बुलढाणा: जिल्ह्यातील सातपैकी सहा विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांची नावे जाहीर झाली. मात्र सिंदखेड राजा मतदारसंघातील युतीचा मजेदार तिढा कायम आहे. या जागेसाठी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात या दोघा नेत्यांमध्ये वारंवार चर्चेच्या फेऱ्या झडत असून आज रात्री उशिरा किंवा उद्या दुपारपर्यंत हा तिढा सुटण्याची खात्री उभय पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी वर्तविली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राप्त माहितीनुसार आमदार राजेंद्र शिंगणे यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर हे मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. तब्बल पाचवेळा सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार आणि राज्य मंत्रिमंडळात राज्य, कॅबिनेट मंत्रिपद भूषविणारे राजेंद्र शिंगणे यांनी मतदारसंघात दीडेक महिना राजकीय संभ्रम कायम ठेवत विरोधकच नव्हे मित्र पक्षांनाही झुलवत ठेवले. मात्र अखेर तुतारी हाती घेतली. ही बाब अजितदादांना दुखावणारी ठरली. राष्ट्रवादीत फूट पडल्यावर शिंगणे अजितदादा गटात आले. बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेस ३०० कोटींचे ‘सॉफ्ट लोन’ मंजूर केले. त्याचा पहिला हफ्ता बँकेला मिळाला. तसेच सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा नगर परिषदेला कोट्यवधीचा निधी दिला. मतदारसंघासाठीही भरीव निधी दिला. मात्र याउप्परही आमदार शिंगणे शरद पवार गोटात गेले. त्यामुळे अजितदादा संतापले. दुसरीकडे भाजपाने देखील या जागेसाठी आग्रह धरला. यावर कळस म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या जागेसाठी कमालीचे आग्रही आहेत. त्यांनी हा मतदारसंघ शिवसेनेला सुटावा आणि माजी आमदार शशिकांत खेडेकर यांच्या उमेदवारीसाठी जोरकस प्रयत्न चालविले आहे.

हेही वाचा – काटोलमध्ये धक्कादायक घडामोड, अनिल देशमुखांऐवजी पुत्र सलील लढणार ?

हेही वाचा – भिवंडीत काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाचे वारे

दुसरीकडे अजितदादांनी राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात स्वपक्षातील आणि मित्र पक्षातील तगडा उमेदवार शोधण्याचे प्रयत्न केले. शिंदे गटाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी त्यांची भेटही घेतली. मात्र खेडेकर हे धनुष्यावर लढण्यावर ठाम आहेत. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. शनिवारी मध्यरात्रीनंतर या दोघा नेत्यांत चर्चा झाली. सिंदखेड राजाच्या बदल्यात दुसरा मतदारसंघ देण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दर्शविल्याचे खेडेकर गोटातील विश्वासू सूत्रांनी याला दुजोरा दिला. शशिकांत खेडेकर हे २९ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान आज रविवारी दुपारपर्यंत शिंदे गट आणि अजितदादा गटातील मजेदार तिढा कायम राहिला. आज रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत हा तिढा सुटण्याची दाट शक्यता आहे. उमेदवार खेडेकरच राहण्याची दाट शक्यता असून त्यांच्या हाती धनुष्य राहते की घड्याळ हाच औत्सुक्याचा भाग आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The rift remains in the mahayuti for sindkhed raja constituency ssb