जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील दिग्गज मानले जाणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात एकेकाळी गुरू-शिष्याचे नाते होते. दोघांनी हातात हात धरून उत्तर महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्याचे स्वप्न बघितले. पुढे, पक्षातच दोघांमध्ये कुरबुरी सुरु झाल्या. दोघांच्या राजकीय वाटा वेगळ्या झाल्यावर त्या अधिकच वाढत गेल्या. हा राजकीय वाद आता विकोपाला गेला असून, मंत्री महाजन यांचे एका आयएएस महिला अधिकाऱ्याशी असलेल्या कथित संबंधाच्या आरोपानंतर त्यास महाजन यांच्याकडून कटू भाषेत मिळालेल्या उत्तरामुळे दोघांमधील शाब्दिक युद्धाने आता विखारी वळण घेतले आहे.
भाजपला उत्तर महाराष्ट्रात ओबीसी चेहरा मिळवून देण्यात मोठी भूमिका निभावणारे एकनाथ खडसे यांच्या शब्दाला एकेकाळी पक्षात मोठा मान होता. खुद्द गिरीश महाजन हे खडसे यांना विचारल्याशिवाय पुढचे पाऊल टाकत नव्हते. मात्र, खडसे यांनी कधी नव्हे ती मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आणि भाजपमध्ये त्यांचा रसातळाकडे प्रवास सुरू झाला. मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासह विविध वादग्रस्त प्रकरणांच्या चौकशीला सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर आली.
पुढे जाऊन त्यांना आमदारकीचे तिकीटही नाकारले गेले. भाजपकडून अवहेलना होत असल्याचे पाहून खडसे यांनी नंतर शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून खडसे आणि महाजन यांच्यातील वाद विकोपाला गेला. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोघे सोडत नाहीत. आरोपाच्या फैरी झाडताना एकमेकांच्या कुटुंबातील सदस्यांना मधे ओढण्यासही दोघेजण मागे पुढे पाहत नसल्याचे अनेकवेळा दिसून आले.
खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत गेल्यानंतरही दोघांमध्ये कलगीतुरा कायम असताना, एप्रिल २०२१ मध्ये खडसे यांच्याविषयी त्यांना जिव्हारी लागणाऱ्या शब्दांचा वापर महाजन यांनी केला होता. वाढते वय आणि आजारांमुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. खडसे यांच्या मुलीलाही लोकांनी नाकारले.त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडल्याची टीका महाजन यांनी केली होती. याशिवाय, त्यांना सर्व पदे घरातच पाहिजेत, असे बोलून महाजन यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये खडसे यांना डिवचले होते.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या जिल्हा परिषद सदस्य, जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावर कायम का आहेत. साधना महाजन तुमच्या कुटुंबातील की बाहेरच्या आहेत, असे काही प्रश्न उपस्थित केले होते. दुर्दैवाने गिरीश महाजन यांना मुलगा नाही. अन्यथा त्यांचा मुलगाही राजकारणात आला असता, असे विधानही खडसे यांनी त्यावेळी केले होते. दोघांनी एकमेकांवर केलेल्या टीकेतून राजकीय स्तर घसरल्याचा प्रत्यय वेळोवेळी आला आहे.
खडसे यांनी महाजन यांच्यावर टीका करताना त्यांना मुलगा नसल्याचे म्हटल्यावर महाजन यांनीही खडसे यांना त्यांच्याच भाषेत प्रत्यु्त्तर देताना एक खळबळजनक शंका उपस्थित केली होती. खडसे यांच्या मुलाने आत्महत्या केली होती की त्याची हत्या झाली होती, याचा तपास केला पाहिजे, असे वक्तव्य महाजन यांनी केले होते. तेव्हापासून दोघांमधील संबंध कायमचे बिघडले.
आताही एका पत्रकाराने महाजन यांचे एका आयएएस महिला अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप केल्याची चित्रफीत बाहेर आल्यानंतर खडसे यांनी त्या चित्रफितीचा आधार घेत महाजन यांच्यावर टीका करण्याची संधी साधली. दुसरीकडे, महाजन यांनी मी जर एक गोष्ट सांगितली तर खडसे घराबाहेर पडल्यावर लोक त्यांना जोड्याने मारतील, असे विधान करून खडसे यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले असून दोघेही नमते घेण्याच्या स्थितीत नसल्याने वाद यापुढेही वाढतच जाणार आहे.