उत्तर प्रदेशमधील एकमेकांचे विरोधक असलेले भाजपा, समाजवादी पार्टी (सपा) आणि भारतीय किसान युनियन (बीकेयू) हे कधी नव्हे तेव्हा एकाच बाजूला असल्याचे चित्र दिसत आहे. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यातील खुब्बापूर येथील शाळेत मुख्याध्यापकांनी इतर मुलांकरवी मुस्लीम विद्यार्थ्याला मारहाण करण्याचा प्रकार घडला. या प्रकाराला धार्मिक रंग मिळाल्यानंतर वरील सर्व पक्ष, संघटनेने एकच भूमिका घेतल्याचे दिसते. सर्वांनी या प्रकरणात कोणताही धार्मिक रंग नसल्याचे सांगताना शाळेची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला. भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री संजीव कुमार बलियान यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले की, मुझफ्फरनगरच्या घटनेला कोणताही धार्मिक रंग नाही. तसेच समाजवादी पार्टी आणि बीकेयूने पंचायत घेऊन मुख्याध्यापिका त्रिप्ता त्यागी आणि अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या पालकामध्ये समेट घडवून आणला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तीनही संघटना एकाच मंचावर येण्याचे कारण म्हणजे उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातील जिल्ह्यांमध्ये ‘त्यागी’ समाजाचा असलेला राजकीय वरचष्मा. भाजपा नेते बलियान यांनी त्रिप्ता त्यागी यांची रविवारी (दि. २७) दुपारी भेट घेतली आणि सांगितले की, मारहाण झालेल्या मुलाचे पालक आणि ग्रामस्थ एकत्र बसून संवादातून या प्रकरणात मार्ग काढतील. राजकारणी लोक या प्रकरणाला जातीय रंग देऊन फक्त स्वतःचा फायदा करून घेतील, यासाठी ग्रामस्थांना या प्रकरणात राजकारण्यांना आणायचे नाही. “ग्रामस्थांच्या भूमिकेतून स्पष्ट संदेश मिळत आहे. त्यांना गावाचे राजकीय पर्यटन होऊ द्यायचे नाही. जे लोक या छोट्याश्या घटनेला वेगळाच रंग देऊ पाहत आहेत आणि स्थानिकांना राजकीय आणि धार्मिक राजकारणासाठी बाहुले बनवू पाहत आहेत, त्यांना ग्रामस्थांनी जोरदार चपराक लगावली आहे”, अशी भूमिका बालियान यांनी व्यक्त केली.

हे वाचा >> मुझफ्फरनगरमधील वादग्रस्त शाळा तिसऱ्या दिवशीही बंद

२६ ऑगस्ट रोजी बीकेयूचे नेते नरेश टिकैत, माजी खासदार, समाजवादी पक्षाचे नेते हरेंद्र मलिक आणि त्यागी-भूमिहार-ब्राह्मण समाजचे नेते मांगे राम त्यागी यांनी ज्या मुलाला मारहाण झाली त्याच्या गावात पंचायत भरविली. या पंचायतीमध्ये सदर कुटुंबामध्ये समेट घडवून आणण्यात आला. टिकैत माध्यमांना म्हणाले की, ज्या शिक्षिकेवर एफआयआर नोंदविला गेला आहे, तो मागे घेतला जाऊ शकतो.

मेरठमधील समाजवादी पक्षाचे नेते राजपाल सिंह माध्यमांशी बोलत असताना म्हणाले की, ज्या गावामध्ये विद्यार्थ्याला मारहाणीची घटना घडली, त्या गावाने स्वतःच हा मुद्दा तडीस नेण्याचे ठरविले आहे. सदर मुख्याध्यापिकांनी घडलेल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे, तसेच मारहाण झालेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितले की, त्यांना हा विषय आता पुढे न्यायचा नाही. मात्र आगामी लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही राजकीय नेते या विषयामध्ये राजकारण आणू पाहत आहेत.

मेरठच्या किठोरे येथील समाजवादी पक्षाचे आमदार आणि मुस्लीम त्यागी नेते शाहीद मन्झूर यांनी लोकांना सावधानतेचा इशारा देताना म्हटले की, काही राजकीय पुढाऱ्यांना या प्रकरणाचे राजकारण करायचे असून दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करायची आहे. मन्झूर हे समाजवादी पक्षाकडून मंत्रीदेखील राहिले आहेत. ते म्हणाले, सत्ताधारी भाजपा पक्षाने २०१३ रोजी मुझफ्फरनगर दंगलीचा ज्याप्रकारे स्वतःच्या लाभासाठी वापर केला, त्याप्रमाणे या मारहाणीच्या घटनेचा राजकीय हत्यार म्हणून वापर होत आहे. पण या प्रकरणात त्यांना यश मिळणार नाही, असे लक्षात आल्यानंतर आता त्यांनी माघार घेतली आहे.

