संतोष मासोळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुळे : कधीकाळी काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून गणले जाणारे माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल तसेच राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्याशी संबंधित संस्थांवर २०१८ मध्ये छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी हे दोन्ही नेते भाजपमध्ये डेरेदाखल झाले होते. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार कुणाल पाटील यांच्याशी संबंधित सूतगिरणीवर आयकर विभागाने छापा टाकला असून तीन-चार दिवसांपासून चौकशी सुरु आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्यासाठी भाजपकडून टाकण्यात आलेला हा गळ असल्याची चर्चा रंगली आहे. यामुळेच आमदार पाटील यांच्या आगामी राजकीय भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील अध्यक्ष असलेल्या जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीवर आयकर विभागाने छापा टाकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शनिवारी पहाटे धडकलेले पथक तीन दिवस ठाण मांडून असल्याने या चौकशीचे कारण आर्थिक की राजकीय, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

हेही वाचा >>> ओबीसी समाजाच्या नाराजीचा फटका बसू नये यासाठी राज्यात भाजपला करावे लागले जातनिहाय जनगणनेचे समर्थन

आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांनी आपला कृती आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे. अधिकाधिक जागांवर आपल्याच पक्षाचे उमेदवार निवडून यावेत, यासाठी रणनीती आखली जात आहे. विधानसभा निवडणुकीआधी लोकसभेची निवडणूक होणार असल्याने मातब्बर उमेदवारांना गळाशी लावण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत. छापा पडल्यावर संबंधितांनी भाजपची वाट धरणे, हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही.

हेही वाचा >>> “मुख्यमंत्री केसीआर एनडीएमध्ये येण्यास इच्छुक होते, मीच त्यांना…”, पंतप्रधान मोदींचा खळबळजनक खुलासा

दोन उदाहरणे बोलकी

धुळे जिल्ह्यात यापूर्वी घडलेली दोन उदाहरणे ते दर्शविण्यासाठी पुरेशी आहेत. २०१८ मध्ये ‘डिसान’ ग्रुपच्या निरनिराळ्या कंपन्यांमध्ये भागीदार असलेले कॉंग्रेसचे तत्कालीन दिग्गज नेते, माजी शिक्षणमंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार कदमबांडे यांच्या नेतृत्वाखालील धुळे-नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. पटेल, कदमबांडे यांच्यासह सहा जणांच्या शिरपूर, धुळे येथील निवासस्थानी सकाळी नाशिक, मुंबई येथील आयकर विभागाच्या पथकांनी छापा टाकला होता. पथकांनी तपासणीवेळी संबंधितांच्या निवासस्थानांमधील संपर्क यंत्रणा खंडित केली होती. ही तपासणी दीर्घकाळ सुरूच होती.

हेही वाचा >>> पाण्यासाठी उपोषण की राजकीय श्रेयवादाची लढाई ?

धुळे शहरालगत एमआयडीसीत मुख्य कार्यालय असलेल्या डिसान ॲग्रो-टेक लिमिटेड कंपनीशी निगडित डिसान ग्रुप आहे. सोयाबीनवर प्रक्रिया करण्यात हा उद्योगसमूह त्या काळात राज्यात आघाडीवर होता. प्रकल्पाच्या विस्तारात हा उद्योग समूह तेल, ढेप, शीतगृह,कापड व टीशर्ट, टॉवेल निर्मितीसह विविध प्रकारची निर्यातक्षम उत्पादने घेतो. या ग्रुपचे आमदार पटेल, माजी आमदार कदमबांडे निरनिराळ्या कंपन्यांचे भागीदार होते. या ग्रुपच्या कंपनीचे सांताक्रूझ (मुंबई) येथे कॉर्पोरेट कार्यालय आहे. तेथेही कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाने तपासणी केली होती.

या चौकशीत फारसे काही हाती लागले नसले, तरी या दोन्ही नेत्यांवर दबाव तंत्राचा वापर झाल्याचे म्हटले गेले. यानंतर पटेल आणि कदमबांडे दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर या दोन्ही नेत्यांच्या किंवा त्यांच्या कुठल्या संस्थांच्या चौकशीचे, तपासणीचे पुढे काय झाले, ते कोणीच सांगत नाही. ही अशी पार्श्वभूमी असल्याने आमदार कुणाल पाटील यांच्याशी संबंधित सूतगिरणीवरील छाप्यांचा आणि आगामी निवडणुकांचा संबंध जोडला जात आहे. आमदार पाटील यांनी मात्र सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चौकशीसंदर्भात आपणास लेखी असे काहीही कळविण्यात आलेले नाही. कुठल्या अनुषंगाने तपासणी चालु आहे हेही ठाऊक नाही. तपास यंत्रणेला अपेक्षित असलेलले संपूर्ण सहकार्य केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The tradition of raids on political opponents in dhule congress mla kunal patil print politics news ysh
Show comments