मोहन अटाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती : आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे दाम्पत्य राज्यभरात चर्चेत आहे. वर्षभरापुर्वी राणा दाम्‍पत्‍याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याची आग्रही भूमिका मांडल्याने राणा विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा सामना रंगला. आता भीमसैनिकांवर खोटे गुन्‍हे दाखल करून त्‍यांचा आवाज दाबण्‍याचा प्रयत्‍न राणा यांनी सुरू केल्‍याचा आरोप आंबेडकरी चळवळीतील सामाजिक संघटनांनी केला आहे. त्‍यांच्‍या विरोधात मोर्चा काढण्‍याचा निर्णय या संघटनांनी घेतल्‍याने राणा दाम्‍पत्‍याच्‍या अडचणी वाढल्‍या आहेत.

येथील इर्विन चौकात दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. यात अनेक राजकीय नेते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. राणा दाम्‍पत्‍य देखील त्‍या ठिकाणी आले होते. ते दिसताच त्‍यांच्‍या विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्‍यानंतर घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्‍यांच्‍या विरोधात खोटे गुन्‍हे दाखल करण्‍यात आले, असा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्‍यांचा आरोप आहे. घोषणाबाजी संदर्भात गुन्‍हे दाखल केले असते, तर हरकत नव्‍हती, पण जी घटना घडलीच नाही, त्‍याबाबतीत गुन्‍हे नोंदवण्‍यात आले. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्‍यांवर खोटे गुन्‍हे दाखल केल्‍याप्रकरणी राणा दाम्‍पत्‍याच्‍या विरोधात वज्रमूठ बांधण्‍यात आली असून या प्रवृत्‍तीचा निषेध करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्‍याचे आंबेडकरी चळवळीतील विविध सामाजिक संघटनांच्‍या बैठकीत नुकतेच ठरविण्‍यात आले.

हेही वाचा >>> मुंबईत पक्ष वाढीसाठी स्वत: शरद पवार यांनी लक्ष घातले

भीम ब्रिगेडचे अध्‍यक्ष राजेश वानखडे यांच्‍यासह कार्यकत्‍यांवर गुन्‍हे दाखल करण्‍यात आले, ते त्‍वरित मागे घेण्‍यात यावे, अशी मागणी या संघटनांनी केली आहे. राणा दाम्‍पत्‍य यापुर्वीही अनेक विषयांवर वादग्रस्‍त ठरले आहेत. खरे तर नवनीत राणा या कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर २०१९ मध्‍ये लोकसभेत निवडून आल्या आहेत. राणा यांनी नैसर्गिकरित्या त्यांच्या बाजूने उभे राहायला हवे होते. पण, राणा यांनी भाजपला लगेच पाठिंबा दिल्‍याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्‍या. त्‍यांनी सातत्‍याने उद्धव ठाकरे यांना लक्ष्‍य केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हनुमान चालिसाबाबतच्या भूमिकेनंतर राणा दाम्‍पत्‍याने उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याची आग्रही भूमिका मांडली होती. त्‍यावेळी शिवसेनेच्‍या ठाकरे गटाने तीव्र विरोध केल्‍याने हा संघर्षही गाजला होता.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : “कर्नाटकात सत्ता जाणार असल्याने धार्मिक दंगलींचा बागुलबुवा उभा करतायत”; ठाकरे गटाची भाजपावर टीका

नवनीत राणा यांनी २०१४ साली राजकारणात पाऊल ठेवल्यापासून राणा दाम्‍पत्य आणि शिवसेनेत कायम खटके उडत आले आहेत. आधी माजी खासदार आनंदराव अडसूळ हे त्यांचे लक्ष्‍य होते, त्‍यानंतर त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल चालवला आहे. नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र देखील वादात सापडले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र ८ जून २०२१ रोजी रद्द केले होते. राणा यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली, सध्या या प्रकरणात सुनावणी सुरू आहे.

हेही वाचा >>> एकाच पक्षाचे गट-तट बारसू प्रकल्पाच्या मुद्यावर आमने-सामने

उद्धव ठाकरे जिथे सभा घेतील, तिथे त्या जागेचे शुद्धीकरण करू असा इशारा नवनीत राणा यांनी दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांनी नवनीत राणा दाम्‍पत्‍यावर टीका केली. राणा दाम्पत्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेची धडकी विरोधकांनी घेतली आहे. हनुमान चालीसाचा गैरवापर राणा दाम्पत्य करीत आहे, असा आरोप सुनील खराटे यांनी केला. एकीकडे ठाकरे गटाने राणा दाम्‍पत्‍याच्‍या विरोधात आघाडी उघडलेली असताना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्‍यांनीही त्‍यांना कोंडीत पकडण्‍याचा प्रयत्‍न चालवला आहे. भाजपला पाठिंबा देऊन राजकीय महत्‍वाकांक्षा बाळगणाऱ्या राणा दाम्‍पत्‍याची राजकीय वाटचाल काटेरी होत चालल्‍याचे आता बोलले जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The problems of the rana couple increased social organizations ambedkari movement print politics news ysh
Show comments