Punjab floods : पंजाब राज्यातील राजभवनात गेले काही दिवस राज्यातील नेत्यांची चांगलीच रेलचेल पाहायला मिळत आहे. राज्यातील विरोधक राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेऊन राज्यातील पुरपरिस्थितीबाबत विविध निवेदने देत आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि राज्यपाल पुरोहित यांचे संबंध फारसे चांगले नाहीत. राज्यातील काँग्रेस, अकाली दल आणि भाजपा पंजाबमध्ये विरोधक म्हणून एकत्रितपणे ‘आप’ सरकारवर टीका करतात. पूरग्रस्तांना तत्काळ मदत न दिल्यामुळे आणि मानवनिर्मित अडचणींमुळे पंजाबमधील जनतेच्या समस्या आणखी वाढल्या असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. पंजाबमध्ये ओढवलेल्या संकटाचा वापर एकमेकांवर राजकीय आरोप करण्यात होत असल्याचे दिसत आहे.
पंजाबमधील पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी केंद्र सरकारने नियम बाजूला सारून २१८ कोटींचा निधी दिला आहे, ही बाब अधोरेखित करत भाजपाने राज्यपालांना एक निवेदन दिले आहे. पंजाबचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखर म्हणाले की, पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आप सरकारने कोणत्या उपाययोजना आखल्या आहेत याची माहिती द्यावी तसेच ज्या लोकांनाचे नुकसान झाले आहे, त्यांना लवकरात लवकर मदत वितरीत करावी. “राज्यावर आलेले अभूतपूर्व संकट पाहता केंद्र सरकारने सर्व नियम बाजूला सारून पुरेसा निधी दिलेला आहे. पण राज्य सरकारने त्यावर कोणतीही कार्यवाही न करता केंद्राच्या मदतीला लोकापर्यंत पोहचू दिलेले नाही”, अशी तक्रार निवेदनात करण्यात आली.
हे वाचा >> भाजपाने ‘पुराचे राजकारण’ केले; दिल्ली आणि पंजाबमधील ‘आप’ सरकारचा आरोप
दुसरीकडे अकाली दलाने काँग्रेसवर टीकास्र सोडले आहे. काँग्रेस पक्ष राज्यपालांकडे नाटकी भेट देत असून लोकांच्या डोळ्यात धूळफेक करत आहे. काँग्रेस आणि आप इंडिया आघाडीमध्ये मित्रपक्ष असून पंजाबमध्ये एकमेकांना विरोध करत असल्याचा आरोप अकाली दलाचे नेते बिक्रम मजिठीया यांनी केला. तर पंजाब काँग्रेसचे प्रमुख अमरिंदर राजा सिंग यांनी अकाली दल, भाजपा यांच्यासह स्वतःच्या पक्षातील नेत्यांनाही फटकारले. ते म्हणाले, “राज्यपालाची भेट घेऊन त्यांचा आणि लोकांचा वेळ फुकट घालविण्यापेक्षा या लोकांनी थेट मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानी धडकावे आणि मदत मागावी.”
काँग्रेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते प्रताप सिंग बाजवा म्हणाले की, केंद्र सरकारने दिलेली २१८ कोटींची मदत अतिशय तुटपुंजी आहे. राज्यपालांनी केंद्र सरकारकडे किमान १० हजार कोटींची मदत मागावी. तसेच मान सरकारने विधानसभेचे आप्तकालीन अधिवेशन बोलवावे आणि उर्वरित वर्षासाठी अर्थसंकल्पीय खर्चाची पुन्हा एकदा तपासणी करावी.
दरम्यान, मागच्या आठवड्यात राज्यपाल पुरोहित यांनी स्वतः राज्यातील काही पूरग्रस्त भागांचा दौरा केला. या दौऱ्यावरही टीका झाली. शिरोमणी अकाली दल (संयुक्त) पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे माजी खासदार सुखदेव सिंग धिंडसा यांनी आरोप केला की, राज्यपालांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला असताना नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यपालांना भेटू दिले नाही. सुखदेव सिंग धिंडसा हे स्वतःला अकाली दलाचे दिवंगत नेते प्रकाश सिंग बादल यांचे खरे वारसदार असल्याचे म्हणवतात. १८ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे घेतलेल्या एनडीएच्या बैठकीला पंजाबमधून उपस्थित असलेले ते एकमेव नेते होते.