Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी जून २०२२ मध्ये जेव्हा उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारलं आणि विरोधात बसलेल्या भाजपाशी हातमिळवणी केली तेव्हाच हे अंदाज लावले जात होते की एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) मुख्यमंत्री होतील. त्या प्रमाणे ते झाले. महायुतीचं सरकार असं नाव देवेंद्र फडणवीस यांनी या सरकारला दिलं आणि देवेंद्र फडणवीस या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या सावलीतून एकनाथ शिंदे बाहेर?
महायुतीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) हे भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सावलीतून बाहेर आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी प्रशासनावर आपली पकड आहे हे दाखवून दिलं आहे. तसंच एक उत्तम नेता म्हणून स्वतःला सिद्धही केलं आहे. त्यांनी स्वतःला कसं सिद्ध केलं? या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर ते पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात इतकी त्यांनी त्यांची प्रतिमा मोठी केली आहे असंही काही नेते खासगीत सांगतात.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका
लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. कारण महायुतीला अवघ्या १७ जागाच जिंकता आल्या. १७ पैकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सात जागा शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि नऊ जागा भाजपा अशा जिंकल्या. एकनाथ शिंदेंच्या ( Eknath Shinde ) शिवसेनेने १५ जागा लोकसभेला लढवल्या होत्या त्यापैकी सात जिंकल्या त्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट चांगलाच ठरला. भाजपाने २८ जागा लढवल्या होत्या त्यापैकी नऊ जागा त्यांना जिंकता आल्या. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde ) त्यांचं आणि त्यांच्या पक्षाचं यश चांगलं मिळवलं असं म्हणता येईल.
एकनाथ शिंदे हे खास वक्ते नाहीत पण
शिवसेनेच्या अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे खूप अनुभवी प्रशासक नाहीत किंवा तसे खास वक्तेही नाहीत. तरीही त्यांनी सरकार उत्तम प्रकारे चालवून दाखवलं. तसंच विरोधी पक्षात असलेल्या तिघांना म्हणजेच महाविकास आघाडीला नामोहरम केलं. सरकारच्या लोकप्रिय योजना त्यांनी जाहीर केल्या. महिलांसाठी लाडकी बहीण, तरुणांसाठी लाडका भाऊ, शेतकरी कर्जमाफी योजना, पायाभूत सेवांची वाढ या सगळ्या गोष्टींमुळे नेता म्हणून त्यांची प्रतिमा उंचावली आहे.
राजकीयदृष्ट्या महायुतीत महत्त्वाचं स्थान कायम राखण्यात शिंदे यशस्वी
राजकीयदृष्ट्या विचार केला तर महायुतीमध्ये महत्त्वाचं स्थान मिळवण्यात आणि ते कायम राखण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या यशस्वी वाटाघाटी त्यांनी केल्या. भाजपा आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस यांनी शिवसेनेला मागे टाकू नये याची पुरेपूर काळजी घेतली. यामागचं प्रमुख कारण दिल्लीतल्या महाशक्तीचा एकनाथ शिंदेंवर बसलेला विश्वास. एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी बंडखोर आमदारांचं पुनर्वसन कऱण्याची खात्री दिली त्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा कायम राहिला आहे. तसंच मराठा आरक्षणाचं प्रकरणही त्यांनी राजकीय संवेदनशीलपणे हाताळलं. मनोज जरांगे यांनी मुंबईच्या दिशेने मोर्चा आणला होता. तो नवी मुंबईत रोखून दाखवला आणि यशस्वी तडजोडी करुन मनोज जरांगेंना अंतरवलीत पाठवण्यातही यश मिळवलं.
एकनाथ शिंदे यांची कारकीर्द
एकनाथ शिंदे यांचा राजकारणाकडे पाहण्याचा प्रवास वेगळा आहे. सातारा येथील दरे गावी एका शेतकरी कुटुंबात एकनाथ शिंदेंचा जन्म झाला. त्यानंतर त्यांचं कुटुंब आपलं आयुष्य आणखी बरं व्हावं म्हणून ठाण्यात आलं. एकनाथ शिंदे यांनी शिक्षण पूर्ण केलं. ठाण्यात ते रिक्षा चालक म्हणूनही काम करत होते. १९८० च्या दशकात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या विचारांनी प्रेरित होऊन ते शिवसेनेत आले. १९९७ मध्ये एकनाथ शिंदे ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा हा प्रवास सुरु झाला. एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारीही सांभाळली आहे. तसंच एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाचा मुद्दाही जपला. त्यामुळेच २०१९ ला जेव्हा महाविकास आघाडी झाली त्यानंतर सरकारमध्ये घुसमटलेल्या एकनाथ शिंदेंनी २०२२ मध्ये शिवसेना बरोबर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचं हे बंड यशस्वीही झालं.