समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांना द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशमधील रामपूर न्यायालयाने त्यांना तीन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तसेच, २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. खरंतर आझम खान यांचे कुटुंब तीन दशकांहून अधिक काळ पश्चिम उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात सर्वात प्रभावशाली म्हणून ओळखले जायचे. परंतु अलिकडच्या काही वर्षांत राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून आझम खान यांना एकापाठोपाठ एक धक्के बसताना दिसत आहेत. आता त्यांना द्वेषपूर्ण भाषणाप्रकरणी शिक्षा झाल्यावर अनेकांना अगदी समाजवादी पक्षातील काहींनाही जिल्ह्यावर आपली पकड टिकवून ठेवण्याची ताकद आझम खान यांच्यात क्षमता उरली आहे की नाही? असा प्रश्न पडला आहे.

सपा नेते आझम यांचा मुलगा अब्दुल्ला आझम खान यांना २०२० मध्ये विधानसभेतून अपात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर आझम खान आणि त्यांचा मुलगा व पत्नीसह त्यांचे कुटुंब कथितरित्या जमीन बळकावणे, फसवणूक आणि गुन्हेगारीच्या अनेक प्रकरणात तुरुंगातही राहिले. याच वर्षी मे महिन्यात त्यांची सुटका झाली होती. आता परत द्वेषपूर्ण भाषणप्रकरणी त्यांना तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्यावेळी केलेल्या भडकाऊ भाषणासाठी त्यांना दोषी ठरवण्यात आले होते.

शिक्षा ठोठावल्यानंतर आझन खान यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, जामीनानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. आझम खान यांची विधानसभा सदस्यता रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर, याप्रकरणी आझम खान वरील न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण? –

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आझम खान द्वेषपूर्ण भाषण केलं होतं. त्याप्रकरणी भाजपा नेते आकाश सक्सेना यांनी आझम खान यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तीन वर्षांनी रामपूर न्यायालयाने आझम खान यांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.