Maharashtra Assembly Speaker Rahul Narvekar : भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर यांची ३ जुलै २०२२ रोजी विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. या पदावर बसणारे ते सर्वात तरूण अध्यक्ष आहेत, असे अनेक नेत्यांनी त्यावेळी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी यांनी जून २०२२ मध्ये बंडखोरी केली होती. त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना उबाठा गटाकडून आमदार राजन साळवी निवडणुकीला उभे होते. या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून आमदारांना व्हिप बजावण्यात आले होते. मात्र निवडणुकीनंतर राहुल नार्वेकर यांना १६४, तर राजन साळवी यांना १०७ मते मिळाली. त्यानंतर ४ जुलै २०२२ रोजी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आणि दोन्ही गटांनी एकमेकाच्या गटातील आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी केली.
मे २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गट आणि उबाठा गटातील ३४ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपविली. त्यानंतर ठाकरे गटाच्या मागणीवरून सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी बजावले. दोन मुदती ओलांडल्यानंतर आता अखेर आज (ता. १०) दुपारी ४ वाजता निर्णय जाहीर केला जाणार आहे.
आज निर्णय होत असताना काल (ता. ९) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीवरून राज्यात मोठा गहजब झाला. ज्यांच्याकडून अपात्रतेची कारवाई होणार आहे, त्यांनी स्वतःहूनच आरोपीची भेट घेणे म्हणजे मॅच फिक्सिंग आहे, असा आरोप उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केला.
महाराष्ट्राच्या या सत्तासंघर्षाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दहाव्या परिशिष्टानुसार पक्षांतरबंदी कायद्याचे काय होणार? घटनात्मक पेच कसा सुटणार? याबाबत चर्चा सुरू आहे आणि चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर. ते काय निर्णय देतात, यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे राहुल नार्वेकर कोण आहेत? त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे? हे जाणून घेऊ.
कोण आहेत राहुल नार्वेकर?
नार्वेकर यांच्या कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये विविध पदांवर काम केलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे राहुल नार्वेकर यांचे सासरे आहेत.
व्यवसायाने वकील असणाऱ्या राहुल नार्वेकर यांनी सुरुवातीला शिवसेनेत काम केले. आदित्य ठाकरे आणि त्यांचे निकटचे संबंध होते. इंग्रजी वृत्तवाहिनीवर बोलणारा चेहरा म्हणून त्यांची शिवसेनेत ओळख होती. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राहुल नार्वेकर यांना विधान परिषदेवर पाठवले. २०१४ ते २०१९ या काळात ते विधान परिषदेचे सदस्य होते. या काळात नार्वेकर यांना ‘उत्कृष्ट भाषणा’साठी राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेचा पुरस्कार मिळाला. त्यांनी मे २०१६ मध्ये राष्ट्रकुल संसदीय मंडळ शाखेद्वारे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व सिंगापूरचा अभ्यास दौराही केला.
सप्टेंबर २०१९ मध्ये राहुल नार्वेकर यांनी भाजपामध्ये प्रवेश करून सर्वांनाच धक्का दिला. ते भाजपाचे माध्यम प्रभारीही (मीडिया इन्चार्ज) राहिले आहेत. २०१९ मध्ये भाजपाचे विद्यमान आमदार राज पुरोहित यांना बाजूला करून कुलाबा विधानसभा मतदारसंघातून नार्वेकर यांना भाजपाचे तिकीट देण्यात आले. राहुल नार्वेकरांना या निवडणुकीत ५७ हजार ४२० मते मिळाली. त्यांनी काँग्रेसचे अशोक जगताप (४१ हजार २२५ मते) यांचा पराभव केला.
त्यानंतर जुलै २०२२ मध्ये त्यांची अध्यक्षपदी निवड झाली. नार्वेकर यांचा कार्यकाळ कमी असला तरी अनेक कारणांसाठी तो गाजला. डिसेंबर २०२२ मध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याशी शाब्दिक चकमक झाल्यानंतर त्यांनी जयंत पाटील यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांच्या कार्यशैलीवर टीका केली होती; तर काँग्रेसने त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न केला.
राहुल नार्वेकर दक्षिण मुंबईतून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत, अशाही बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. मात्र, त्यांनी याची शक्यता फेटाळून लावली होती.