आसाराम लोमटे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर परभणी जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटले असून जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांची विभागणी दोन गटांत झाली आहे. पक्षफुटीचा ताजा संदर्भ जरी यामागे असला तरी गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात असलेली पक्षांतर्गत गटबाजी हेही या विभागणीचे एक महत्त्वाचे कारण ठरले आहे. शिवाय थोरल्या पवारांमागे जायचे की धाकल्या हे ठरवताना आगामी राजकीय दिशा आणि समीकरणे याचा विचार स्थानिक नेत्यांनी केला आहे.

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठी ताकद आहे. जिल्हा परिषदेवर सातत्याने राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला आहे. एकेकाळी गंगाखेड, पाथरी, जिंतूर या तीन विधानसभा राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या. आज जिल्ह्यातली एकही विधानसभा राष्ट्रवादीच्या ताब्यात नाही, तरीही वेगवेगळी सत्तास्थाने ताब्यात असणाऱ्या नेत्यांची गटबाजी हे जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जुनेच दुखणे आहे. २०२२ च्या मार्च महिन्यात आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षातला अंतर्गत कलह समोर आला होता. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बेबनाव असल्याचे वारंवार दिसून येत होते, बाबाजानी यांच्या राजीनाम्याने तो चव्हाट्यावर आला होता. कालांतराने बाबाजानी यांच्या राजीनाम्यावर पडदा पडला. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची पक्षांतर्गत गटबाजी दूर करण्यासाठी थेट पक्षनेतृत्वाने कान टोचले. दिल्लीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी या सर्व स्थानिक नेत्यांना एकदिलाने राहण्याच्या सूचना केल्या होत्या. या बैठकीला खासदार श्रीमती फौजिया खान, पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी, माजी आमदार विजय गव्हाणे, विजय भांबळे, मधुसूदन केंद्रे, शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, भरत घनदाट आदी उपस्थित होते. अर्थात या बैठकीनंतरही राष्ट्रवादीतील गटबाजी संपली नव्हती उलट अधून मधून ही पक्षांतर्गत धुसफूस चव्हाट्यावर येत होती. आता पक्षात फूट पडल्यानंतर खासदार श्रीमती फौजीया खान, आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार विजय गव्हाणे, विजय भांबळे हे शरद पवारांसोबत तर शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, माजी आमदार मधुसूदन केंद्रे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर हे तिघे अजित पवारांच्या गोटात दाखल झाले आहेत.

भांबळे, केंद्रे यांनी पाहिले मतदारसंघाचे गणित

विजय भांबळे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. तरीही त्यांनी सद्यस्थितीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याच सोबत राहण्याचा निर्णय घेतला. भांबळे हे राष्ट्रवादीचे जिंतूरचे आमदार होते. त्यांचा पराभव करून या ठिकाणी आता आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांचे वर्चस्व आहे. श्रीमती बोर्डीकर या भाजपच्या आहेत. बोर्डीकर विरुद्ध भांबळे हा सत्तासंघर्ष जिंतूर विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन दशकांपासून आहे. येणाऱ्या विधानसभेची गणिते कशी असतील हे माहीत नाही. भारतीय जनता पक्ष व अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यात जागा वाटपाबाबत काय घडेल याचा आजच अंदाज बांधता येत नाही. मात्र मतदारसंघात भाजपला विरोध करायचा आणि दुसरीकडे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ही बाब भांबळे यांच्यासाठी कठीण होती.अशावेळी आपले स्वतंत्र अस्तित्व राखायचे असेल आणि मतदारसंघातील भाजप विरोध कायम टिकवायचा असेल तर शरद पवार यांच्या सोबतच राहावे लागेल असा विचार भांबळे यांनी केला. शिवाय जिंतूर विधानसभा मतदारसंघात बंजारा, आदिवासी, दलित मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे थोरल्या पवारांची साथ सोडता येणार नाही असे गणित भांबळे यांनी लावले. म्हणूनच अजित पवार यांचे कट्टर समर्थक असूनही त्यांना वेगळा निर्णय घ्यावा लागला.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जी पत्रकार बैठक झाली त्यात राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी आपण शरद पवार यांच्या सोबतच असल्याचे जाहीर केले तथापि या पत्रकार बैठकीला गंगाखेडचे माजी आमदार मधुसूदन केंद्रे अनुपस्थित होते. केंद्रे हे मंत्री धनंजय मुंडे यांचे मेहुणे आहेत. त्यामुळे मुंडे यांना पूरक भूमिकाच ते घेतील असा अंदाज होता तो खरा ठरला आहे. अर्थात केंद्रे यांनी अजित पवार यांच्या गोटात दाखल होण्यास केवळ हे एकमेव कारण नाही. गंगाखेड विधानसभा मतदारसंघात केंद्रे यांना सातत्याने विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याशी संघर्ष करावा लागतो. गुट्टे यांच्याशी राजकीय संघर्ष करायचा असेल तर विरोधी पक्षात राहून उपयोग नाही. सत्ताधारी पक्षात राहिल्यानंतरच कार्यकर्त्यांनाही बळ मिळेल आणि आपल्याला पक्ष नेतृत्वाकडून ऊर्जा मिळेल असा विचार केंद्रे यांनी केला. आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रे यांनी गंगाखेड या शहरावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यांचे चिरंजीव मिथिलेश हे गेल्या वर्षभरापासून पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने परिश्रम घेत आहेत. अशावेळी विरोधी पक्षात राहण्यापेक्षा सत्ताधारी पक्षात राहण्याचा निर्णय केंद्रे यांनी घेतला.

गटबाजी कायमचीच

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून परभणी जिल्ह्यात या पक्षात मोठी गटबाजी आहे. या गटबाजीत पात्रे बदलतात पण गटबाजी मात्र संपत नाही. श्रीमती फौजिया खान विरुद्ध सुरेश वरपूडकर असा संघर्ष बराच काळ चालला. खासदार श्रीमती खान या मंत्री असतानाही स्थानिक पातळीवर या गटबाजीतूनच त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला होता. पुढे वरपूडकरांनी राष्ट्रवादी सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षातल्या गटबाजीचे स्वरूप वारंवार बदलले आहे. कधी ही गटबाजी विजय भांबळे विरुद्ध बाबाजानी तर कधी राजेश विटेकर विरुद्ध बाबाजानी अशी राहिली. मधुसूदन केंद्रे विरुद्ध बाबाजानी असाही पक्षांतर्गत संघर्ष होता. तो अलीकडे निवळला तरी विटेकर विरुद्ध बाबाजानी यांच्यातल्या संघर्षाची धार अलीकडच्या काळात वाढली. दोघांचेही कार्यक्षेत्र पाथरी विधानसभा मतदारसंघ आहे. बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने आपोआपच राजेश विटेकर अजित पवार यांच्यासोबत जातील हे उघड गणित होते. वस्तूतः राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला होता. त्यानुसार दिनांक 25 जून ते 10 जुलै या कालावधीत जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्या निवडी पार पाडणार होत्या. मात्र मध्येच हे राजकीय नाट्य उभे राहिल्याने आता या निवडी लांबणीवर पडल्या आहेत. सात वर्षे पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी राहिल्यानंतर आता नव्या व तरुण कार्यकर्त्यांना संधी मिळावी अशी अपेक्षा विद्यमान जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी व्यक्त केली आहे. तूर्त तरी शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख हे अजित पवार यांच्यासोबत तर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबाजानी हे शरद पवारांसोबत असे चित्र आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The split in ncp has affected parbhani district politics print politics news asj
Show comments