महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा विरोधकांच्या एकजुटीवर परिणाम होणार नाही, असे महाआघाडीतील नेते ठामपणे सांगत असले तरी, ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या फुटीचे पडसाद बेंगळुरू येथे आजपासून (सोमवार व मंगळवार) होत असलेल्या बैठकीवर पडण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘संयुक्त पुरोगामी आघाडी’च्या अध्यक्ष सोनिया गांधींच्या उपस्थित होत असलेल्या बैठकीमध्ये ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी (१८ जुलै) सहभागी होतील. सोमवारी मात्र पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे एकट्याच बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पाटण्यामध्ये झालेल्या बैठकीला शरद पवार, सुप्रिया सुळे व प्रफुल पटेल असे ‘राष्ट्रवादी’चे तीनही दिग्गज नेते हजर राहिले होते. त्यानंतर ‘राष्ट्रवादी काँग्रेस’मधील फुटीनंतर पटेल हे अजित पवारांच्या गटात सामील झाले. बैठकीच्या पहिल्या दिवशी शरद पवार उपस्थित न राहण्यामागील कारण स्पष्ट केलेले नाही.

हेही वाचा – शिंदे-फडणवीस-अजित पवार यांच्याकडून शेतकऱ्यांना गोंजारण्याची चढाओढ

पाटण्याच्या बैठकीत १६ भाजपेतर पक्षांचा सहभाग होता, ही संख्या आता २४ वर गेली आहे. दोन दिवसांच्या बैठकीमध्ये भाजपच्या फोडाफोडीच्या डावपेचांचा मुकाबला कसा करायचा, यावर प्रामुख्याने चर्चा केली जाईल. शिवाय, २० जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून सभागृहांमध्ये मांडले जाणारे महत्त्वाचे विषय व त्यासंदर्भातील रणनिती निश्चित केली जाईल. लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाचा मुद्दाही कळीचा असून त्यावरही चर्चा केली जाऊ शकते.

पाटण्याच्या बैठकीमध्ये झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर महाआघाडीची समन्वय समिती स्थापन केली जाणार असून उपसमितीही नेमली जाईल. महाआघाडीतील विविध पक्षांशी समन्वय साधणे, प्रादेशिक पक्षांचे राज्या-राज्यांतील प्राधान्यक्रम समजून घेणे, त्यानुसार अल्पकालीन व दीर्घकालीन रणनिती ठरवणे ही जबाबदारी समन्वय समितीला पार पाडावी लागेल. लोकसभा निवडणुकीसाठी महाआघाडीचा अजेंडा तयार करण्याची म्हणजेच महाआघाडीचा किमान समान कार्यक्रम निश्चित करण्याची जबाबदारी उपसमितीवर सोपवली जाईल. यापूर्वी समन्वयक म्हणून शरद पवार व नितीशकुमार यांची नावे घेतली जात होती. आता महाराष्ट्रात ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ची पुनर्बांधणी करण्याकडे शरद पवारांना अधिक लक्ष द्यावे लागणार असल्याने समन्वयाची जबाबदारी अन्य नेत्याकडे दिली जाऊ शकते.

दिल्ली सरकारच्या प्रशासकीय अधिकारांवर गदा आणणाऱ्या संभाव्य विधेयकाला विरोध करण्याची भूमिका काँग्रेसने जाहीरपणे घेतल्यानंतर आम आदमी पक्षाने महाआघाडीच्या बैठकीत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. पाटण्यातील बैठकीला गैरहजर राहिलेले ‘राष्ट्रीय लोकदला’चे प्रमुख जयंत चौधरीही सहभागी होणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष व ‘राष्ट्रीय लोकदला’ची युती असली तरी, चौधरींशी भाजपने संपर्क साधल्याची चर्चा रंगली होती. पश्चिम बंगालमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील हिंसाचाराविरोधात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी तसेच, भाजपचे नेते ‘तृणमूल काँग्रेस’वर हल्लाबोल करत आहेत. काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेवर ‘तृणमूल काँग्रेस’ने नाराजी व्यक्त केली असली तरी, भाजपविरोधातील ऐक्यासाठी महाआघाडीच्या बैठकीत सहभागी होण्याचा निर्णय पक्षाच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे.

हेही वाचा – सहकारातही वारसदारांच्या हाती सूत्रे देण्याचा पायंडा पडू लागला

पाटण्याच्या बैठकीची सर्व जबाबदारी नितीशकुमार यांच्या जनता दल (संयुक्त) व तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल या बिहारमधील दोन्ही सत्ताधारी पक्षांनी घेतली होती. यावेळी ही बैठक कर्नाटकमध्ये होत असल्याने बैठकीच्या आयोजनाची सर्व जबाबदारी सत्ताधारी काँग्रेसने घेतली आहे. मॅरेथॉन बैठकीनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या वतीने सर्व नेत्यांसाठी सोमवारी रात्रभोजन असेल.

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती, वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी, तेलुगु देसमचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक व भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव उपस्थित राहणार नाहीत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Their might be impact of the split of the ncp in the meeting of the opposition print politics news ssb