प्रथम धुळे आणि नंतर नाशिक येथे त्यांची महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी संविधान, आरक्षण, ओबीसी जनगणना, जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम आदी विषयांवरून काँग्रेसवर टीकेची झोड उठविली.
हेही वाचा >>>ऐरोलीच्या बंडाला ‘ठाण्या’ची साथ ?
काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान कित्येक दशके जम्मू-काश्मीरमध्ये लागू होऊ दिले नाही. ३७० कलमची भिंत तयार केली होती. भाजपने ३७० कलम हटवून ‘एक देश एक संविधान’ लागू केले. आता काँग्रेसचे नेते हातात कोरे कागद घेऊन संविधान धोक्यात असल्याचे नाटक करीत आहेत, अशी टीकाही मोदी यांनी केली. धुळ्यात आदिवासी, दलित समाजातील विविध उपजाती आणि नाशिकमध्ये इतर मागासवर्गातील विविध उपजातींची यादी कथन करीत मोदी यांनी काँग्रेस या सर्व जातींना एकमेकांच्या विरोधात लढविण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप केला.
काँग्रेसमध्ये पंडित नेहरूंपासून राहुल गांधी यांच्यापर्यंत सर्वांनी आरक्षणाला विरोधच केला आहे. काँग्रेसचे खोटे बोलण्याचे दुकान महाराष्ट्रात चालणार नाही. महाराष्ट्र पुढे गेला तर देश पुढे जाईल. महायुती सरकारने पायाभूत सुविधांच्या उभारणीतून अडीच वर्षांत ते दाखवून दिले आहे. विकासकामे थांबविणे हाच विरोधकांचा कार्यक्रम आहे. ‘लाडकी बहीण’ योजना बंद करण्यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली, असेही मोदी यांनी नमूद केले. धुळे येथील सभेत व्यासपीठावर जिल्ह्यातील महायुतीचे सर्व उमेदवार उपस्थित होते. तर, नाशिक येथे डॉ. राहुल आहेर, नरहरी झिरवळ, सुहास कांदे, दादा भुसे हे चार उमेदवार उपस्थित होते.
हेही वाचा >>>अमरावती जिल्ह्यात महाविकास आघाडी, महायुतीसमोर अस्तित्व राखण्याचे आव्हान
शरद पवार यांचा उल्लेखही नाही
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर प्रत्येक सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली होती. परंतु, विधानसभेच्या प्रचारात पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांचा साधा उल्लेखही केला नाही. त्यांचे प्रमुख लक्ष्य काँग्रेस होते. उद्धव ठाकरे यांचे नाव घेणेही त्यांनी टाळले. काँग्रेसला महाविकास आघाडीत साथ देणारे पक्ष, असा उल्लेख करीत त्यांनी विरोधकांवर टीकाटिप्पणी केली. दुसरीकडे, मोदी यांनी धुळ्यातील सभेत व्यासपीठावर उपस्थित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.
वाढवण विमानतळाविषयी निवडणुकीनंतर निर्णय
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाढवण बंदरासह विमानतळाची इच्छा आपण लवकरच पूर्ण करणार आहोत. निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद करताच व्यासपीठावर उपस्थित फडणवीस यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
…तर किसान सन्मान निधी १५ हजारांवर
दोन पक्षांच्या सरकारमध्ये दुप्पट वेगाने विकास होतो, तसाच योजनांचाही दुप्पट लाभ मिळतो. याकडे लक्ष वेधत पंतप्रधान मोदी यांनी केंद्र व राज्य सरकारच्या किसान सन्मान योजनेतून प्रत्येकी सहा हजार असे वर्षाकाठी प्रत्येक शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या १२ हजार रुपयांचा दाखला दिला. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर ही रक्कम वाढवून १५ हजार रुपये केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.