बीकेयूचे नेते नरेश टिकैत हे प्रभावशाली अशा बालियान खापचे प्रमुख आहेत. त्यांनीही म्हटले की, हे प्रकरण आता ‘मिटले’ आहे. “मुख्याध्यापक असलेल्या शिक्षिकेने काहीही चुकीचे केलेले नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांना एफआयआरचा सामना करावा लागणार नाही. तसेच या घटनेमुळे त्यांच्या शाळेची संलग्नताही रद्द होणार नाही.”, अशी प्रतिक्रिया टिकैत यांनी गावात झालेल्या पंचायतीनंतर दिली.

मांगे राम त्यागी यांनी या प्रकरणातून सुवर्णमध्य काढण्यासाठी प्रयत्न केले. तेही म्हणाले की, सदर मुख्याध्यापक बाईंनी शाळेला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. “त्या पीडित विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांनी कानशिलात लगावली, एवढाच त्या व्हिडिओतील खरा भाग आहे. नंतर व्हिडिओत ज्या प्रतिक्रिया ऐकू येत आहेत, त्या खऱ्या नाहीत. चार विद्यार्थ्यांनी मारहाण केली, त्यातील दोन विद्यार्थी मुस्लीम आहेत”, असा दावा मांगे राम यांनी केला. त्रिप्ता यांनी मुलांना सांगितले की, सदर विद्यार्थ्याला सौम्य शिक्षा करा. म्हणजे पुढच्या वेळी तो गृहपाठ करून येईल, असेही त्यागी यांनी सांगितले.

पश्चिम उत्तर प्रदेशमधील त्यागी समाजाचे मातब्बर नेते ग्यानेश्वर त्यागी यांनीही सदर मुख्याध्यापकांची पाठराखण केली. “त्या शिक्षिकेने जे केले त्याला समर्थन देता येणार नाही. पण त्याचवेळेला काही राजकीय नेते या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत, तेदेखील निषेधार्ह आहे.” राष्ट्रीय लोक दल पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार जयंत चौधरी हेदेखील पश्चिम उत्तर प्रदेशमधील मोठे नेते मानले जातात. सोमवारी (२८ ऑगस्ट) पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी भाजपावर टीका केली. या व्हिडिओमध्ये दिसत असलेली परिस्थिती जेव्हा व्यापक स्वरुप धारण करतात, तेव्हा परिस्थिती आपल्या नियंत्रणाबाहेर गेली आहे असे समजते, अशी टीका त्यांनी केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारवर केली.

सदर मारहाणीची घटना घडल्यानंतर त्रिप्ता त्यागी यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३ (जाणीवपूर्वक इजा करणे) आणि कलम ५०४ (शांतता भंग करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक अपमान करणे) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र हे गुन्हे जामीनपात्र असल्यामुळे त्यांची अटक करण्यात आलेली नाही, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली. त्रिप्ता त्यागी चालवत असलेल्या नेहा पब्लिक स्कूल तपास होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, असेही सांगण्यात आले.

माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्रिप्ता त्यागी म्हणाल्या की, सदर व्हिडीओशी छेडछाड करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान त्या विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांकरवी मारहाण करायला सांगणे चुकीचे होते, हे त्यांनी मान्य केले. मी अंपग असल्यामुळे शिक्षा देण्यासाठी उठू शकत नव्हते, त्यामुळे इतर मुलांना शिक्षा देण्यास सांगितल्याचे त्रिप्ता त्यागी म्हणाल्या.

सदर मुलाच्या वडीलांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटले की, आम्हाला मुख्याध्यापक असलेल्या शिक्षिकेविरोधात कोणतीही कारवाई करायची नाही. पण आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रीत झाल्यामुळे आता आम्हाला भीती वाटत आहे, असेही त्यांनी मान्य केले. “मी आणि माझ्या कुटुंबियांना आता भविष्याची चिंता लागली आहे. मी शेतमजूर आहे. त्रिप्ता मॅडम यांना अटक व्हावी किंवा त्यांना शिक्षा मिळावी, अशी आमची इच्छा नाही. माझा मुलगा आणि त्याचे भाऊ अनेक वर्षांपासून तिथेच शिक्षण घेत आहेत. आम्हाला फक्त घडल्या प्रसंगाची माहिती मिळाली आणि त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, एवढेसे पुरेसे आहे. आम्हाला कधीही या गावात अशाप्रकारचा त्रास झाला नाही, पण आता गावात सगळीकडे आमचीच चर्चा आहे.”

द इंडियन एक्सप्रेसचे वार्ताहर मुलाच्या वडिलांशी बोलत असताना गावातील प्रमुख नेते नरेंद्र त्यागी यांनी मुलाच्या वडिलांना दरडावले. ते म्हणाले, “हे नाटक बंद करा. आम्हाला या गावात माध्यमांचे प्रतिनिधी नकोत. तुम्ही पोलिस स्थानकात जाऊन आताच्या आता एफआयआर मागे घ्या. नाहीतर तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील”.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The tyagi tutorial in muzaffarnagar school row why bjp sp bku are of one view kvg